- News
- सिटी क्राईम
- मैत्रीला डाग लावला, १७ वर्षांच्या मुलाला ब्लॅकमेल करत उकळले ३७ ग्रॅम सोने, जवाहरनगर पोलिसांनी तिघांच...
मैत्रीला डाग लावला, १७ वर्षांच्या मुलाला ब्लॅकमेल करत उकळले ३७ ग्रॅम सोने, जवाहरनगर पोलिसांनी तिघांच्या आवळल्या मुसक्या, दोघे दागिने घेऊन फरारी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मित्रही कसे कधी कधी घात करतात, याचे उदाहरण छत्रपती संभाजीनगरमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे मैत्री करतानाही डोळसपणे करावी, असे म्हटले जाते. १७ वर्षीय मुलासोबत मित्रांनी जे केले, ते धक्कादायक आहे. जवाहरनगर पोलिसांनी या प्रकरणात तिघांना अटक केली असून, दोघे फरारी आहेत. सर्व घटना फिल्मी वाटत असली तरी, ज्या मुलासोबत हे सर्व घडलं, त्या दरम्यानच्या काळातून मुलगा ज्या अवस्थेतून गेला, हे निश्चितच कुणासाठीही संतापजनक आहे.
गौरव ज्ञानेश्वर धनवडे (वय२१, रा. बजाजनगर, सारा अपार्टमेंट), वेदांत राजकुमार राठोड (वय २२, रा. खोकडपुरा), तेजस्वी विजय पवार (रा. शिवशंकर कॉलनी), अमित मनोहर महतो-राजपूत (वय २३), रोहन सुनिल उगले (रा. क्रांतीनगर) अशी या प्रकरणातील संशयितांची नावे आहेत. विशेष म्हणजे, संशयित उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत. यात गौरव हा बी.टेक. ला आहे. वेदांत बी.एस्सी.ला आहे. अमित बीसीए करतोय.
नक्की काय घडलं...
शिवशंकर कॉलनीत राहणाऱ्या १७ वर्षीय अमेयला (नाव बदलले आहे) त्याचा मित्र वेदांत राठोड हा मिलिंद कॉलेज परिसरात घेऊन गेला. तिथे दोघे गप्पा मारत असतानाच अचानक पोलीस आले. त्यांनी सोन्याच्या स्मगलिंगसाठी आल्याचा आरोप केला. तुझ्याकडे १ किलो सोने आहे, गुन्हा दाखल होणार, अशी भीती दाखवली. वेदांतने अमेयला धीर देण्याचे नाटक केले. माझ्या तेजस्वी नावाच्या मित्राच्या मामाचे पोलीस अधिकारी ओळखीचे आहेत, असे सांगून या प्रकरणातून बाहेर काढण्याचे आश्वासन दिले. ४ नोव्हेंबरच्या सकाळी ९ ला जबिंदा मैदानावर अमेयला तेजस्वी पवार, वेदांत राठोड, गौरव धनवडे भेटले. त्यांनी अमेयवर घरातून सोने घेऊन येण्यासाठी दबाव टाकला. अमेयने घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे २१ ग्रॅमचे गंठण, १६ ग्रॅम वजनाची गहूपोत असे एकूण ३७ ग्रॅमचे सोन्याचे दागिने ४ नोव्हेंबर व ६ नोव्हेंबरला भामट्यांना आणून दिले. मात्र त्यानंतरही गौरव हा अमेयकडे पैशांची मागणी करतच होता.
असा झाला भंडाफोड...
गौरवकडून होणाऱ्या पैशांच्या मागणीमुळे अमेय चिंतित झाला होता. त्याने त्याच्या जिवलग मित्रांना याबाबत सांगितले. मित्रांनी त्याला धीर देत तेजस्वी पवारला गाठले. त्याच्याकडे कसून चौकशी करताच त्याने सत्य कबूल केले. ज्या गौरवला तेजस्वीने त्याचा मामा असल्याचे सांगितले होते, तो त्याचा मामा नव्हता. मिलिंद कॉलेज परिसरात आलेले पोलीसही खरे नव्हते. कॉलवरील व्यक्तीही पोलीस नसून केवळ अमेयकडून पैसे, दागिने उकळण्यासाठी सर्वांनी मिळून कुभांड रचल्याचे सांगितले. त्यानंतर हे सर्व प्रकरण अमेयच्या घरी सांगण्यात आले. त्यानंतर अमेयच्या वडिलांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात १५ डिसेंबरला तक्रार दिली.
जवाहरनगर पोलिसांनी भामट्यांना केली अटक...
जवाहरनगर पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेऊन तातडीने गुन्हा दाखल करून गुरुवारी (१८ डिसेंबर) गौरव धनवडे, वेदांत राठोड यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना २ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. कोठडीतील चौकशीत दोघांनी तेजस्वी पवार, अमित महतो, रोहन उगले यांचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली त्यांनी दिली. गुन्ह्यातील ३ तोळे ७ ग्रॅम सोने रोहन उगलेकडे असल्याचे सांगितले. रोहन उगले व तेजस्वी पवार फरारी आहेत. त्यांनी गुन्ह्यात वापरलेली यामाहा कंपनीची मोटारसायकल व सुझुकी कंपनीची स्कुटी पोलिसांनी जप्त केली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक पोलीस आयुक्त मनिष कल्याणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब वाघ, पोलीस अंमलदार मारोती गोरे, संदीप बिलारी यांनी पार पाडली.

