- News
- बिबट्या अन् नागरिकही गेले उडत... दौलताबादचे वनपाल सुधीर धवन यांचा मस्तवाल रवय्या... तिसगाववासियांचा...
बिबट्या अन् नागरिकही गेले उडत... दौलताबादचे वनपाल सुधीर धवन यांचा मस्तवाल रवय्या... तिसगाववासियांचा संताप, जीव मुठीत घेऊन जगताहेत...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज महानगरातील तिसगाव शिवारात दोन दिवसांपासून बिबट्याचा मुक्तसंचार सुरू असल्याच्या चर्चेने नागरिक दहशतीखाली आले आहेत. असे असताना वनविभाग बेफिकीर असल्याचे दिसत आहे.
नागरिक वारंवार दौलताबाद परिक्षेत्रात कार्यरत वनपाल सुधीर धवन यांच्याशी संपर्क करत आहेत, मात्र ते प्रतिसाद देत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ज्या नागरिकांचे कॉल त्यांनी उचलले उलट उत्तरे ऐकावी लागल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. धवन यांच्या या कार्यपद्धतीबद्दल संताप व्यक्त होत असून, वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन धवन यांना जनतेशी कसे वागावे, याचे धडे देण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे नागरिक वारंवार कॉल करतात म्हणून त्यांनी चक्क मोबाइल बंद करून ठेवल्याचे नागरिकांनी सांगितले. तिसगाव शिवारात बिबट्या वारंवार दिसून आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
वनविभाग कोणत्याही उपाययोजना करत नसल्याने नागरिकांची भीती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शेतात जाणे, शाळेत जाणे, संध्याकाळी बाहेर पडणेही नागरिक टाळत आहेत. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, शेतकऱ्यांचेही शेतीचे नुकसान होत आहे. नागरिकांच्या जिवाचा प्रश्न असला तरी वनविभागाचे सुरू असलेले दुर्लक्ष आश्चर्यजनक आहे. एखादी अनुचित घटना घडली, तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल व्यक्त केला जात आहे. वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात आणि कर्तव्य विसरलेल्या वनपाल धवन यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

