- News
- Analysis : छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत ‘बिग फाईट, वातावरण टाईट!’; शिरसाट, सावे, दानवेंमध्य...
Analysis : छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत ‘बिग फाईट, वातावरण टाईट!’; शिरसाट, सावे, दानवेंमध्ये वर्चस्वाची लढाई
दिव्या पुजारी, सिटी एडिटर, मेट्रोपोलिस पोस्ट
छत्रपती संभाजीनगर : तब्बल दहा वर्षांनी होणाऱ्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार, याचा फैसला आजपासून बरोबर एका महिन्याने होणार आहे. सुमारे ५ हजार कोटींच्या घरात बजेट आणि मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहराच्या आर्थिक नाड्या आपल्या हातात ठेवण्यासाठी सर्वच पक्षांनी शड्डू ठोकला आहे. नेहमी शिवसेना-भाजप युतीला सत्तास्थानी ठेवणाऱ्या या महापालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत कधीकाळी परस्परांचे सहकारी आणि मित्र राहिलेल्या संजय शिरसाट, अतुल सावे आणि अंबादास दानवे या तीन नेत्यांमध्ये वर्चस्वाच्या लढाईचा खेळ रंगणार आहे.
नेहमीसारखी यंदाच्या निवडणुकीतही भाजप- शिवसेनेची युती कायम राहण्याचे संकेत असून यावेळी त्यांच्या साथीला अजित पवारांची राष्ट्रवादीही असणार आहे. इतर पक्षांचा कमी झालेला प्रभाव पाहता या वेळी या तीन पक्षांची महायुती शहरात पुन्हा एकदा आपला करिष्मा दाखवेल, असे संकेत तूर्तास तरी मिळत आहेत. गतवेळी महापालिकेत एकत्रित शिवसेनेचे २९ तर भाजपचे २३ नगरसेवक निवडून आले होते. २५ जागा एमआयएमने, १० जागा काँग्रेसने, बसपने ५ तर रिपाइंने दोन जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी अपक्षांनी दहा जागा जिंकल्या होत्या, तर राष्ट्रवादी एकत्रित असूनही त्यांना तीनच जागांवर समाधान मानावे लागले होते. या वेळी शिवसेनेची दोन शकले झाली आहेत. त्यातील मोठा गट एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत, तर ठाकरे गटाची शहरात बऱ्यापैकी वाताहत झाली आहे.
यंदाची निवडणूक ठाकरे गटासाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. तूर्तास या पक्षातदेखील चंद्रकांत खैरे यांना मानणारा गट आणि अंबादास दानवे यांना मानणारा गट अशी विभागणी दिसत आहे. यातून वाट काढत या पक्षाला शहरवासीयांच्या मनात आपल्याला अजूनही स्थान आहे, हे दाखवण्याची कसरत करावी लागणार असल्याचे चित्र आहे. सध्या ठाकरे गटात विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची चलती असली त्यांच्या ‘हम करे सो कायदा' या ‘दादा'गिरीच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये थोडीशी चलबिचलता दिसून येते. यातूनच अनेक पदाधिकारी ठाकरे गट सोडून शिंदे गटात गेल्याचे चित्र शहरवासीयांनी पाहिले. आता उरलेल्या पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची चलबिचलता दूर करून महापालिका निवडणुकीच्या यशाचे शिवधनुष्य उचलण्याचे कौशल्य त्यांना दाखवावे लागणार आहे.
-शिंदे गटाची कमांड मंत्री संजय शिरसाट यांच्या हाती आहे. सध्या या पक्षात वर्चस्व दाखविण्यातून शीतयुद्ध सुरू झाले असून, यातून मार्ग काढून शिरसाट पक्षाला महापालिकेत सत्तास्थानी बसवतात का हे पाहणे रंजक ठरेल.
-गेल्या दहा वर्षांत शहरात भाजपचे बळ चांगलेच वाढले असून, पक्षात वरचष्मा असलेले मंत्री अतुल सावे हे आमदार संजय केणेकर यांच्या मदतीने पक्षाला महापालिकेच्या किती जागा जिंकून दाखवू शकतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
-काँग्रेसची अवस्था दयनीय असून, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची अवस्थाही फारशी चांगली तूर्त तरी नाही. यापैकी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीसोबतच राहणार हे जवळपास निश्चित आहे. शरद पवारांचा गट महाविकास आघाडीत राहून पदरात पडतील तेवढ्या जागा घेऊन धन्यता मानण्याची शक्यता आहे.
मुस्लिम मतदार ठरणार निर्णायक
शहरात मुस्लिम मतदारांची संख्या मोठी असून गेल्यावेळी याच मतदारांच्या जोरावर एमआयएम पक्षाचे २५ नगरसेवक निवडून आले होते. एवढेच नव्हे तर पुढे या पक्षाचा एकदा आमदार आणि एकदा खासदारही निवडून आला. या वेळी महापालिका निवडणुकीत मुस्लिम मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
सातचे झाले आठ पक्ष
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या २०१५ च्या निवडणुकीत सात प्रमुख पक्षांमध्ये लढत झाली होती. यात भाजप, काँग्रेस, एकसंघ शिवसेना, एकसंघ राष्ट्रवादी एमआयएम, मनसे आणि बहुजन समाज पक्ष यांचा समावेश होता. मात्र नंतर २०२२ मध्ये शिवसेना तर २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये फूट पडली. त्यामुळे आता गतवेळी मैदानात असलेल्या सातच्या तुलनेत यंदा आठ पक्ष मैदानात दिसतील. शिवसेना व भाजपच्या कृतीनंतर दोन पक्ष वाढले असले तरी बसपच्या रुपाने एक पक्ष निवडणुकीच्या रिंगणातून बाद झाला आहे.
२०१५ चे पक्षीय बलाबल
शिवसेना (एकसंघ) : २९
एमआयएम : २५
भाजप : २३
काँग्रेस : १०
राष्ट्रवादी (एकसंघ) : ३
बसप : ५
रिपाइं : २
अपक्ष : १०

