पुण्यातील सेवानिवृत्त व्यक्ती सायबर भामट्यांच्या निशाण्यावर!; कोट्यवधी रुपये उकळताहेत... माधवींनी ३ कोटी दिले, वर्षा यांनी ५१ लाख तर अनिल यांनी सव्वा कोटी...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

मनोज सांगळे, संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट
पुणे : सायबर भामट्यांनी आता सेवानिवृत्तांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. पुण्यात रोज दोन-तीन केसेस अशा समोर येत आहेत, ज्यात सायबर भामटे कधी एटीएस, तर कधी सायबर पोलीस असल्याचे भासवून तुमच्या नंबरचा गैरवापर झाला, तुम्ही हे फोटो शेअर केले, असे खोटे खोटे सांगून कोट्यवधी रुपये उकळत आहेत... सुरुवातीला लाखोंत खेळणारे सायबर भामटे आता सेवानिवृत्तांची कोट्यवधींची जमापुंजी घेऊन गायब होत आहेत... त्यांना शोधणे खऱ्या सायबर पोलिसांसमोर आव्हान आहेच, पण वेळोवेळी जागरूक करूनही कोट्यवधी रुपये भामट्यांच्या घशात घातले जातात कसे? पुण्यातील काही तक्रारींवर आम्ही नजर टाकली, त्यातून हेच दिसून आले, की निष्काळजी, घाबरट आपण आहोत, सायबर भामटे तर चलाख आहेत...

६४ वर्षीय माधवी या अभियांत्रिकी महाविद्यालयातून निवृत्त झालेल्या आहेत. त्यांना अनोळखी नंबरवरून कॉल आला. कॅनरा बँकमध्ये तुमच्या नावाचे आधारकार्ड वापरून मनीलाँड्रिंग केले आहे. तुमच्या नावाने गुन्हा नोंदवला आहे. तुम्हाला कुलाबा पोलीस स्टेशनचे सायबर डेटा प्रोटेक्शन अधिकारी विजय त्रिपाठी यांचा कॉल येईल, असे समोरच्या व्यक्तीने सांगितले आणि फोन ठेवला. माधवी अक्षरशः हादरून गेल्या. त्यानंतर दुपारी १ ला विजय त्रिपाठीचा कॉल आला. त्याने माधवी यांच्याकडून वचनपत्र लिहून घेतले. मनीलाँड्रिंग व टेरर फंडींग केल्याब‌द्दल कोणालाही काही एक सांगायचे नाही, असे सांगितले. जर का तुम्ही चुकून कोणाला सांगितले तर सुप्रीम कोर्टामार्फत जी शिक्षा दिली जाईल, त्याला पात्र राहाल, असे सांगितले. (झालं जे होतंय ते काही कुणाला सांगायचं नाही म्हटल्याने आता पुढे फसवणूक करायला सायबर भामटे मोकळे झाले.)

तुम्ही निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी पोलीस तुमच्या घरी येऊन तुम्हाला कुलाबा पोलीस स्टेशन येथे घेऊन जातील. पोलीस घरी येऊ द्यायचे नसतील तर भामट्यांनी दोन पर्याय सांगितले. तुमचे जेवढे बँक अकाउंट असतील ते आरबीआय गव्हर्नरमेंट ऑफ इंडिया सबमिट करा आणि जे फंड असतील ते सुद्धा गव्हर्नरमेंटला सबमिट करावे लागतील. त्यानंतर त्यांनी माधवी यांना काही आतंकवाद्यांचे फोटो दाखवले आणि विचारले की तुम्ही यांना ओळखता का? साहाजिकच माधवी त्यांना ओळखत नव्हत्या. माधवी यांनी नाही म्हटले. त्यावर भामट्याने सांगितले, की आतंकवाद्यांपासून तुम्हाला धोका आहे. दर दोन तासांनी सेफ असल्याचे मेसेज आम्हाला पाठवा आणि फोन ठेवला. घाबरलेल्या माधवी भामट्याने सांगितले, तसे करू लागल्या. त्यावरून भामट्यांनाही कळून चुकले की सावज बरोबर जाळ्यात अडकले आहे. त्यानंतर सिनियर इनस्पेक्टर संजय पिसे या तिसऱ्या भामट्याचा व्हिडीओ कॉल आला.

माधवी यांच्याकडून बँकेची सर्व माहिती घेतली. त्यामध्ये किती पैसे आहेत हेही जाणून घेतले. त्याने सांगितले, की तुम्हाला या केस संदर्भात आमचे सिनियर ऑफीसर विलास पाटील यांच्याशी बोलावे लागेल. पाटीलचा फक्त आवाज आला. तो काही व्हिडीओवर आला नाही. त्याने या केसमधून बाहेर पडण्यासाठी आम्ही सांगेल तसे पैसे पाठवा, असे सांगितले. थोडक्यात माधवी यांना विश्वास वाटला की चेहरा लपवून पैसे देण्याघेण्याचं बोलतोय म्हटल्यावर पक्का अधिकारीच असला पाहिजेत. त्याने सुनिल नावाच्या व्यक्तीच्या बँक अकाउंटवर साडेतीन लाख रुपये पाठवायला सांगितले. माधवी यांनी पाठवले. पाठवल्याचा पुरावाही संजय पिसेला पाठवला. त्यानंतर २५ ऑक्‍टोबरपासून १२ डिसेंबरपर्यंत रोज भामटे कॉल करायचे आणि पैसे मागायचे. माधवी यातून सुटकेसाठी पैसे देत राहिल्या. अखेर माधवी यांना शंका आली. त्यांनी बहिणीला याबाबत सांगितले. तिने माधवी यांना सायबर भामट्यांची ही करामत असू शकते, असे सांगितले. पण तोपर्यंत माधवी फसल्या होत्या चक्क ३ कोटी ८ लाख ३५ हजार २०८ रुपयांनी... माधवी यांनी पुणे सायबर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन तक्रार दिली...

