भाजपची खेळी, इतर पक्षांची बसली दातखिळी!; जिल्ह्यातील ९ पैकी ६ पं.स.चे सभापतिपद केले काबिज, जाणून घेऊ राजकारण कसे रंगले...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्‍ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्‍ह्यातील ९ पैकी ६ पंचायत समित्‍यांवर आपला सभापती बसवून भारतीय जनता पक्षाने आता आपणच जिल्‍ह्याच्‍या राजकारणाचे ‘दादा’ असल्‍याचे मंगळवारी (१० मार्च) सिद्ध केले. सभापती आणि उपसभापतिपदांच्‍या निवडणुकीत अखेरच्‍या क्षणी अतिशय नियोजन पद्धतीने राजकारण खेळत भाजपच्‍या धुरंधरांनी सर्वच पक्षांना मात देत त्‍यांची दातखिळी बसवली. कारण भाजपने कुठे शरद पवार गट, कुठे अजित पवार गट तर कुठे ठाकरे गटाला सोबत घेतले तर काही ठिकाणी चक्‍क शिंदे सेनेतच फूट पाडून सहा पंचायत समित्‍यांवर सभापती बसवला. महत्त्‍वाचे म्‍हणजे या साऱ्यात सर्वाधिक फुटीचा कलंक लागला तो ठाकरे सेनेला.. त्‍याच वेळी शिंदे सेनेने जिल्‍ह्यातील तीन पं.स.वर वर्चस्‍व मिळवून महायुतीचा झेंडा शाबूत ठेवला.

Sambhajinaar
छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडणुकीत मोठे रणकंदन पहायला मिळाले. पंचायत समिती निवडणुकीत महायुतीचे सर्वाधिक १४ सदस्य निवडून आले होते. त्यात सर्वाधिक ७ भाजपचे आहेत. मात्र भाजपला सत्तेबाहेर ठेवून शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली. परंतु, भाजपने रात्रीतून ठाकरे गटाचे ३ सदस्य गायब केले. त्यामुळे भाजपचे कल्याण गायकवाड (९ मते) हे सभापती तर शिंदे गटाचे बाळासाहेब गाढे (१० मते) उपसभापती झाले. गायकवाड यांच्या विरोधात अजित पवार गटाचे अनुराग शिंदे (८ मते) यांनी अर्ज भरला होता, त्यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा होता, तर गाढे यांच्या विरोधात अर्ज भरलेल्या बाळासाहेब राठोड यांना ७ मते मिळाली. उपसभापतीपदासाठी शिंदे गटाच्या २ उमेदवारांनी अर्ज केले होते.

69b096432586c
कल्याण गायकवाड यांची कॉलर पकडताना अंबादास दानवे.

‘उबाठा’च्‍या दानवेंची दादागिरी, पण...
भाजपने ३ सदस्य गायब केल्याने सत्ता गमावल्याचे कळताच संतापलेल्या ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पंचायत समिती गाठून कल्याण गायकवाड यांची कॉलर पकडली व सदस्य कुणी पळवले, असा जाब विचारला. मात्र, त्‍यांची ही दादागिरीरूपी स्‍टंटबाजी थोड्या वेळेपुरतीच चालू शकली. कारण दानवेंनी दादागिरी सुरू करताच गायकवाड समर्थकांसह भाजपचे पदाधिकारी आक्रमक झाले आणि त्‍यांनीही आवाज उठवला. शेवटी पोलिसांनी हस्‍तक्षेप करून प्रकरण शांत केले आणि जे घडतंय ते पाहून शांत बसण्‍याची वेळ त्‍यांच्‍यावर आली. एकंदरीत भाजपच्‍या पदाधिकाऱ्यांनी खेळलेल्‍या खेळीने दानवेंच्‍या दादागिरीवर मात केल्‍याची चर्चा परिसरात शेवटपर्यंत राहिली. दानवेंनी गायकवाडांची कॉलर पकडल्यानंतर त्यांच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली. तीन पोलीस उपायुक्त, चार पोलीस निरीक्षक, दंगा काबू पथकासह मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले. दानवे कार्यकर्त्यांसह बाहेर ठाण मांडून बसलेले असताना बराच वेळ गायकवाड हे पंचायत समिती बाहेर आलेच नाहीत. गट विकास अधिकाऱ्यांच्या चेंबरमध्ये ते अर्धा तास बसून होते. शहराध्यक्ष किशोर शितोळे आणि पदाधिकारी आल्यावर त्यांनी दरवाजा उघडला. ठाकरे गटाच्या ३ सदस्यांच्या गैरहजेरीशी आपला संबंध नसल्याचे स्पष्टीकरण गायकवाड यांनी दिले.

