- News
- पॉलिटिक्स
- केणेकरांच्या आव्हानाला ठाकरे गटाकडून शिंदे गटाचे ‘सॉफ्ट’नेते निवडून उत्तर!; आ. जैस्वाल, भुमरे, बंब य...
केणेकरांच्या आव्हानाला ठाकरे गटाकडून शिंदे गटाचे ‘सॉफ्ट’नेते निवडून उत्तर!; आ. जैस्वाल, भुमरे, बंब यांना म्हणाले, ‘क्या हुआ तेरा वादा’
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आ. संजय केणेकर यांनी ठाकरे गटाला आव्हान दिले होते, की हिंमत असेल तर पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करा, निवेदन द्या… मंत्री शिरसाटांचा आक्रमकपणा लक्षात घेता ठाकरे गटाने, आव्हानाची रिस्क न घेता आंदोलनासाठी सॉफ्ट नेते निवडले. आ. प्रदीप जैस्वाल, आ. विलास भुमरे आणि आ. प्रशांत बंब यांना निवेदन देऊन […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आ. संजय केणेकर यांनी ठाकरे गटाला आव्हान दिले होते, की हिंमत असेल तर पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करा, निवेदन द्या… मंत्री शिरसाटांचा आक्रमकपणा लक्षात घेता ठाकरे गटाने, आव्हानाची रिस्क न घेता आंदोलनासाठी सॉफ्ट नेते निवडले. आ. प्रदीप जैस्वाल, आ. विलास भुमरे आणि आ. प्रशांत बंब यांना निवेदन देऊन ‘क्या हुआ तेरा वादा’ असे विचारले.
आ. प्रदीप जैस्वाल यांना निवेदन देण्यासाठी ठाकरे गटाचे पदाधिकारी आले, पण आल्या आल्या आधी १० पैकी ८ पदाधिकाऱ्यांनी जैस्वालांचे पाय धरले. नंतर विचारले, क्या हुआ तेरा वाद, या आंदोलनाचे निवेदन दिले. शनिवारी (७ जून) आ. जैस्वाल यांच्या निराला बाजार येथील निवासस्थानी जाऊन मध्य मतदारसंघातील १० पदाधिकारी आले होते. आंदोलनात शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, आनंद तांदूळवाडीकर, लक्ष्मीनारायण बाखरिया, गोपाळ कुलकर्णी, सुगंधकुमार गडवे, राजेंद्र दानवे, नरेश मगर, सुरेश पवार, विनायक देशमुख, संदेश कवडे, संजय हरणे, सीताराम सुरे, सचिन खैरे, बन्सी जाधव आदींनी सहभाग नोंदविला.

पैठण शहरातील बसस्थानक चौक ते आ. विलास भुमरे यांच्या कार्यालयापर्यंत उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय गोर्डे यांच्या नेतृत्वात ठाकरे गटाने हलगी वाजवत मोर्चा काढला. मोर्चा आ. भुमरे यांच्या कार्यालयासमोर आला. या वेळी त्यांचेही शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी दोन्ही बाजूच्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर उपजिल्हाप्रमुख गोर्डे यांनी आ. भुमरे यांना निवडणुकीतील आश्वासने पूर्ण करण्याच्या मागण्यांचे निवेदन दिले. मोर्चात उद्धवसेनेचे तालुकाप्रमुख मनोज पेरे, प्रल्हाद औटे, राखीताई परदेशी, सोमनाथ जाधव, अरुण काळे, अप्पासाहेब गायकवाड, सुरेश दुबाले, तस्लिमा शेख, ठकूबाई कोथिंबिरे, अजय परळकर, सम्राट वानोळे, कल्याण मगरे, संभाजी अत्रे, विवेक म्हस्के, भगवान चौधरी, दादा मेरड, युनूस शेख आदींची उपस्थिती होती. या वेळी पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. गंगापूरमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आ. प्रशांत बंब यांना शनिवारी निवेदन देण्यात आले. या वेळी तालुका पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात काय म्हटलंय…
विधानसभा निवडणुकीत महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप कर्जमाफी दिली नाही. सरकारने शेतकरी सन्मान योजना १२ हजार रुपयांवरून १५ हजार रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. एक रुपयांत पीक विमा ही योजना गुंडाळण्यात आली. राज्यात मागील सहा महिन्यांत एक हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीत सतत नुकसान होत असते. यामुळे सरकार आणि प्रशासनाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या गंभीर समस्येकडे लक्ष द्यावे. केवळ पोकळ आश्वासने आणि घोषणाबाजी करण्याऐवजी तत्काळ योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, राज्यातील जनतेला न्याय द्या, अन्यथा अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

