- News
- जिल्हा न्यूज
- वैजापूरमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय!; डॉ. परदेशींनी विधानसभेचा हिशेब केला चुकता!
वैजापूरमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय!; डॉ. परदेशींनी विधानसभेचा हिशेब केला चुकता!
वैजापूर (गणेश म्हैसमाळे : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वैजापूर नगरपालिका निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय प्राप्त केला. भाजपचे डॉ. दिनेश परदेशी यांनी ६,२८८ मतांच्या मोठ्या फरकाने शिंदे गटाचे उमेदवार आणि विद्यमान आमदार रमेश बोरनारे यांचे सख्खे बंधू संजय बोरनारे यांचा पराभव केला. डॉ. परदेशींना १८०२८ तर संजय बोरनारे यांना ११ हजार ७८० मते मिळाली. काँग्रेसचा उमेदवार सुभाष गायकवाड यांना अवघ्या १०४७ मतांवर समाधानी राहावे लागले.

या निवडणुकीत वैजापूरमध्ये भाजपने सर्वाधिक ११ नगरसेवक पदे काबीज केली आहेत. शिंदे गटाचे १० तर अजित पवार गटाचे ४ नगरसेवक निवडून आले आहे. आ. रमेश बोरनारे यांनी भाऊ संजय यांना निवडणुकीत उभे केल्याने त्यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होती. मात्र घराणेशाहीची झालेली त्यांना भोवल्याचे मानले जाते. वैजापूर नगरपालिकेवर २५ वर्षे वर्चस्व राखणाऱ्या डॉ. दिनेश परदेशी यांना नागरिकांनी आणखी ५ वर्षे दिली. डॉ. परदेशी ३० वर्षांपासून राजकारणात असून, नगरसेवक, उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष अशी पदे त्यांनी पालिकेत भूषविली आहेत. ठाकरे गटाकडूनही डॉ. परदेशी यांना छुपे सहकार्य झाल्याची चर्चा आहे. याशिवाय शिंदे गटातील नाराज पदाधिकारीही डॉ. परदेशी यांच्याच बाजूने झुकलेले होते.
सिल्लोड सत्तारांचेच..., मुलाला नगराध्यक्ष, केलेच २५ जागी नगरसेवकही जिंकवले!
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मागूनही नागरिकांनी ती सिल्लोडमध्ये दिली नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपला शिकस्त खावी लागली आणि आ. अब्दुल सत्तारांनी सिल्लोडमध्ये आपलीच सत्ता राहील, हे दाखवून दिले. ही निवडणूक सत्तारांनी प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळेच त्यांनी मुलाला तर नगराध्यक्ष केलेच, पण २५ जागाही मिळवल्या. भाजपला अवघ्या ३ जागांवर समाधान मानावे लागले. आ. सत्तारांचे पूत्र अब्दुल समीर आता सिल्लोडमध्ये नगराध्यक्ष झाले आहेत. या निवडणुकीची धुरा भाजपने सुरेश बनकर यांच्या खांद्यावर सोपवली होती. सत्तारांचे राजकीय शत्रू रावसाहेब दानवे यांनी या निवडणुकीत भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना फारशी साथ दिली नाही. अगदी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांनी सिल्लोडमध्ये हजेरी लावली होती, तीही टीका होऊ लागली म्हणून.

