- News
- सिटी क्राईम
- एकमेकांविरुद्ध दंड थोपटूनही महायुतीतील पक्षांनी ४ नगरपालिकांवर फडकवला झेंडा, ‘मविआ’तील एकट्या काँग्र...
एकमेकांविरुद्ध दंड थोपटूनही महायुतीतील पक्षांनी ४ नगरपालिकांवर फडकवला झेंडा, ‘मविआ’तील एकट्या काँग्रेसकडे २ पालिका, ठाकरे गटाकडे १ नगरपंचायत!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष सरस ठरले. विरोधात भांडूनही त्यांनी ४ नगरपालिका ताब्यात घेतल्या आहेत. वैजापूरवर भाजप, सिल्लोड-पैठणवर शिंदे गट आणि गंगापूर पालिकेवर अजित पवार गटाने झेंडा फडकवला. ‘मविआ’तील घटक पक्ष काँग्रेसकडे कन्नड आणि खुलताबाद या दोन नगरपालिका आल्या असून, फुलंब्री ही एकमेव नगरपंचायत ठाकरे गटाकडे आली आहे.
विजय उमेदवार असे :
सिल्लोड : अब्दुल समीर (शिंदे गट)
पैठण : विद्या कावसानकर (शिंदे गट)
कन्नड : फरिन जावेद शेख (काँग्रेस)
खुलताबाद : आमेर पटेल (काँग्रेस)
गंगापूर : संजय जाधव (अजित पवार गट)
वैजापूर : दिनेश परदेशी (भाजप)
फुलंब्री : राजेंद्र ठोंबरे (ठाकरे गट)
फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार राजेंद्र ठोंबरे यांनी भाजप उमेदवार सुहास सिरसाट यांचा तब्बल १,७९७ मतांनी पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. गेल्या निवडणुकीत सिरसाट यांनी अवघ्या १९० मतांनी विजय मिळवला होता. यंदा मोठ्या फरकाने ते हरले. मंगळवारी सकाळी दहाला प्रशासकीय इमारतीतील सभागृहात मतमोजणीला सुरुवात होऊन अवघ्या बारा मिनिटांत पहिली फेरी जाहीर करण्यात आली. त्यानंतरच्या सलग तीन फेऱ्यांनी निकालाचे चित्र स्पष्ट झाले. ठोंबरे यांना एकूण ८,२१७ मते, तर सिरसाट यांना ६,४१७ मते मिळाली. महाविकास आघाडीने बारा नगरसेवक पदे काबीज केली, तर भाजपचे केवळ पाच नगरसेवक निवडून आले. काँग्रेसचे ४, ठाकरे गटाचे ७ तर शरद पवार गटाचा १ नगरसेवक निवडून आला. नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे आणि विजयी नगरसेवकांची खुल्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली.
वैजापूरमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय!; डॉ. परदेशींनी विधानसभेचा हिशेब केला चुकता!
वैजापूर नगरपालिका निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय प्राप्त केला. भाजपचे डॉ. दिनेश परदेशी यांनी ६,२८८ मतांच्या मोठ्या फरकाने शिंदे गटाचे उमेदवार आणि विद्यमान आमदार रमेश बोरनारे यांचे सख्खे बंधू संजय बोरनारे यांचा पराभव केला. डॉ. परदेशींना १८०२८ तर संजय बोरनारे यांना ११ हजार ७८० मते मिळाली. काँग्रेसचा उमेदवार सुभाष गायकवाड यांना अवघ्या १०४७ मतांवर समाधानी राहावे लागले. या निवडणुकीत वैजापूरमध्ये भाजपने सर्वाधिक ११ नगरसेवक पदे काबीज केली आहेत. शिंदे गटाचे १० तर अजित पवार गटाचे ४ नगरसेवक निवडून आले आहे. आ. रमेश बोरनारे यांनी भाऊ संजय यांना निवडणुकीत उभे केल्याने त्यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होती. मात्र घराणेशाहीची झालेली त्यांना भोवल्याचे मानले जाते. वैजापूर नगरपालिकेवर २५ वर्षे वर्चस्व राखणाऱ्या डॉ. दिनेश परदेशी यांना नागरिकांनी आणखी ५ वर्षे दिली. डॉ. परदेशी ३० वर्षांपासून राजकारणात असून, नगरसेवक, उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष अशी पदे त्यांनी पालिकेत भूषविली आहेत. ठाकरे गटाकडूनही डॉ. परदेशी यांना छुपे सहकार्य झाल्याची चर्चा आहे. याशिवाय शिंदे गटातील नाराज पदाधिकारीही डॉ. परदेशी यांच्याच बाजूने झुकलेले होते.
