उदय सामंत, चंद्रशेखर बावनकुळे छ. संभाजीनगरात : भुमरेंच्या चालकाला १५० कोटींच्या जमीन दानप्रकरणाची चौकशी महसूल विभाग करणार; बावनकुळे यांची घोषणा; महापालिका निवडणूक युतीतच लढणार  : सामंत

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : खासदार संदिपान भुमरे यांचा चालक जावेद रसूल शेख याला हैदराबादच्या प्रसिद्ध सालारजंग यांच्या कुटुंबाने १५० कोटींची जमीन भेट दिल्यावरून वादावर बोलताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी (७ ऑगस्ट) छत्रपती संभाजीनगरमध्ये महसूल विभाग चौकशी करणार असल्याचे स्‍पष्ट केले.

जावेद रसूल शेख गेल्या १३ वर्षांपासून खासदार संदिपान भुमरे आणि आमदार पुत्र विलास भुमरे यांची गाडी चालवत आहेत. सालार जंग कुटुंबाने छत्रपती संभाजीनगरमधील जालना रोडवरील दाऊदपुरा येथील मौल्यवान जमीन त्‍यांना दान केली आहे. तसा हिबानामा म्हणजेच दानपत्र केले आहे. हिबानामा रक्‍ताच्या नात्‍यातच केला जातो. शेख यांचा सालार जंग यांच्या कुटुंबाशी कोणताही संबंध नाही, मग ते मौल्यवान मालमत्ता का देतील?, असा सवाल हे प्रकरण चव्हाट्यावर आणणाऱ्या वकील मुजाहिद खान यांनी केला आहे. आता यापूर्वी शहर आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाची चौकशी करून पाहिली मात्र चौकशी अपेक्षित तपासापर्यंत गेलीच नाही. शेख आणि सालार जंग कुटुंबीय आपापल्या दाव्यावर ठाम राहिले. त्‍यानंतर आयकर विभागाने शेख यांना नोटीस बजावली आहे. आता महसूलमंत्र्यांनी चौकशीची घोषणा केल्याने हे प्रकरण इतक्यात संपणारे नाही, असे दिसून येते.

भाजपसोबत मतभेद नाहीत : उदय सामंत
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुका युतीत आणि युतीच्या नीतीनुसारच लढवल्या जातील, अशी स्‍पष्टोक्‍ती राज्‍याचे उद्योगमंत्री तथा शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी गुरुवारी (७ ऑगस्ट) छत्रपती संभाजीनगरातील पत्रकार परिषदेत केली. सामंत यांनी छत्रपती संभाजीनगर, जालना शहर- जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्‍यांनी आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्‍यानंतर पत्रपरिषदेत त्‍यांना शिंदे गटाच्या मंत्र्यांची प्रकरणे बाहेर काढून अडचणीत आणले जात असल्याबद्दल विचारणा केली असता ते म्हणाले, की आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत.

घरासाठी खोदकाम केल्यास दंड नाही...
घरासाठी खोदकाम केले व तेथून मुरूम काढल्यानंतर यापुढे दंड आकारण्यात येणार नाही. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना शासन आदेशानुसार पत्र काढण्यास सांगितल्याची माहितीही महसूलमंत्र्यांनी दिली. शरद पवार यांच्याकडे निवडणूक लढण्यासाठी माणसे नाहीत. काँग्रेसमधील नेते भाजपमध्ये येत आहेत, असे बावनकुळे म्हणाले. या वेळी किशोर शितोळे, अनिल मकरिये आदींची उपस्थिती होती.  लाडकी बहीण योजनेतील चुकीच्या अर्जाची तपासणी होत असल्याचे बावनकुळे म्हणाले. गुंठेवारी नियमितीकरणासाठी जास्तीचे शुल्क लागत असल्याबद्दल ते म्हणाले, की याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. तुकडेबंदीबाबत लवकरच निर्णय होईल.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सातारा पोलिसांची मोठी कामगिरी : ६ लाखांचा गांजा साठा जप्त, तस्कराच्या मुसक्या आवळल्या, साथीदार फरारी

Latest News

सातारा पोलिसांची मोठी कामगिरी : ६ लाखांचा गांजा साठा जप्त, तस्कराच्या मुसक्या आवळल्या, साथीदार फरारी सातारा पोलिसांची मोठी कामगिरी : ६ लाखांचा गांजा साठा जप्त, तस्कराच्या मुसक्या आवळल्या, साथीदार फरारी
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा गाव आणि पैठण तालुक्‍यातील गेवराई बुद्रूकमध्ये सातारा पोलिसांनी मोठी कारवाई करत...
तरुणीने दोन दिवसांपूर्वी मोबाइल घेतला, कामावरून घरी येताना दुचाकीस्वाराने हिसकावून ठोकली धूम!, एएस क्लबजवळील घटना
महत्त्वाची बातमी : छ. संभाजीनगरात ‘म्हाडा’ सोडत अर्ज भरण्यास ८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
छ. संभाजीनगर जिल्ह्यातील शाळांत आता रोज एक तास खेळासाठी; जिल्हाधिकारी स्वामी यांची घोषणा
शेजाऱ्याच्या छतावर बसवलेल्या मोबाईल टॉवरमुळे तुमचे आरोग्य धोक्यात! रेडिएशन किती?, कुठे कराल तक्रार?
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software