- News
- एक्सक्लुझिव्ह
- पुत्रापुढे कसला मित्र?;आ. प्रदीप जैस्वाल-किशनचंद तनवाणींच्या ताणाताणीत पुढे काय होणार?
पुत्रापुढे कसला मित्र?;आ. प्रदीप जैस्वाल-किशनचंद तनवाणींच्या ताणाताणीत पुढे काय होणार?
मनोज सांगळे, संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट
छत्रपती संभाजीनगर : त्यांची मैत्री आज-कालची नाही तर लहानपणीची आहे. मैत्रीचा एकूण काळ पकडला तर तो ४५ वर्षांच्या घरात आहे... ऐकून आश्चर्य वाटलं ना? हे दोन मित्र सध्या पुत्रप्रेमापोटी पुन्हा एकदा आमनेसामने ठाकले आहेत. आ. प्रदीप जैस्वाल आणि माजी आमदार किशनचंद तनवाणी यांचे पूत्र गुलमंडीतून महापालिका निवडणूक लढवू इच्छितात. मित्र म्हटल्यावर एकाने माघार घ्यावी... पण इथे दोघेही एक पाऊल पुढेच आहेत... तनवाणी हे विधानसभा निवडणुकीतील त्यागाची आठवण करून देत आहेत, तर जैस्वाल हे कसला त्याग, म्हणून प्रश्न करत आहेत... दोन मित्रांची ही ताणाताणी आता पुढे कोणते रुप धारण करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे...
आ. जैस्वाल आणि तनवाणी यांचे बालपण गुलमंडीवर गेले आहे. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने दोघे राजकारणात आले होते. राजकारणाच्या सुरुवातीच्या काळात जैस्वाल यांनीच तनवाणी यांना गुलमंडी वॉर्डातून तिकीट मिळावे म्हणून प्रयत्न केले होते आणि तनवाणी नगरसेवक झाले. पुढे आमदार होण्यासाठीही जैस्वाल यांची मदत झाली. जैस्वाल यांनाही नगरसेवक, महापौर, खासदार, आमदार करण्यात तनवाणी यांनी कोणतीही कसर सोडली नाही. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत प्रदीप जैस्वाल यांना तिकीट मिळावे म्हणून तनवाणी यांनी उपोषण केले होते. उध्दव ठाकरे यांनाही भेटले होते. पण यश आले नव्हते. नंतर जैस्वाल थेट खासदार झाले झाले होते. तनवाणी हे शिवसेनेचे शहराध्यक्ष झाले. नगरसेवक, महापौर झाले. विधान परिषदेवर निवडूनही आले.
प्रदीप जैस्वाल
१९८८ मध्ये पहिल्यांदा नगरसेवक झाले. सन १९९० मध्ये महापौरपदी निवड झाली. १९९२ ला शिवसेना शहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. परत १९९५ मध्ये दुसऱ्यांदा नगरसेवक झाले. १९९६ मध्ये लोकसभा लढवली आणि पहिल्यांदा खासदार झाले. शिवसेनेने २००६ मध्ये त्यांची जिल्हाप्रमुखपदी निवड केली. २००९ मध्ये शिवसेनेशी बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली आणि आमदार म्हणून विजय झाले. विधानसभा २०१४ च्या निवडणुकीत एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्याकडून पराभव त्यांना पत्करावा लागला. २०१५ ला शिवसेना महानगरप्रमुखपदी निवड करण्यात आली. विधानसभा २०१९ ला पुन्हा आमदार म्हणून निवडून आले. २०२४ मध्ये पुन्हा आमदार झाले.
किशनचंद तनवाणी
पहिल्यांदा १९९५ मध्ये म्हाडा सभापती म्हणून काम पाहिले. २००० मध्ये पहिल्यांदा नगरसेवक झाले. २००५ मध्ये महापौर झाले. २००७ मध्ये विधान परिषदेवर आमदार झाले. २०१४ मध्ये भाजपकडून विधानसभेसाठी उमेदवारी मात्र पराभव. २०१६ मध्ये भाजप शहराध्यक्ष झाले. भाजपातील अंतर्गत नाराजीमुळे ठाकरे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाने आधी महानगरप्रमुख, नंतर जिल्हाप्रमुख केले. विधानसभा निवडणुकीची उमेदवारी दिली. मात्र हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होऊ नये म्हणून तनवाणी यांनी उमेदवारी मागे घेतली. नंतर शिंदे गटात प्रवेश केला.
आता पूत्रप्रेम मैत्रीच्या आड
गुलमंडी प्रभाग शिंदे गटासाठी अनुकूल आहे. त्यामुळे जैस्वाल आणि तनवाणी दोघांनाही आपल्या पुत्रांसाठी खात्रीशीर प्रभाग पाहिजेत. जैस्वाल यांची प्रकृती पाहता त्यांना आपला राजकीय वारसदार तयार करावा लागणार आहे. महापालिका निवडणूक ही त्यासाठी चांगली संधी आहे. तनवाणींच्या मते गुलमंडीत खुल्या प्रवर्गातून माजी नगरसेवक म्हणून राजू तनवाणी यांचा पहिला हक्क आहे किंवा ते चिरंजीव चंद्रकांत यांच्यासाठी मी उमेदवारी मागणार आहे. जैस्वाल यांचे निवासस्थान समर्थनगर प्रभागात आहे. त्यांनी मुलाला समर्थनगरमधून उभे करावे. शिवाय ते ओबीसी आहेत. गुलमंडीच्या खुल्या प्रभागातून त्यांनी यायला नको, अशी कठोर भूमिका तनवाणी यांनी घेतली आहे. आ. जैस्वाल यांच्या म्हणण्यानुसार, केवळ आमदार प्रदीप जैस्वाल यांचा मुलगा म्हणून नव्हे तर पक्षबांधणीत ऋषिकेश सक्रिय असतो. १२ वर्षांपासून तो विद्यार्थी सेनेचा पदाधिकारी आहे. त्याने रांगेत उभे राहून गुलमंडी प्रवर्गासाठी उमेदवारी अर्ज घेतला. तनवाणी यांचे बंधू राजू तनवाणी यांच्यासाठी शिंदे गटाने सिंधी कॉलनी प्रभागाचा पर्याय समोर ठेवल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. सोमवारी (१५ डिसेंबर) पहिल्याच दिवशी ३५० मुलाखती पार पडल्या. एकूणच दोघांनी आता पूत्र प्रेमापोटी मैत्री बाजूला ठेवल्याचे दिसत आहे. पुढे काय होते, एकनाथ शिंदे हे कुणाच्या पारड्यात उमेदवारी टाकतात, की मैत्री उचंबळून येऊन कुणी एक मित्र माघार घेतो, हे पाहणे रोमांचक ठरणार आहे.

