- Marathi News
- पॉलिटिक्स
- आधी नगरपालिका, मग उडणार जि. प., पं. स. निवडणुकीचा बार!; निवडणूक आयोगाने मागवले जिल्हाधिकाऱ्यांचे मत
आधी नगरपालिका, मग उडणार जि. प., पं. स. निवडणुकीचा बार!; निवडणूक आयोगाने मागवले जिल्हाधिकाऱ्यांचे मत
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप निवडणूक आयोगाने घोषित केलेला नसला तरी आधी नगरपालिकांच्या निवडणुका होतील आणि त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा बार उडेल, असे संकेत मिळत आहेत. राज्य निवडणूक आयोगानेही तशीच तयारी करीत जिल्हाधिकाऱ्यांकडून मते मागविली असल्याचे समजते.
निकालाचाही घोळ
प्रचलित पद्धतीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर दोन दिवसांनी त्याचे निकाल घोषित केले जातात. यावेळी मात्र आधी नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि प्रचलित पद्धतीनुसार दोन दिवसांनी त्याचा निकाल घोषित केला तर त्याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या निवडणुकांवर होऊ शकतो. त्यामुळे निवडणूक आयोग आधी नगरपालिका निवडणूक घेतली तरी त्याचा निकाल जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीनंतरच घोषित करेल, असा अंदाजही सूत्रांनी वर्तविला आहे.
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात घोषणा?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आधी नगरपालिकेच्या निवडणुका होणार की जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या, याचा निर्णय घोषित होण्यासाठी मतदारांना नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वाट पहावी लागण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नगरपालिकांची निवडणूक जाहीर होईल. त्या पाठोपाठ जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि सर्वात शेवटी महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा होईल.
