- News
- राज्य-राष्ट्र स्पेशल
- छत्रपती संभाजीनगरमध्ये युवकाचा लग्नाच्या आमिषाने महिला पोलिसावर लैंगिक अत्याचार, व्हिडीओ बनवून १५ ला...
छत्रपती संभाजीनगरमध्ये युवकाचा लग्नाच्या आमिषाने महिला पोलिसावर लैंगिक अत्याचार, व्हिडीओ बनवून १५ लाख रुपये उकळले!
नागपूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मॅरिड असूनही मॅट्रीमनी साइटवर नावनोंदणी करून त्याआधारे ओळख झालेल्या महिला पोलिसावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथील ३० वर्षीय युवकाविरुद्ध नागपूरच्या लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महिला पोलिसाने तिच्या घरी, नागपूरमधील एका हॉटेलसह छत्रपती संभाजीनगरला नेऊनही लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप युवकावर केला आहे.
विकिन सूर्यभान फुलारे (वय ३०, रा. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे संशयिताचे नाव आहे. महिला पोलिसाच्या तक्रारीनुसार, त्यांनी विवाह संकेतस्थळावर नोंदणी केली होती. विवाहित असूनही विकिननेसुद्धा त्याच विवाह संकेतस्थळावर नोंदणी केलेली होती. महिलेची प्रोफाइल पाहून त्याने गेल्या जुलै महिन्यात तिच्याशी संपर्क केला आणि लग्नाची तयारी दर्शवली. आपण अविवाहित असून, वकील असल्याची बतावणी त्याने केली. दोघांत बोलणे सुरू झाल्यानंतर काही काळाने तो नागपूरला आला. तिच्या घरी त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
त्यानंतर लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्येही त्याने तिला नेऊन लैंगिक अत्याचार केला. त्याने महिलेला छत्रपती संभाजीनगरला नेऊनदेखील लैंगिक अत्याचार केला. यादरम्यान तो महिलेकडे विविध कारणांसाठी पैसे मागू लागला. तिने त्याच्यावर विश्वास ठेवून साडेपंधरा लाख रुपये दिले. मात्र, त्याचे लग्न झाले असून त्याला दोन मुले असल्याचे कळल्यावर तिला धक्काच बसला. तिने विकिनला जाब विचारला असता त्याने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आणखी पाच लाख रुपयांची मागणी केली. कुटुंबातील सदस्यांना मारण्याचीदेखील धमकी दिली. महिलेने लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी विकिनविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

