- News
- जिल्हा न्यूज
- कन्नड हादरले : वंदनाने गुप्तांग दाबून मारले, धीरजने डोक्यात घातले शस्त्राचे वार, माजी सरपंचपूत्राच्...
कन्नड हादरले : वंदनाने गुप्तांग दाबून मारले, धीरजने डोक्यात घातले शस्त्राचे वार, माजी सरपंचपूत्राच्या हत्येचे गूढ उकलले!!
कन्नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धारदार हत्याराने गुप्तांग आणि डोक्यात वार करून राजू रामचंद्र पवार (वय ४५, रा. जामडी फॉरेस्ट, ता. कन्नड) यांची १३ जानेवारीला सकाळी हत्या करण्यात आली होती. या हत्येचा उलगडा करण्यात छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. ही हत्या शारीरिक संबंधाच्या मागणीला कंटाळून गावातीलच महिलेने तिच्या मुलासोबत मिळून केल्याचे समोर आले आहे.
राजू पवार १३ जानेवारीला सकाळी ८ च्या सुमारास युनिकॉर्न दुचाकीवरून नेहमीप्रमाणे शेतात गेले. सकाळी १० पर्यंत घरी जेवणासाठी न आल्याने त्यांची पत्नी कडूबाई यांनी दिराला सांगितले. राजू यांचा मोबाइलही बंद येत होता. त्यामुळे दीर प्रकाश पवार हे गावातील काही लोकांसोबत राजू यांचा शोध घेण्यासाठी शेतात गेले. राजू यांची दुचाकी नदीच्या काठावरील वडाच्या झाडाजवळ उभी होती. राजू दिसून येत नसल्याने शोध घेत असताना लगतच्या जंगलात त्यांचा मोबाइल फुटलेल्या अवस्थेत कोळ नदीच्या काठावर व पायातील चप्पल मोहाच्या झाडाजवळ मिळून आली.
राजू यांचा मृतदेह डवळ नाल्याच्या पाण्यात आढळला. अंगात पँट व अंडरपँट नव्हती. गुप्तांग व अंडाशयाला गंभीर जखमा होत्या. पोलीस पाटील निर्मला पवार यांनी कन्नड ग्रामीण पोलिसांना कळवले होते. या प्रकरणात राजू यांचे मोठे भाऊ प्रकाश यांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करून कन्नड ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखाही करत होती. राजकीय घराणे असल्याने या हत्येचे गांभीर्य वाढले होते. तपासात भाषेची अडचण येत होती. पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी बंजारा भाषा अवगत असणाऱ्या व्यक्ती आणि महिलांची गुप्तपणे गावात नेमणूक केली. त्यातूनच वंदना पवारचे नाव समोर आले.
पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने संशयावरून वंदना पवार हिला ताब्यात घेतले आणि विचारपूस सुरू केली. सुरुवातीला ती उडवाउडवीची उत्तरे देत होती. मात्र कसून चौकशीत तिने खुनाची कबुली दिली. तिने सांगितले, की राजू पवार तिच्याकडे शारीरिक संबंधांची मागणी करत होता. त्रासाला कंटाळून तिने मुलगा धीरजला ही बाब सांगितली. त्यानंतर दोघांनी मिळून राजूचा काटा काढण्याचे ठरले. वंदनाने राजूला शेतात भेटायला बोलावले. तो तिथे येताच धीरजने त्याच्या डोक्यात धारदार शस्त्राचे वार केले. वंदनाने राजूचे गुप्तांग दाबून ठार मारले. नंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मोबाइल, अंडरपँट, चपला वेगवेगळ्या ठिकाणी फेकली. त्यांनी दृश्यम चित्रपट आणि क्राइम पेट्रोल मालिका पाहून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. राजू यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील असा परिवार आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधिक्षक अन्नपूर्णा सिंह, सहायक पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर मोटे, पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे, पोलीस अंमलदार विष्णू गायकवाड, रवि लोखंडे, प्रमोद पाटील, अशोक वाघ, शिवानंद बनगे, सुनिल गोरे, सचिन राठोड, दीपक सुरोसे, जनाबाई चव्हाण, महेश बिरुटे, अनिल काळे, बलविरसिंग बहुरे, योगेश तरमाळे, जीवन घोलप, गणेश घोरपडे, राजेश राठोड, संजय तांदळे, नीलेश कुडे, शिवानी मगर तसेच कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार, पोलीस उपनिरीक्षक अमोल जाधव, पोलीस अंमलदार अजय मोतिंगे, कैलास करवंदे, धीरज चव्हाण, लक्ष्मण गवळी, दिलवरसिंग वसावे, बाबासाहेब धनुरे, सविता सोनवणे, मोनिका सिरसाठ यांनी केली.

