- News
- सिटी क्राईम
- रांजणगाव शेणपुंजीत संताप : घरात एकटी पाहून १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न!; बांधकाम मजु...
रांजणगाव शेणपुंजीत संताप : घरात एकटी पाहून १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न!; बांधकाम मजुराचे कृत्य
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : १६ वर्षीय मुलीला एकटे पाहून घरात घुसलेल्या बांधकाम मजुराने तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव शेणपुंजीत शुक्रवारी (१९ डिसेंबर) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. मुलीच्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलिसांनी नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रुपचंद चोरमारे (वय अंदाजे २५, रा. आंबेलोहळ, ता. गंगापूर) असे संशयिताचे नाव आहे. त्याला विवाहित असून, दोन मुले आहेत. तक्रारीनुसार, पीडित मुलगी आई, भावासह राहते. तिची आई खासगी कंपनीत कामाला जाते. घटना घडली तेव्हा मुलीची आई कंपनीत आणि भाऊ बाहेरगावी गेलेला होता. बांधकाम ठेकेदाराच्या हाताखाली काम करणारा रुपचंद मुलीला एकटी पाहून घरात घुसला.
तिला जवळ ओढून अश्लील चाळे करू लागला. त्यामुळे घाबरून मुलीने आरडाओरड केली असता त्याने तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. मुलीने त्याला ढकलून घराबाहेर पळ काढला. त्यामुळे रुपचंद तिथून पळून गेला. कामावरून घरी आलेल्या आईने मुलगी रडत असल्याचे पाहून विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तिच्या आईने तिला घेऊन पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून रुपचंदचा शोध सुरू केला आहे. अधिक तपास केला जात आहे.

