- News
- एक्सक्लुझिव्ह
- विश्लेषण : अंबादास दानवेंची ‘दादा’गिरी चुकीचीच!; उमेदवार निवडून आणता येत नाहीत, जे निवडून आले त्यांन...
विश्लेषण : अंबादास दानवेंची ‘दादा’गिरी चुकीचीच!; उमेदवार निवडून आणता येत नाहीत, जे निवडून आले त्यांना सांभाळता येत नाहीत मग दुसऱ्यावर त्रागा करून उपयोग काय?
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते, माजी आमदार तथा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केलेल्या दादागिरीने मंगळवारी (१० मार्च) छत्रपती संभाजीनगरच्या पंचायत समिती सभापतिपदाच्या निवडणुकीला गालबोट लागले. दानवेंनी भाजपच्या उमेदवाराची कॉलर पकडून त्यांना धमक्या दिल्या. दानवेंची ही दादागिरी भाजपच्या आक्रमक कार्यकर्त्यांसह पोलिसांनी हाणून पाडली असली तरी कोणतेही मोठे पद नसताना दानवे यांनी केलेल्या या कृत्याची निंदा जिल्हाभर केली जात आहे. सदस्यांच्या बाबतीत स्वतः निष्काळजीपणा करायचा, निवडणुकीला गांभीर्याने घ्यायचे नाही आणि नंतर प्रतिस्पर्ध्याच्या खेळीवर असा आक्रमकपणा धारण करायचा, हे सामान्यांना रूचलेले नाही. स्वतःला अपयश का येते, याचे आत्मचिंतन दानवेंनी करण्याची गरज असल्याची परखड टीका होत आहे. राजकारणात खेळ्या केल्या जातात, असे म्हणणे संयुक्तीक ठरेल, कारण खुलताबादमध्ये ठाकरे गटाने काही वेगळे केले नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या पक्षाच्या उमेदवाराची कॉलर धरली, त्याच पक्षासोबत खुलताबादमध्ये घरोबा केला. मग तुमचे ते राजकारण आणि भाजपचा तो सत्तेचा गैरवापर, असे सोयीचे राजकारण दानवे कसे खेळू शकतात, हे कोडे अनाकलनीय आहे.
पराभूत झाल्यानंतर भाजपमधून आयात केलेले उमेदवार पुन्हा भाजपमध्ये निघून गेले, तेही ठाकरे गटाच्या नेत्यांवर टीका करून. महापालिका निवडणुकीत ‘मामूं’साठी अवघा पक्ष धोक्यात कुणी आणला, हेही सर्वांनी पाहिले. एवढे झाल्यानंतर पक्षनेतृत्त्वाकडून जिल्हा परिषद निवडणुकीची सूत्रे चंद्रकांत खैरे यांच्या हाती सोपवली जातील, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती. मात्र पुन्हा दानवेंनीच सूत्रे स्वतःच्या हाती कायम ठेवली. पुन्हा भाजप- शिंदे गटाने जोरदार धोबीपछाड दिली. या सगळ्या गोष्टीला दानवेंकडे केवळ एकत्र उत्तर असते, ते म्हणजे सत्ता आणि पैशांचा गैरवापर सत्ताधाऱ्यांनी केला...
कार्यकर्ते वैतागले...
ठाकरे गटात सध्या स्थानिक पातळीवर चंद्रकांत खैरे-अंबादास दानवे यांच्यातील शह-काटशहाचे राजकारण रंगलेले असते. आपल्या विरोधात दानवे वागत असतात, असा आरोप खुद्द खैरे करत आले आहेत. खैरेंची चिडचिड होते, ते बोलून व्यक्त होतात. पण दानवे त्यांना फारसे गांभीर्याने न घेतात त्यांची वाटचाल सुरू ठेवतात. दोघांच्या या गटबाजीला कंटाळून आजवर अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाला राम राम ठोकून भाजप, शिंदे गटात प्रवेश केला आहे. एकतर बहुसंख्येने उमेदवार निवडून आणता येत नाहीत, जे निवडून येतात त्यांना ‘सांभाळून’ ठेवता येत नाहीत, हे आपले अपयश मानण्याऐवजी, त्रागा करून, संताप करून थेट प्रतिस्पर्धी उमेदवाराची कॉलर पकडावी, हे राजकारणी म्हणून दानवेंना शोभत नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

