- Marathi News
- जिल्हा न्यूज
- अजिंठा घाटात भीषण अपघात : ट्रॅव्हल्स बस-ट्रकमध्ये अडकून कारचा चेंदामेंदा, ४ गंभीर
अजिंठा घाटात भीषण अपघात : ट्रॅव्हल्स बस-ट्रकमध्ये अडकून कारचा चेंदामेंदा, ४ गंभीर
On

सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : ट्रॅव्हल्स बस, कार आणि ट्रक यांचा भीषण अपघात होऊन कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. कारमधील २ महिलांसह २ पुरुष गंभीर जखमी झाले. हा भीषण अपघात अजिंठा घाटात शुक्रवारी (२९ ऑगस्ट) सकाळी साडेसहाच्या सुमारास घडला.
ट्रक (क्र. टीएन ३४ एझेड १२८५) अजिंठा घाट चढत होता. त्याला साइड देण्यासाठी कार (क्र. एमएच १९ एएक्स ५६६६) थांबली. त्याचवेळी मागे असलेल्या ट्रॅव्हल्स बसने (क्र. एमएच ०९ सीव्ही ६३९७) कारला धडक दिली. कार बसच्या मागील चाकात अडकली अन् सुमारे दीडशे फूट फरफटत गेली. ट्रक आणि बसमध्ये कार दबली. कार चक्काचूर झाली. अपघात होताच ट्रॅव्हल्सचालक पळून गेला. ट्रॅव्हल घाटातही सुसाट होती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. कारमधील शारदा भूषण पाटील (वय ३५), शोभाबाई नवलसिंग कोडी (वय ६५), रत्नाकर श्रीराम पारे (वय ४२) व भूषण रवींद्र पाटील (वय ३५, सर्व रा. उधळी, ता. रावेर, जि. जळगाव) गंभीर जखमी झाले.
सामाजिक कार्यकर्ते आरीफ मेवाती, मोहम्मद बावजीर, सय्यद रहीम, अकील शेख, राजिक शेख, अतिक शेख यांनी मदतीला धावून येत ट्रकच्या बेल्टने कारचे पत्रे ओढून जखमींना बाहेर काढले. त्यांना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात आणि नंतर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातावेळी खा. रक्षा खडसे या अजिंठा घाटातूनच प्रवास करत होत्या. त्यांनी वाहन थांबवून अपघाताची पाहणी केली. अजिंठा पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल राम आडे, दिलीप तडवी, विकास दुबिले आदींसह होमगार्ड घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे तासभर वाहतूक ठप्प झाली होती.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
सूट असो किंवा जीन्स... आता कपडे नाही तर कपाळ पाहून लावा टिकली
By City News Desk
पित्यानेच ८ महिन्यांच्या बाळाला घेतले चावे!, नारेगावची धक्कादायक घटना
By City News Desk
चिकलठाण्यात खून!; खाणावळीतच मित्राचे मित्रावर चाकूने सपासप वार
By City News Desk
Latest News
30 Aug 2025 22:31:54
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा गाव आणि पैठण तालुक्यातील गेवराई बुद्रूकमध्ये सातारा पोलिसांनी मोठी कारवाई करत...