- Marathi News
- एंटरटेनमेंट
- अभिनेता ईशान खट्टरची विशेष मुलाखत : मी जो आहे तो माझ्या हिंमतीवर, भाऊ शाहिदलाही माझा अभिमान, त्याच्य...
अभिनेता ईशान खट्टरची विशेष मुलाखत : मी जो आहे तो माझ्या हिंमतीवर, भाऊ शाहिदलाही माझा अभिमान, त्याच्याशी तुलना करण्यास माझी हरकत नाही...
.jpg)
जगभरात प्रतिष्ठित कान्स चित्रपट महोत्सव ते ऑस्करमधील ऑफिशियल एंट्रीपर्यंत आपल्या दमदार अभिनयाने लक्ष वेधणाऱ्या अभिनेता ईशान खट्टरने भलेही त्याच्या कारकिर्दीची सुरुवात चित्रपट निर्माते अनुराग कश्यप यांचा सहाय्यक म्हणून केली असेल, मात्र त्याचे ध्येय अभिनय हेच राहिले. म्हणूनच, माजिद माजिदीचा चित्रपट "बियॉन्ड द क्लाउड्स’ असो किंवा "धडक’... ईशानने आपल्या अभिनयाची छाप सोडली. परफेक्ट कपल या आंतरराष्ट्रीय वेब सिरीजमध्येही त्याची महत्त्वाची भूमिका होती. त्याच्याशी खास बातचीत...
घराणेशाही आणि शाहिद कपूरसारख्या स्टारचा भाऊ असल्याने ईशानला सुरुवातीच्या काळात तुलनांना सामोरे जावे लागले. आता तो जागतिक स्तरावर आल्याने तुलना थांबल्या आहेत का? असे विचारले असता ईशान म्हणतो, की मला कधीच काही हरकत नव्हती. तो माझा मोठा भाऊ आहे, माझ्यापेक्षा १५ वर्षांनी मोठा आहे. मी त्याला पाहत आणि त्याच्याकडून प्रेरणा घेत मोठा झालो. तुलना केली जाण्यास मला हरकत नाही. ते अपरिहार्य आहे. मला माझे स्वतःचे वास्तव माहीत आहे. मला नेहमीच स्वतःच्या हिंमतीवर कलाकार व्हायचे होते, यशस्वी व्हायचे आहे. मी खूप भाग्यवान आहे, मला संधी मिळत गेल्या. मी कठोर परिश्रम केले आहेत आणि आज मी स्वतःहून, मला जे करायचे होते आणि जिथे मला व्हायचे होते ते करत आहे. मी हे अभिमानाने सांगू शकतो.
होमबाउंडमध्ये ईशानची मोहम्मद शोएब अलीची भूमिका पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी अस्वस्थता अनुभवली. ते भावनिकदृष्ट्या विचलित झाले. यावर ईशान म्हणतो, की काही चित्रपट हे केवळ चित्रपट नसतात. दिग्दर्शक नीरज घेवान यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले होते, की ही भूमिका तू केवळ निभवायची नाहीस तर जगायची आहेस. पात्र जगण्यासाठी, त्याचे सार जाणून घेणे आवश्यक होते. मी तीन महिने संवादांवर काम केले. मी बाराबंकीच्या ग्रामस्थांना भेटलो आणि त्यांच्या सुख-दु:खाबद्दल जाणून घेतले. शोएब आणि चंदन (विशाल जेठवा) यांच्यातील मैत्री या कथेच्या केंद्रस्थानी आहे.
विविधता गमावू नका
चित्रपटात, ईशान खट्टरची व्यक्तिरेखा, शोएब जातीभेदाचा बळी आहे. त्याला त्याच्या वैयक्तिक आयुष्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कधी अशा भेदभावाचा सामना करावा लागला आहे का? ईशान म्हणतो, की आपण नेहमीच विविध पार्श्वभूमीतून आलो आहोत याचा मला खूप अभिमान आहे. ती आपल्यासाठी एक सुंदर गोष्ट आहे. आपण ते गमावू नये. कारण ती आपली ताकद आहे. कदाचित म्हणूनच मी या चित्रपटाशी आणि या पात्राशी इतके जोडले जाऊ शकलो. सहानुभूती असणे आणि कोणत्याही धर्म, जाती किंवा वर्गातील लोकांना समजून घेण्याची क्षमता असणे खूप महत्वाचे आहे.