- News
- सिटी क्राईम
- समाजातील विकृती संपता संपेना... नायलॉन मांजा विकणाऱ्या आणखी तिघांना बेड्या! सातारा परिसरात कारवाई, ह...
समाजातील विकृती संपता संपेना... नायलॉन मांजा विकणाऱ्या आणखी तिघांना बेड्या! सातारा परिसरात कारवाई, हर्सूल जेलमध्ये रवानगी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांच्या खंडीभर कारवाया होऊनही नायलॉन मांजा विकणे आणि खरेदी करण्याचे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे समाजात किती विकृती आणि क्रूरपणा भरला आहे, हेच समोर येते. शहर गुन्हे शाखेने सातारा परिसरातून ३ विकृतांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. नायलॉन मांजाचे २ लाख १६ हजार ७५० रुपये किमतीचे एकूण २८९ गट्टू जप्त करण्यात आले. तिघांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने हर्सूल कारागृहात रवानगी केली.
संकेत दीपक कानडे (वय २६, रा. गल्ली नं.१, पुंडलिकनगर), गोविंद कृष्णा साळुंके (वय १९, रा. गल्ली नं. ३, न्यू हनुमाननगर) आणि तुषार रवींद्र काथार (वय २२, रा. घर नं. ५१०, आविष्कार कॉलनी) अशी संशयितांची नावे आहेत. पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन कदम, पोलीस अंमलदार राजेंद्र साळुंके, श्रीकांत काळे, मनोहर गिते, जालिंदर गोरे, अभिषेक बाठे, प्रतीक साबळे, रोहित जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली. गोपनीय माहितीवरून आधी संकेत कानडेला ताब्यात घेतले. कसून चौकशीत त्याने सातारा परिसरातील गोदामात नायलॉन मांजाचे गट्टू ठेवल्याचे सांगितले.
गोदामातून पोलिसांनी १४४ गट्टू जप्त केले. गोविंद साळुंकेच्या घरातून ९७ गट्टू तर तुषार काथारकडे ४८ गट्टू मिळून आले. विशेष म्हणजे, संकेतविरुद्ध यापूर्वीही अशाच प्रकरणात गुन्हा दाखल आहे. संकेतने नायलॉन मांजा ऑनलाइन मागवला होता. मांजाच्या विक्रीसाठी त्याने गोविंदलाही मदतीला घेतले. तुषारची संकेतसोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. तुषार पार्टटाइम जॉबसह हंगामी धंदेही करतो. तो पदवीधारक अभियंता असून, अशा क्रूर मार्गाला लागला.
दरम्यान, क्रांती चौक पोलिसांनीही नायलॉन मांजा घरात ठेवणाऱ्या तिघांना बेड्या ठोकल्या असून, भोईवाडा येथील उदय कॉलनीत शुक्रवारी (१९ डिसेंबर) ही कारवाई उपनिरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या पथकाने केली. सूरज जिनकर चरखे (वय २७, मूळ रा. ढोणी, जि. वाशिम), केतन श्रीधर मोहिते (वय २०) व ऋषीकेश विठ्ठल पडोळ (वय २२, दोघेही रा. उदय कॉलनी) अशी पकडलेल्यांची नावे आहेत.
विकृतीला धडा शिकवा...
थोड्याशा पैशांसाठी दुसऱ्यांच्या जिवावर उठणारी विकृती समाजानेच ठेचून काढण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलिसांना माहिती देण्याबरोबरच सर्वांनी एकत्र येऊन अशा प्रवृत्तीला धडा शिकवणे आवश्यक आहे. शहर गुन्हे शाखेने आजवर ८ मोठ्या कारवाया करून २२ जणांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले आहेत. तरीही कायद्याचा धाक या विकृतांना का निर्माण होत नाही, असा प्रश्न आहे. नायलॉन मांजा विकला जातो म्हणून ही विकृत मंडळी या व्यवसायात उतरली आहे, हे लक्षात घेण्याची गरज आहे.

