मोठी बातमी : पित्‍याचा खून करून मृतदेह घरात पुरला!; क्रूरकर्मा मुलाच्या कृत्‍याने पैठण हादरले!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मुलानेच पित्‍याचा खून करून मृतदेह राहत्‍या घरात पुरून टाकला. ही खळबळजनक आज, २२ नोव्‍हेंबरला सकाळी कडेठाण (ता. पैठण) येथे समोर आली. त्यानंतर पैठण तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संशयित मुलाला अटक केली असून, रात्री सव्वासातला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह खोदून बाहेर काढण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील, सहायक पोलीस निरीक्षक सचिन पंडीत, पोलीस उपनिरीक्षक राम बाराहते व त्यांचे सहकारी घटनास्‍थळी होते.

रामेश्वर कल्याण काळे (वय २८, रा. कडेठाण, ता. पैठण) असे संशयित मुलाचे नाव आहे. कल्याण बाबुराव काळे (वय ६८) असे मृतकाचे नाव आहे. कल्याण यांना रामेश्वर आणि लक्ष्मण काळे (वय २२) अशी दोन अविवाहीत मुले आहेत. पत्नी सुमनबाई (वय ६२) भोळसर आहे. सध्या लक्ष्मण ऊसतोडीसाठी बाहेरगावी आहे. कल्याण पत्नी सुमनबाई व मुलगा रामेश्वरसोबत गायरान जमिनीवरील जुन्या माळवदाच्या घरासह पत्र्याच्या शेडमध्ये राहत होते. दोघा बापलेकाला दारूची सवय असल्याने त्यांच्यात कायम वाद होत असत.

आठ दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून बापलेकात चांगलीच जुंपली. दोघांत मारामारी सुरू झाली. रामेश्वरने वडील कल्याण यांना इतकी मारहाण केली, की कल्याण यांचा जीव गेला. त्यामुळे भांबावलेल्या रामेश्वरने राहत्या माळवदाच्या घरात कल्याण यांचा मृतदेह पुरून टाकला. सुमनबाईंनी घटना पाहिली, पण घाबरून कुणाला काही सांगितले नाही. कल्याण काळे आठ दिवसांपासून बेपत्ता असूनही कोणी गांभीर्याने लक्षात घेतले नाही. मात्र आज सकाळी मृतदेह सडून दुर्गंधी येऊ लागल्याने सुमनबाईंनी दिराला घडलेला प्रकार सांगितला.

दिराने पाचोड पोलिसांना कळवले. सहायक पोलीस निरीक्षक सचिन पंडित, पोलीस उपनिरीक्षक राम बाराहते यांनी सहकाऱ्यांसह  कडेठाणला येऊन घटनास्‍थळ गाठले. रामेश्वरला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात नेले. तिथे तहसीलदारांसमोर त्याचा जबाब नोंदविण्यात आला. त्यानंतर पाचोडचे मंडळाधिकारी जयकुमार केकाण यांच्यासमक्ष मृतदेह उकरून बाहेर काढण्यात आला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन पंडीत करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात दर मिनिटाला वाढताहेत फ्‍लॅटच्या किंमती

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software