fulmbri
फुलंब्री

फुलंब्रीत काय घडलं?
फुलंब्री पंचायत समिती सभापतीपदासाठी भाजपने जबरदस्‍त खेळी करीत शरद पवार गट आणि मित्र पक्षांना सोबत घेतले. यात भाजपचे सर्जेराव मेटे (५ मते) सभापती तर शरद पवार गटाच्या अश्विनी अजिनाथ सोनवणे (५ मते) उपसभापती झाल्या. मेटे यांच्या विरोधात अर्ज भरलेल्या शिंदे गटाच्या पद्‌माबाई जाधव यांना ३ मते तर अश्विनी सोनवणे यांच्या विरोधात अर्ज भरलेल्या काँग्रेसच्या गणेश काळे यांना ३ मते मिळाली. फुलंब्रीत शिंदे सेना व काँग्रेसने हातमिळवणी केली होती खरी, पण भाजपच्‍या खेळीपुढे त्‍यांचे काहीही चालू शकले नाही आणि यामुळे फुलंब्रीत नव्‍या राजकीय समीकरणाचाही उदय झाला.

kannd
कन्नड

कन्नडला भाजप-शिंदे सेना साथ साथ
कन्नड पंचायत समितीत भाजप-शिंदे गटाने एकेक पाऊल मागे घेत एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. यामुळे शिंदे गटाच्या सुप्रिया अनिलकुमार घुगे या सभापती तर भाजपच्या माया ललीत सुराशे उपसभापती झाल्या. आधी येथे दोन्‍ही पक्ष सत्तासिंहासन आपल्‍याच ताब्‍यात राहण्‍यासाठी झुंजत होते. मात्र, नंतर दोन्‍हींनी समजूतदारपणा दाखवल्‍याने विरोधकांची बत्ती गुल झाली आणि दोन्ही निवडी बिनविरोध झाल्या. पंचायत समितीत शिंदे गटाचे ८ तर भाजपचे ५ सदस्य आहेत.

silod
सिल्लोड

सिल्लोड व सोयगावमध्‍ये आ. सत्तार गट सत्तेबाहेर 
खरा खेळ सिल्‍लोड व सोयगावमध्‍ये पाहायला मिळाला. सोयगावमध्‍ये भाजपने शिंदे सेनेच्‍या आ. अब्‍दुल सत्तार व आ. संजना जाधव यांच्‍यातील दुहीचा योग्‍य फायदा घेत आ. जाधव यांच्‍या गटाला उपसभापतीपद दिले. माजी केंद्रीय राज्‍यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या साऱ्यात पुढाकार घेतल्‍याने येथे भाजपचे उत्तम चव्‍हाण सभापती तर शिंदे सेनेतील आ. संजना जाधव यांच्‍या गटाच्‍या गयाबाई घोडे उपसभापतीपदी विराजमान झाल्‍या.

soygaon
सोयगाव


सिल्‍लोडच्‍या राजकारणावर वर्चस्‍व असूनही आ. सत्तार यांची भाजपने पंचायत समितीत मात्र त्‍यांची काही चालू दिली नाही. रावसाहेब दानवे यांनी येथेही योग्‍य खेळी करून आ. सत्तार यांना मात देत या अनिता बनकर यांनी सभापतीपदाच्‍या तर भगवान आहेर यांना उपसभापतिपदाच्‍या खुर्चीवर विराजमान केले. येथे भाजपच्‍या उमेदवारांना प्रत्‍येकी १० तर आ. सत्तार यांच्‍या नेतृत्त्‍वाखालील शिंदे सेनेच्‍या उमेदवारांना प्रत्‍येकी ८ मते मिळाली.

Gangapur
गंगापूर

गंगापुरात भाजपचाच सभापती
गंगापुरात सभापतिपदाच्‍या निवडणुकीत भाजपच्‍या विरोधात शिंदेसेनेसह राष्‍ट्रवादीच्‍या अजित पवार गटाने दंड ठोठावले होते. पण ऐनवेळी आ. प्रशांत बंब यांनी जोरदार खेळी करीत सभापती होण्‍यासाठी उमेदवारी अर्ज केलेल्‍या दोन्‍ही पक्षाच्‍या उमेदवारांचे मतही भाजपच्‍या पारड्यात पाडून घेतले. यामुळे भाजपच्‍या कविता चव्‍हाण १३ मते मिळवून सभापती झाल्‍या, तर शिंदे सेनेला येथे उपसभापतीपद देण्‍यात आले. या पदावर शिंदेसेनेचे राजेश्‍वर हिवाळे निवडून आले. महत्त्‍वाचे म्‍हणजे यासाठी भाजपने अजित पवार गटालाही सोबत घेतले. या साऱ्यामुळे उद्धव ठाकरे गट या निवडणुकीत फारसे अस्‍तित्‍वच दाखवू शकला नाही.