सिल्लोड सत्तारांचेच..., मुलाला नगराध्यक्ष, केलेच २५ जागी नगरसेवकही जिंकवले!
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मागूनही नागरिकांनी ती सिल्लोडमध्ये दिली नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपला शिकस्त खावी लागली आणि आ. अब्दुल सत्तारांनी सिल्लोडमध्ये आपलीच सत्ता राहील, हे दाखवून दिले. ही निवडणूक सत्तारांनी प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळेच त्यांनी मुलाला तर नगराध्यक्ष केलेच, पण २५ जागाही मिळवल्या. भाजपला अवघ्या ३ जागांवर समाधान मानावे लागले. आ. सत्तारांचे पूत्र अब्दुल समीर आता सिल्लोडमध्ये नगराध्यक्ष झाले आहेत. या निवडणुकीची धुरा भाजपने सुरेश बनकर यांच्या खांद्यावर सोपवली होती. सत्तारांचे राजकीय शत्रू रावसाहेब दानवे यांनी या निवडणुकीत भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना फारशी साथ दिली नाही. अगदी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांनी सिल्लोडमध्ये हजेरी लावली होती, तीही टीका होऊ लागली म्हणून.
गंगापूरमध्ये आ. बंब यांना झटका, आ. सतीश चव्हाणांनी का केली ही निवडणूक प्रतिष्ठेची...
गंगापूर नगरपालिका निवडणुकीत भाजप आमदार प्रशांत बंब यांना मतदारांनी झटका दिला. आ. सतीश चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा या निवडणुकीच्या निमित्ताने काढला. नगराध्यक्षपद अजित पवार गटाचे काबीज केले, पण ११ नगरसेवकही निवडून आणले. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत संजय जाधव यांनी भाजपच्या प्रदीप पाटील यांचा २२८७ मतांनी पराभव केला. संजय जाधव यांना ९७३९ तर प्रदीप पाटील यांना ७४८७ मते मिळाली. अजित पवार गटाचे ११, भाजपचे ७, ठाकरे गटाचा १ तर अपक्ष १ नगरसेवक निवडून आला आहे.
आ. संजना जाधव यांना कन्नडमध्ये धक्का, शिंदे गटाला अवघ्या ३ जागा, नगराध्यक्षपदाचा उमेदवारही पराभूत
कन्नडमध्ये आ. संजना जाधव यांना मोठा राजकीय धक्का बसला. त्यांनी नगराध्यक्षपदासाठी १८ उमेदवार रिंगणात उतरवले होते. मात्र त्यांचे केवळ ३ नगरसेवक निवडून आले. या निवडणुकीत अजित पवार गट आणि भाजपने युती केली होती, त्यांचे १५ नगरसेवक निवडून आले. नगराध्यक्षपद काँग्रेसकडे गेले असून, फरीन अब्दुल जावेद शेख या ८३५ मतांच्या फरकाने निवडून आल्या. त्यांना १२ हजार ७६१ मते मिळाली. काँग्रेसचे ६ नगरसेवक निवडून आले आहेत. या निवडणुकीत अजित पवार गटाच्या स्वाती संतोष कोल्हे (११ हजार ९०३ मते) या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या. भाजपने त्यांना सहकार्य केले नसल्याची चर्चा आहे. शिंदे गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अनिता कवडे (मते ४१०६) चक्क तिसऱ्या स्थानावर राहिल्या. या निवडणुकीत नवनिर्वाचित नगराध्यक्षा शेख फरीन यांचे पती अब्दुल जावेद हेही निवडून आले असून, शिंदे गटाच्या अनिता कवडे आणि त्यांचे पती काकासाहेब कवडे या दोघांनाही पराभव पाहावा लागला, तर स्वाती कोल्हे आणि त्यांचे पती संतोष कोल्हे यांनाही मतदारांनी नाकारले.

