- News
- पॉलिटिक्स
- भाजप-शिंदे गटात ५० जागांवर तोडगा निघाला, आता उर्वरित जागांचा पेच सोडविण्यासाठी नेमली समिती, ‘रिपाइं’...
भाजप-शिंदे गटात ५० जागांवर तोडगा निघाला, आता उर्वरित जागांचा पेच सोडविण्यासाठी नेमली समिती, ‘रिपाइं’ला झुलवणे सुरूच...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिका निवडणूक महायुती करून लढण्यासाठी भाजप-शिंदे गटाच्या दोन्ही मंत्र्यांसह पदाधिकाऱ्यांची तिसरी बैठक शनिवारी (२० डिसेंबर) जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये झाली. या वेळी दोन्ही पक्षांत ५० जागांवर तोडगा निघाल्याचे सांगण्यात आले. उर्वरित जागांवर निर्णय घेण्यासाठी दोन्ही पक्षांतील चार पदाधिकाऱ्यांची एक समिती आज, २१ डिसेंबरपासून चर्चा करणार आहे. जागा वाटपाचे गुऱ्हाळ लांबणार असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. २२ डिसेंबरपर्यंत महायुतीच्या जागा अंतिम करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री संजय शिरसाट आणि मंत्री अतुल सावे यांनी नंतर संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
बैठकीला शिंदे गटाकडून मंत्री संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, माजी आमदार किशनचंद तनवाणी, निरीक्षक विलास पारकर, महापौर नंदकुमार घोडेले, विकास जैन, हर्षदा शिरसाट व ऋषिकेश जैस्वाल उपस्थित होते. भाजपकडून मंत्री अतुल सावे, खा. डॉ. भागवत कराड, आ. संजय केणेकर, शहराध्यक्ष किशोर शितोळे, समीर राजूरकर, शिरीष बोराळकर, प्रशांत देसरडा यांची उपस्थिती होती.
बैठक या २ मुद्द्यांभोवती फिरली...
१.दोन्ही पक्षांचे उमेदवारीसाठी इच्छुक माजी नगरसेवक कोण आहेत?
२.सर्व प्रभागांतील एका एका जागेबद्दल चर्चा, प्रबळ उमेदवार कोण, जागा दोन्हीपैकी कोणालाही सुटली तरी विजय कसा होईल?
८ जणांची संयुक्त समिती करणार अभ्यास...
५० जागांवर तोडगा निघाला असला तरी अन्य जागांवर पेच कायम असल्याने कोणत्या प्रभागात कोणत्या पक्षाचे वजन आहे आणि तिथे निवडून येण्याची शक्यता त्या पक्षाची किती आहे, हे अभ्यासले जाणार आहे. त्यासाठी नवीन समिती स्थापन करण्यात आली. या समितीत शिंदे गटाकडून माजी आमदार किशनचंद तनवाणी, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, माजी महापौर विकास जैन, ऋषिकेश जैस्वाल, तर भाजपकडून समीर राजूरकर, शिरीष बोराळकर, किशोर शितोळे आणि प्रशांत देसरडा यांचा समावेश आहे. छोटा भाऊ-मोठा भाऊ भेद बाजूला ठेवून महायुतीची सत्ता मनपात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे मंत्री सावे यांनी म्हटले आहे.
खुर्चीची ओढाओढी...
बैठकीला मंत्री अतुल सावे थोडे उशीरा पोहोचले. त्यांना बसायला जागा नव्हती. राजेंद्र जंजाळ यांनी स्वतः उठून त्यांना खुर्ची दिली. त्यावेळी सावे यांनी केणेकरांना टोला मारला, तुम्ही तर खुर्ची देत नव्हता. त्यावर केणेकर म्हणाले, मी उठलोच होतो...
रिपाइं वेटिंगवर, घालमेल वाढली...
आमच्यातील जागा वाटप अंतिम झाले की महायुतीतील घटक पक्षांशी बोलणार,अशी भूमिका मंत्री अतुल सावे यांनी घेतल्याने रिपाइं आठवले गटातील इच्छुकांची घालमेल वाढली आहे. महायुतीत नक्की किती आणि कोणत्या जागा मिळणार, असा प्रश्न त्यांना पडला आहे. आणखी दोन दिवस वाट बघू अन्यथा आम्हाला महाविकास आघाडीसोबत जाण्याचा पर्याय आहे, असा पवित्रा रिपाइंचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांनी घेतला. दुसऱ्या पक्षांनी इच्छुक उमेदवारांना अर्ज वाटप केले. त्यांच्या मुलाखतीही झाल्या. आम्हाला झुलवणे सुरू आहे. आम्हालाही ठाकरे गटाकडून बोलावणे आले आहे, असे कदम म्हणाले. ही बाब आम्ही पक्षप्रमुख रामदास आठवले यांना कळवली असून, त्यांनीही खंत व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलतो असे म्हटल्याचे कदम यांनी सांगितले.
अजित पवार गटाकडून स्वबळाची तयारी?
महायुतीत अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळण्याची शक्यता गृहित धरून अजित पवार गटाने स्वबळाची तयारी सुरू केल्याचे चित्र आहे. शनिवारी पक्षाने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी युती न झाल्यास स्वतंत्र लढण्याची तयारी आहे का, असा प्रश्न प्रत्येक उमेदवाराला करण्यात आला. जिल्हाध्यक्ष आ. सतीश चव्हाण, शहराध्यक्ष अभिजित देशमुख, मराठवाडा युवक अध्यक्ष दत्ता भांगे, दिलीप बनकर, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, व्हीजेएनटी सेलचे अध्यक्ष रविकांत राठोड, महिला शहराध्यक्ष भाग्यश्री राजपूत, नागेश भालेराव, शेख कय्युम अहमद आदींनी मुलाखती घेतल्या.
रिपब्लिकन सेना शिंदे गटासोबत...
रिपब्लिकन सेना शिंदे गटासोबत युती करत आहेत. पक्षाचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगरमधील इच्छुकांच्या मुलाखतीत मुंबईत घेतल्या. जागांबद्दल दोन-तीन दिवसांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलणी होणार असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.