khultabad
खुलताबाद

खुलताबादेत धक्‍कातंत्र, उद्धव सेना भाजपच्‍या साथीला
खुलताबादमध्ये वेगळ्‍याच राजकीय समीकरणाचा उदय झाला. येथे उद्धव ठाकरेंच्‍या गटाने चक्‍क भाजपला साथ दिली. या ठिकाणी ही साथ देण्‍याच्‍या बदल्‍यात भाजपने उबाठा गटाला उपसभापतीपद दिले. या युतीमुळे खुलताबादेत सभापतीपदी सुनीता खंडागळे, तर उपसभापतीपदी उबाठा गटाच्‍या मंदाताई वाकळे उपसभापती पदी विराजमान झाल्‍या.

vaijapur
वैजापूर

पैठण, वैजापूर शिंदे गटाकडे
एकीकडे जिल्‍ह्यातील पंचायत समित्‍यांचे सभापतीपद भाजपकडे जात असताना दुसरीकडे शिवसेनेच्‍या एकनाथ शिंदे गटाने तीन पंचायत समित्‍या आपल्‍या ताब्‍यात ठेवण्‍यात यश मिळविले. पैठणमध्‍ये खा. संदिपान भुमरे व त्‍यांचे आमदार पुत्र आ. विलास भुमरे यांनी आपले वर्चस्‍व अबाधित ठेवले. या ठिकाणी सभापतीपदाच्‍या निवडणुकीत शिंदे गटाने बाजी मारत सभापतीपदी वैशाली विनोद बोंबले तर उपसभापतीपदी संजय अशोक लघाने यांना बिनविरोध निवडून आणले. वैजापुरात शिंदे सेनेने राष्‍ट्रवादीच्‍या शरद पवार गटाला साथीला घेत सभापती पदावर आपला उमेदवार निवडून आणला तर उपसभापतिपद शरद पवार गटाला दिले. ही निवडणूक शिंदे गटाने बिनविरोध करून दाखवली. या ठिकाणी सवंदगाव गणातून निवडून आलेल्‍या शिंदे गटाच्‍या वंदना बाळू शिंदे सभापतिपदी तर शिऊर गणातून निवडून आलेल्‍या शरद पवार गटाच्‍या सोनाली किशोर जाधव उपसभापतिपदी बिनविरोध विराजमान झाल्‍या.

paithan
पैठण


एकंदरीत छत्रपती संभाजीनगर जिल्‍ह्यात पंचायत समितीच्‍या सभापती व उपसभापतिपदांच्‍या निवडणुकीत भाजपने ९ पैकी ६ ठिकाणी थेट वर्चस्‍व स्‍थापित करून यापुढे जिल्‍ह्यात आपलीच चालणार असल्‍याचे सिद्ध केले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

भाजपची खेळी, इतर पक्षांची बसली दातखिळी!; जिल्ह्यातील ९ पैकी ६ पं.स.चे सभापतिपद केले काबिज, जाणून घेऊ राजकारण कसे रंगले...

Latest News

भाजपची खेळी, इतर पक्षांची बसली दातखिळी!; जिल्ह्यातील ९ पैकी ६ पं.स.चे सभापतिपद केले काबिज, जाणून घेऊ राजकारण कसे रंगले... भाजपची खेळी, इतर पक्षांची बसली दातखिळी!; जिल्ह्यातील ९ पैकी ६ पं.स.चे सभापतिपद केले काबिज, जाणून घेऊ राजकारण कसे रंगले...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्‍ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्‍ह्यातील ९ पैकी ६ पंचायत समित्‍यांवर आपला सभापती बसवून भारतीय जनता पक्षाने...
रिलस्टार अरुण तुपेचा घरातच आढळला मृतदेह!; सोशल मीडियावर दोन लाख फॉलोअर्स, पोस्ट मार्टेमच्या अंतिम अहवालातून समोर येणार कारण, पोलीस काय म्हणाले...
तलावात बुडून ३ शालेय विद्यार्थ्यांचा मृत्‍यू, सिल्लोड तालुक्यातील दुर्दैवी घटना
वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव
छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निवडणुकीत अंबादास दानवेंचा राडा, तरीही भाजपने फडकवला भगवा!; भाजप उमेदवाराची कॉलर पकडून माजवली दहशत
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software