दुसरी केस ५७ वर्षीय वर्षा यांची. त्यांना अनोळखी नंबरवरून व्हिडिओकॉल आला. वर्षा यांनी उचलताच समोरील व्यक्तीने एटीएसचा चीफ असल्याची बतावणी केली. गौरव ग्रोवर असे नाव सांगून लखनौ येथून बोलत असल्याचे सांगितले. पहलगाम ॲटॅकमध्ये तुम्ही काही वेपन्सचे फोटोग्राफ शेअर केले आहेत व मनीलाँड्रिंगमध्ये तुमचा हात आहे, असा आरोप केला. वर्षा घाबरून गेल्या. त्यांना मी असे काहीच केले नाही, असे सांगितले. पण त्याने तुमचा मोबाइल नंबर आमच्या तपासादरम्यान समोर आल्याचे सांगितले. त्याने स्वतःची ओळख पटवून देण्यासाठी वर्षा यांना ओळखपत्र, कॉन्फीडेन्शिअली ॲग्रीमेंट, अरेस्ट वॉरंट, ॲसेट सिझर ऑर्डर आणि ज्युडिशिअल मॅजिस्ट्रेटचा फॉर्म ७ असे डॉक्युमेंट्स पाठविले. वर्षा आणखीनच बिथरल्या.

भामट्याने सांगितले, की मी आता फोन 'एनआयए'चे चीफ सदानंद दाते यांच्याकडे देतो. दाते म्हणाला, तुमच्याकडे किती प्रॉपर्टी आहे, गोल्ड किती आहे, घरी किती कॅश आहे, तुमच्या किती एफडीज आहेत, कोणत्या बँकांमध्ये आहेत, असे सगळे सगळे त्याने जाणून घेतले. आरबीआयकडून फंड लिगलाझेशन करण्यासाठी तुम्हाला तुमचे पैसे आम्ही सांगू त्या देशभरातील वेगवेगळ्या बँकांच्या वेगवेगळ्या खात्यात जमा करावे लागतील. ही प्रेसिजर पूर्ण झाल्यानंतर आम्ही तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करू, असे भामट्याने सांगितले. वर्षा यांनी त्याने सांगितलेल्या खात्यावर ५१ लाख २० हजार रुपये पाठवले... नंतर वर्षा यांनी त्यांचे भाऊ असलेल्या निवृत्त कर्नलना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी वर्षा यांना समजावून सांगितले, की हे सर्व खोटे आहे. तुझ्यासोबत फसवणूक झाली आहे. तोपर्यंत वर्षा यांनी पैसे गमावले होते...

-केंद्रीय निवृत्त अधिकारी असलेल्या ७७ वर्षीय अनिल यांच्यासोबत घडला. त्यांच्याकडून सायबर भामट्यांनी १ कोटी २५ लाख ९० हजार रुपये उकळले.
-एलआयसीमधून निवृत्त झालेल्या ६२ वर्षीय तेजस्विनी यांच्याकडून सायबर भामट्यांनी ९९ लाख रुपये उकळले.
-स्टेट बँकेतून निवृत्त झालेल्या ७८ वर्षीय इसिडोर यांच्याकडून सायबर भामट्यांनी ६३ लाख रुपये उकळले...
ही प्रकरणे प्रातिनिधीक स्वरुपात आम्ही मांडली आहेत... अशा प्रकारे रोज पुण्यात २-३ सेवानिवृत्तांना सायबर भामटे गंडवत आहेत. कोट्यवधी रुपये उकळत आहेत... सावध होण्याची गरज आहे, पैसे देण्याआधी स्थानिक पोलिसांशी संपर्क करण्याची गरज आहे...

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वडगाव कोल्हाटीतील महिलांचे उपोषण मागे, ग्रामपंचायतीने लेखी दिले, पोलिसांनी मन वळवले!, सकाळपासून सायंकाळपर्यंत काय घडलं...

Latest News

वडगाव कोल्हाटीतील महिलांचे उपोषण मागे, ग्रामपंचायतीने लेखी दिले, पोलिसांनी मन वळवले!, सकाळपासून सायंकाळपर्यंत काय घडलं... वडगाव कोल्हाटीतील महिलांचे उपोषण मागे, ग्रामपंचायतीने लेखी दिले, पोलिसांनी मन वळवले!, सकाळपासून सायंकाळपर्यंत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाणी, रस्ता आणि ड्रेनेज या मुलभूत सुविधांसाठी वडगाव कोल्हाटीतील गट नं. ९ मध्ये महिलांनी...
पुण्यातील सेवानिवृत्त व्यक्ती सायबर भामट्यांच्या निशाण्यावर!; कोट्यवधी रुपये उकळताहेत... माधवींनी ३ कोटी दिले, वर्षा यांनी ५१ लाख तर अनिल यांनी सव्वा कोटी...
बिगुल वाजला : मुंबई, छत्रपती संभाजीनगरसह २९ महापालिकांची निवडणूक १५ जानेवारीला!
CPU, GPU आणि NPU मध्ये काय फरक?
एमबीएसाठी सर्वोत्तम कॉलेज निवडायचे?, जाणून घ्या देशातील टॉप १० एमबीए कॉलेजेस...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software