- Marathi News
- जिल्हा न्यूज
- Full Story : सिल्लोड रजिस्ट्री कार्यालयात हद्दच झाली... चक्क पोलीस अंमलदाराकडेच ५८ हजारांची लाच मागि...
Full Story : सिल्लोड रजिस्ट्री कार्यालयात हद्दच झाली... चक्क पोलीस अंमलदाराकडेच ५८ हजारांची लाच मागितली, रजिस्ट्रार काळेसाठी पैसे घेताच एजंट सांडू शेलारला रंगेहात पकडले!

सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : रजिस्ट्रार काळेसाठी ५८ हजारांची लाच घेताना एजंट सांडू नारायण शेलार, वय ४६, रा. समतानगर, सिल्लोड) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. सिल्लोड रजिस्ट्री ऑफीससमोरील मार्केट यार्ड परिसरातील खोलीत शुक्रवारी (२९ ऑगस्ट) दुपारी अडीचला ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सिल्लोड शहर पोलिसांनी शेलारविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली असली तरी, रजिस्ट्रार काळेला मात्र मोकाट सोडले आहे.
गुरुवारी दुपारी दोनला एसीबीचे पोलीस निरीक्षक केशव दिंडे व सापळा पथक खासगी गाडीने सिल्लोडला आले. सर्वांना पोलीस निरीक्षक दिंडे यांनी लाचमागणी पडताळणी व सापळा कारवाईच्या अनुषंगाने सूचना दिल्या. त्यानंतर व्हाईस रेकॉर्डरमध्ये नवीन मेमरीकार्ड टाकून व्हाईस रेकॉर्डर चालू करून पोलीस अंमलदारांच्या अंगावर लपवून दिला. सोबत शासकीय पंचालाही पाठवले. दोघांनी शेलारची भेट घेतली. मात्र त्याने उद्या या आपण काम करू व साहेबांना भेटू, असे म्हणून शुक्रवारी बोलावले. त्यानंतर शुक्रवारी शेलारने बोलाविल्याप्रमाणे सापळा पथक पुन्हा दुपारी १२ ला सिल्लोडला दाखल झाले.
पोलीस निरीक्षक दिंडे यांनी पुन्हा व्हाईस रेकॉर्डर पोलीस अंमलदारांच्या अंगावरील कपड्यात लपवून दिला. पंच व पोलीस अंमलदार हे शेलारकडे आले. रजिस्ट्री ऑफीससमोरील मार्केट यार्ड परिसरातील एका खोलीत त्यांची भेट झाली. शेलारने दोन गुंठे जमीन खरेदीच्या अनुषंगाने साक्षीदार, खरेदी- विक्रीदाराचे फोटो, कागदपत्रे या बाबत चर्चा केली. त्यावेळी पोलीस अंमलदारांनी शेलारला विनंती केली, की साहेबाला भेटून थोडं फार कमी, माझ्या ओळखीनी काही कमी झाले तं, त्यावेळी शेलार बोलले की, तुम्ही बोलू नका. कोणता अधिकारी बोलतो बरं, पैशाचं असं... असे समजावून सांगितले. त्यावेळी पोलीस अंमलदारांनी तुम्ही बोला, असे सांगितले. त्यावेळी परत शेलार म्हणाला, की तुम्ही सांगा तं, कोणता अधिकारी बोलतो, पैशाचं, असे म्हणून रजिस्ट्रार काळे यांना भेटू देण्यास मनाई केली.
त्यावेळी पोलीस अंमलदारांनी मिसेस येऊ लागली, बस स्टँडवरून घेऊन येतो, असे सांगून सापळा पथक थांबलेल्या ठिकाणी आले. पोलीस निरीक्षक दिंडे यांच्याकडे व्हाईस रेकॉर्डर दिला. त्यानंतर लगेचच शेलारचा पोलीस अंमलदारांना फोन आला. त्याने पोलीस अंमलदारांना तत्काळ पैसे घेऊन येण्यास सांगितले. त्यावेळी पोलीस अंमलदारांनी सांगितले, की मिसेसनी पैसेच कमी आणले. मिसेस माझ्यावर चिडू राहिली, असे बोललो तर त्याने पहा मग तुमची इच्छा, असे म्हटले. त्यावेळी पोलीस अंमलदारांनी त्याला परत किती आणू मग, असे विचारले असता त्याने २ हजार कमी दे भाऊ, बाकी बघा तुम्ही... असे सांगितले. त्यावेळी २ हजार कमी ६८ का, असे बोलले तर त्याने हो म्हटले.
...अन् शेलार जाळ्यात!
पोलीस अंमलदारांनी नातेवाइकाकडून ७० हजार रुपये रोख घेऊन ते एसीबी पथकाकडे दिले. नोटांचे नंबर कागदावर लिहून घेऊन त्या नोटांना अॅन्थ्रॉसीन पावडर लावून एसीबीने पोलीस अंमलदारांच्या पॅन्टच्या उजव्या खिशात ठेवून दिल्या. त्यानंतर व्हाईस रकॉर्डर त्यांच्या अंगावर लपवून दिले. शेलारने चलनाची व लाचेची रक्कम देण्यासाठी दुपारी सव्वा दोनला बोलावले. पोलीस अंमलदार व पंच रजिस्ट्री कार्यालयासमोरील मार्केट यार्ड परिसरातील खोलीत जाऊन शेलारला भेटले. त्यावेळी शेलारने द्या पटकन अन् मोकळं व्हा ना... त्याला काय लागतं आता... त्यावेळी पोलीस अंमलदारांनी ६८ हजार रुपये शेलारकडे दिले. त्याने पैसे स्वीकारताच पोलीस अंमलदारांनी ठरल्याप्रमाणे खिशातून हात रूमाल डाव्या हाताने चेहरा पुसला अन् इशारा कळताच पोलीस निरीक्षक दिंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेलारकडे धाव घेत त्याच्या मुसक्या आवळल्या. अधिक तपास पोलीस निरीक्षक शेषराव उदर करत आहेत.
रजिस्ट्रार काळे सोडला मोकाट...
या प्रकरणात पोलिसांनी रजिस्ट्रार काळेला मोकाट सोडल्याचे दिसून येत आहे. शेलारने रजिस्ट्रारचा उल्लेख करूनही त्याला या प्रकरणात आरोपी केलेले नाही. यापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयात केलेल्या कारवाईत एसीबीने थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांना आरोपी केले आहे. त्यामुळे ते दोन्ही अधिकारी निलंबित झाले आहेत. रजिस्ट्रार काळेला अभय का देण्यात आले, हे कळायला मार्ग नाही. विशेष म्हणजे, या प्रकरणाच्या गुन्ह्यातही रजिस्ट्रार काळेच्या नावाचा उल्लेख आहे.