- News
- सिटी क्राईम
- पहाटे मोंढा नाका उड्डाणपुलावर भीषण अपघात; सुसाट कारने रिक्षाला उडवले, तरुणासह चिमुकलीचा मृत्यू, ४ गं...
पहाटे मोंढा नाका उड्डाणपुलावर भीषण अपघात; सुसाट कारने रिक्षाला उडवले, तरुणासह चिमुकलीचा मृत्यू, ४ गंभीर जखमी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मोंढा नाका उड्डाणपुलावरून जाणाऱ्या ऑटोरिक्षाला भरधाव कारने उडवले. यात रिक्षातील २२ वर्षीय तरुणासह ५ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. कारची धडक इतकी जोरात होती, की धडक बसताच रिक्षात बसलेला तरुण उडून उड्डाणपुलावरून जालना रोडवर सिंधी कॉलनीच्या बाजूने धपकन पडला आणि गतप्राण झाला. रिक्षातील अन्य ४ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात आज, २१ डिसेंबरला पहाटे १ च्या सुमारास (मध्यरात्री) घडला.
ऑटोरिक्षा (क्र. एमएच २० ईके ४५५७) आकाशवाणीकडून क्रांतीचौकाकडे जात होता. चालकासह सहा जण रिक्षात होते. जुना मोंढा नाका येथील उड्डाणपुलावरून जात असताना मागून सुसाट कार (क्र. एमएच २० जीक्यू ०२२१) आली आणि जोरात रिक्षाला धडकली. यात अख्तर रजा २२ हा वर्षीय तरुण व जाहरा नावाची ५ वर्षीय मुलगी मृत्यूमुखी पडली. दोघेही जुना बाजार येथील रहिवासी होते. कार रिक्षाला धडकताच मोठा अपघात झाल्याने नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. अब्दुल बारी (वय ४५, रा. आरेफ कॉलनी) यांच्यासह अन्य ३ जखमींना रिक्षातून घाटी रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर कार उलटून विरुद्ध दिशेला वळली आणि थांबली. माहिती मिळताच जवाहरनगर पोलिसांनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेतली. रिक्षाला धडक दिल्यानंतर कारमधील तीन तरुण व तीन तरुणींनी पळ काढला होता. त्यानंतर कारचालक स्वतःहून जवाहरनगर पोलीस ठाण्यात हजर झाला. कार कुशलनगरमधील असल्याचे समोर येत आहे. अपघातात रिक्षा चक्काचूर झाली तर कारचेही मोठे नुकसान झाले. अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी एका बाजूने वाहतूक सुरळीत केली.

