- News
- एक्सक्लुझिव्ह
- Exclusive : छत्रपती संभाजीनगर शहर पाणी योजना : निवडणूक पाहून दावे, आरोप करणारे किती दोषी?
Exclusive : छत्रपती संभाजीनगर शहर पाणी योजना : निवडणूक पाहून दावे, आरोप करणारे किती दोषी?
छत्रपती संभाजीनगर (विशेष प्रतिनिधी : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमधील रहिवाशांच्या घरातील नळाला दररोज पाणी कधी येणार, या प्रश्नाचे उत्तर तूर्तास खुद्द ब्रह्मदेवसुद्धा देऊ शकणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नाही म्हणायला राज्याच्या आधीच्या आणि सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी या संदर्भात वारंवार तारखा दिल्या खऱ्या; पण त्यातील एकही तारीख आजवर खरी ठरली नाही, हेच वास्तव आहे. संधी मिळेल तेव्हा शहरवासीयांना आश्वासन द्यायचे, नवी तारीख द्यायचे, निघून जायचे अन् पुढच्या वेळी पुन्हा शहरात येताना नवी तारीख घेऊनच यायचे, एवढे एकच काम गेल्या सहा वर्षांपासून सुरू आहे. मुख्य म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या मागे लागून शहरवासीयांना दररोज पाणी मिळवून देण्यात विरोधी पक्षांचे स्थानिक आणि राज्यस्तरीय नेतेसुद्धा अयशस्वी ठरले आहेत. ही योजना लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी प्रयत्न करण्याऐवजी ती पूर्ण होणारच नाही किंवा दिवसेंदिवस तिला उशीर होईल, यासाठीच स्थानिक नेत्यांनी प्रयत्न खर्ची केल्याचे शहरवासीयांना वाटत आहे. आता निवडणुकीच्या निमित्ताने हा मुद्दा पुन्हा समोर आला असून, शहरवासीयांना पुन्हा या योजनेच्या पूर्णत्वासाठी पुन्हा नवी तारीख मिळाली आहे. या साऱ्यात सत्ताधाऱ्यांची गोची झाली आहे, हे मात्र खरे...!
गेल्या सहा वर्षांत राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरील मोठा राजकीय नेता शहरात आला आणि शहर पाणी योजनेचा विषय निघाला नाही, असे कधीच झाले नाही. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रत्येक वेळी शहरात आल्यानंतर या विषयावर भाष्य केले. आताची निवडणूक सोडली तरी चार महिन्यांपूर्वी फडणवीस शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी योजनेचे काम पूर्ण होत आले असून, डिसेंबर २०२५ मध्ये चाचणी सुरू होईल, असे ठासून सांगितले होते. पण हे केवळ बोलण्यापुरतेच होते का, असा प्रश्न आजही शहरवासीयांना पडलेला आहे. याचा दुसरा अर्थ राज्यातील सत्ताधारी पक्षाचे शहरातील नेते, शहराचा प्रशासकीय कारभार हाकणारे आणि या योजनेची संबंध असणारे अधिकारी मुख्यमंत्र्यांना योजनेच्या पूर्णत्वाविषयी आजवर खोटी माहिती देत होते असा होतो. पण या साऱ्यात मुख्यमंत्री अनेकदा तोंडघशी पडले, याचे भान कुणालाच राहिले नाही.
शहरवासियांच्या भावनेशी हा खेळच!
एकंदरीत छत्रपती संभाजीनगरकरांच्या भावनेशी राजकीय नेत्यांनी केलेला खेळच म्हणावा लागेल. आजवर योजना तांत्रिक अडचणी आणि अंमलबजावणीच्या कारणांमुळे रखडली असली तरी आता योजनेचे काम अंतिम टप्प्यात आल्याने शहरवासीयांच्या आशा उंचावल्या आहेत. पण या उंचावलेल्या आशा पूर्णत्वास कधी जातील आणि आजवर आपल्याला पाणी मिळू न देण्याचे पाप कोणी केले, या प्रश्नांचा गुंता आजही छत्रपती संभाजीनगरवासीयांच्या कायम आहे. अर्थात हा गुंता लवकरच सुटेल आणि घरातील नळांना २४ तास ७ दिवस पाणी पाहायला मिळण्याचे त्यांचे स्वप्न लवकर पूर्ण होईल, हीच छत्रपती संभाजीनगरकरांची इच्छा आहे. त्यांची ही इच्छा पूर्ण होईल तो दिन सुदिन ठरेल.
आतापर्यंतच्या डेडलाइन्स
डॉ. भागवत कराड : जानेवारी २०२४ (दिवसाआड पाणी)
खा. संदिपान भुमरे : डिसेंबर २०२४ पर्यंत
संजय शिरसाट : एप्रिल २०२५
अतुल सावे : जून २०२५
उदय सामंत : २०२६ मध्ये योजना पूर्ण होईल.
देवेंद्र फडणवीस : डिसेंबर २०२५ आणि आता एप्रिल २०२६
चंद्रशेखर बावनकुळे : अजून वर्षभर तरी योजना पूर्ण होणार नाही.

