- News
- पॉलिटिक्स
- खा. संदिपान भुमरेंनी अंबादास दानवेंना बजावली १ कोटीच्या अब्रुनुकसानीची नोटीस!
खा. संदिपान भुमरेंनी अंबादास दानवेंना बजावली १ कोटीच्या अब्रुनुकसानीची नोटीस!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : खासदार संदीपान भुमरे यांच्या वतीने वाहनचालक जावेद रसूल शेख यांनी ॲड. संदीप गव्हाणे यांच्यामार्फत ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) नोटीस बजावली असून, ७ दिवसांत दिलगिरी व्यक्त न केल्यास १ कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे नोटिसीत म्हटले आहे.
काय आहे प्रकरण...
छत्रपती संभाजीनगर शहराजवळील जटवाडा- जोगवाडा भागातील जमीन लता सूर्यभान वाघामारे यांचे खापर पंजोबा दिवंगत पावण्या भिका वाघमारे यांच्या नावे व हक्कात २३ एकर ३० गुंठे जमीन होती. ते या जमिनीचे प्रतिबंधित मालक होते. हैदराबाद संस्थानात ती त्यांना बहाल करण्यात आली होती. १९५७ मध्ये प्रमाणपत्राच्या आधारे बहाल केलेली जमीन त्यांच्या मृत्यूनंतर पडीक होती. ही जमीन पुढे महाराष्ट्र विकास मंडळास संपादीत करून देण्यात आली होती. समृद्धी महामार्गासाठी ही जमीन अधिग्रहित करण्याचे आदेश झाल्यानंतर त्याचे बाजारमूल्य ११५० कोटी रुपये इतके निश्चित करण्यात आले.
जावेद माझा वाहनचालक असल्याचे मी नाकारत नाही. मात्र दानवे यांनी माहिती घेऊन आरोप करायला हवे होते. जिल्हा हातातून गेला, आता आमदारही राहिले नाहीत. विरोधी पक्षनेत्याच्या लवाजम्याची सवय होती. तीही गेली. आता त्यांना कुणीही विचारत नाही. त्यामुळे संतुलन बिघडून दानवे खोटे बोलत आहेत. माझ्या चालकाची जन्मतारीख १९८४ आहे आणि हिबानामा १९७१ मध्ये झाला आहे. त्यावेळी जावेद जगातही आला नव्हता. शासकीय यंत्रणेचा गैरवापर झाला असेल, तर प्रकरणाची चौकशी व्हावी. दानवे यांनी केलेल्या आरोपांचे पुराव्यानिशी उत्तर द्यावे. १७४ हा गट क्रमांकच नाही. १५४ गटाचे वाद सुरू आहेत, त्याचा मोबदला (पैसे) कोर्टात जमा आहे. गट फक्त १७१ पर्यंतच आहेत. मग हिबानामा कसा होऊ शकतो? ज्या १५४ गटाचे कोर्टात वाद आहेत, ते लोक वेगळे आहेत, असे भुमरे म्हणाले होते.
-दरम्यान, या प्रकरणासंदर्भात प्रशासकीय सूत्रांनी सांगितले, की जोगवाडामध्ये १७४ गट क्र. आहे. जटवाडामध्ये ८९ गट नंबर आहे. गटांचे एकत्रीकरण झाल्यानंतर जुन्या गटांचे अस्तित्व संपले. महिलेने खापरपणजोबांच्या नावाचे पेपर दाखविले; परंतु त्यांचा सातबारा तेव्हा व सध्या कुठेही आढळत नाही. तिने १५४ गटातील मोबदल्यावर आक्षेप घेतला होता.
-समृद्धीतील भूसंपादनात काही सातबाराचे वाद होते. त्याची रक्कम कोर्टात आहे, असे प्रशासकीय सूत्रांचे म्हणणे आहे. मुंबई- नागपूर समृद्धी महामार्ग छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांतून ११२ किलोमीटर जातो. या अंतरातील भूसंपादनासाठी सुमारे १६०० कोटींचा मोबदला सरकारने दिला आहे. काही वादग्रस्त गटांतील मोबदला कोर्टात जमा आहे.

