- News
- पॉलिटिक्स
- ठाकरे गट आता ‘उबाठा मामू', रशीद मामूंच्या प्रवेशानंतर मंत्री सावे, शिरसाटांची जहरी टीका!, मुस्लिम मत...
ठाकरे गट आता ‘उबाठा मामू', रशीद मामूंच्या प्रवेशानंतर मंत्री सावे, शिरसाटांची जहरी टीका!, मुस्लिम मतांसाठी लोकसभा, विधानसभेनंतर आता मनपा निवडणुकीत ठाकरे गटाकडून प्रयत्न!!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाला पुन्हा एकदा मुस्लिम मतांची आठवण झाली आहे. लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांनी मुस्लिम मते पदरात पाडण्यासाठी मुस्लिम नेत्यांच्या भेटीगाठी वाढवल्या होत्या. विधानसभा निवडणुकीतही ठाकरे गटाने पश्चिम आणि मध्य मतदारसंघात विजयासाठी मुस्लिम मते मिळतील, यासाठी धडपड केली होती. आता पुन्हा महापालिका निवडणुकीत मुस्लिम मतांसाठी ठाकरे गटाने हालचाली वाढवल्या असून, यातील पहिला प्रयत्न म्हणजे, काँग्रेसचे माजी महापौर रशीद मामू यांना पक्षात प्रवेश देण्यात आला.
रशिद मामू आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी पक्षात स्वागत केले. या वेळी आ. अंबादास दानवे, उपजिल्हाप्रमुख किशोर कच्छवाह व उपशहरप्रमुख गणेश लोखंडे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, या प्रवेशावरून शिंदे गटाला ठाकरे गटावर टीका करण्याची आयतीच संधी मिळाली. ही सेना ‘उबाठा मामू' झाल्याची जहरी टीका मंत्री संजय शिरसाट यांनी केली. हिंदुत्वाच्या बाता मारणाऱ्यांना आता मतांच्या गणितासाठी मामूंची गरज लागली, असे शिरसाट म्हणाले. मंत्री अतुल सावे म्हणाले, की ज्यांनी ‘वंदे मातरम'ला विरोध केला त्यांना पक्षात घेऊन सेनेने आपले नाव ‘उबाठा मामू'करून घेतले आहे.
दानवेंकडून प्रत्युत्तर...
मंत्री सावे आणि शिरसाट यांना आ. अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, की रशीद मामू हे गणेशोत्सवात सहभागी होणारे आणि सामान्यांत मिसळणारे नेते आहेत. टीका करणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, अशा शब्दांत सुनावले. महापालिका निवडणुकीत मुस्लिम मते निर्णायक आहेत. ही मते एमआयएमकडे जातात. त्यातील काही अंशी जरी मते ठाकरे गटाला मिळाली तर ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या विजयाची शक्यता वाढू शकते, असे गणित यामागे लावल्याचे दिसून येते.
ठाकरे गटाकडून ‘वंचित'ला विचारणा...
वंचित बहुजन आघाडीला काँग्रेसपाठोपाठ ठाकरे गटानेही ऑफर दिली आहे. आ.अंबादास दानवे यांच्याकडून ‘वंचित'ला चर्चेसाठी पाचारण केले असून, तसा निरोप राजू वैद्य यांनी दिल्याचे ‘वंचित’चे जिल्हा निरीक्षक योगेश बन यांनी सांगितले. आज आ. दानवे यांच्यात बैठक होणार असल्याचेही बन यांनी सांगितले.
काँग्रेसने घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती...
काँग्रेसतर्फे शनिवारी गांधी भवनात इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. काँग्रेसकडे सुमारे ३०० इच्छुकांनी अर्ज केले होते. अर्जासाठी शुल्क आकारून पक्षासाठी निधी जमा करण्यात आला. निवड मंडळात ३६ सदस्य होते. प्रत्येक उमेदवार निवडणूक लढण्यासाठी पक्षाकडून किती निधी मिळेल, असा प्रश्न करत होता. सकाळी ११ पासून सायंकाळी ६ पर्यंत मुलाखती चालल्या. शहरजिल्हाध्यक्ष तथा निवड मंडळाचे अध्यक्ष शेख युसूफ यांच्या अध्यक्षतेखाली व खा. डॉ. कल्याण काळे, जिल्हा निरीक्षक डॉ. वजाहत मिर्झा, मध्य विधानसभा प्रभारी रिजवान सौदागर, पूर्व विधानसभा प्रभारी विद्या पाटील व पश्चिम विधानसभा प्रभारी सुरेंद्र घोडजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुलाखती घेण्यात आल्या. एम. एम. शेख, कमाल फारुकी, इब्राहिम पठाण, डॉ. जितेंद्र देहाडे, अशोक डोळस, डॉ. सरताज पठाण, अॅड. सय्यद अक्रम, ब्लॉक अध्यक्ष भाऊसाहेब जगताप, इब्राहिम पटेल, उमाकांत खोतकर, किशोर तुलसीबागवाले, दीपाली मिसाळ, शेख अथर, मोईन इनामदार, योगेश थोरात, सागर नागरे, अभिषेक शिंदे आदींचा निवड मंडळात सहभाग होता. सूत्रसंचालन शहर काँग्रेसचे संघटन महासचिव विशाल बन्सवाल यांनी केले.

