- Marathi News
- सिटी डायरी
- छ. संभाजीनगरमध्ये अतिक्रमण हटावमुळे बेघर झालेल्या परिवारांना मोफत घरे देणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शि...
छ. संभाजीनगरमध्ये अतिक्रमण हटावमुळे बेघर झालेल्या परिवारांना मोफत घरे देणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, रस्ते विकासासाठी १९५० कोटींचा आराखडा
.jpg)
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरात रस्ते विकास, पाणी पुरवठा वितरणाचे सुसूत्रिकरण, सांडपाणी प्रक्रिया, अतिक्रमण हटाव मोहिमेत बेघर झालेल्यांना मोफत घरे देणे याबाबत महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांचा आढावा सोमवारी (८ सप्टेंबर) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेत बेघर झालेल्या परिवारांना मोफत घर देण्यात येईल, त्यासाठी म्हाडा कडुन घरे मिळविण्याची प्रक्रिया राबवावी, असे निर्देश श्री. शिंदे यांनी यंत्रणेस दिले.
.jpg)
आगामी कुंभामेळाच्या अनुषंगाने नाशिक, त्र्यंबकेश्वर, छत्रपती संभाजीनगर, वेरूळ (घृष्णेश्वर मंदिर), शिर्डी, शनि शिंगणापूर या ठिकाणी तीर्थ यात्रा करण्यासाठी भाविक येतील. त्यासाठी शहरातून दळणवळण अधिक गतिमान व्हावे. तसेच पडेगाव रस्ता, पैठण रस्ता, बीड बायपास, जालना रस्ता, जळगाव रस्ता, सिडको ते बीड बायपास हे रस्ते तसेच महावीर चौक फ्लाय ओव्हर ब्रीज, अमप्रीत हॉटेल जवळ अंडरपास अशा ४४.५ किमी रस्त्याचा या रस्ते विकास प्रकल्पात समावेश आहे. या एकूण प्रकल्पात १२ फ्लायओव्हर होणार आहेत, अशी माहिती सादरीकरणात देण्यात आली. रस्ते विकासासाठी १९५० कोटी रुपयांचा निधी लागणार असून सन २०२५-२६ मध्ये ३९० कोटी, सन २०२६-२७ मध्ये ११७० कोटी रुपये, सन २०२७-२८ मध्ये ३९० कोटी रुपये असा तीन टप्प्यांत हा निधी खर्च होईल.
मार्च २०२६ पर्यंत दररोज पाणीपुरवठा
शहरात येत्या मार्च २०२६ अखेर दररोज पाणी पुरवठा करता यावा यासाठी उपाययोजना सुरू आहेत. पहिला २६ एमएलडीचा टप्पा कार्यान्वित झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात २०० एमएलडी पुरवठा नोव्हेंबर अखेर सुरू होईल. त्यामुळे एक दिवसाआड पाणी पुरवठा करणे शक्य होईल. मार्च अखेर दररोज पाणी पुरवठा शक्य होईल, असे मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी सांगितले. पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास आणण्यासाठी ८२२ कोटी रुपये कर्ज स्वरुपात घेण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
अतिक्रमण हटाव मुळे बेघर झालेल्या लोकांना मोफत घरे
शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेत बेघर झालेल्या लोकांना मोफत घरे देण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. १५० घरे म्हाडाकडून मिळणार असून त्यासाठी २४ कोटी रुपये निधी लागणार आहे. तसेच विविध आवास योजना मधूनही नागरिकांना घरे उपलब्ध करून द्यावीत. तसेच उद्योग वाढीमुळे येणाऱ्या कामगार, कर्मचारी वर्गाला परवडतील अशा घराच्या निर्मितीचा प्रकल्प राबवावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
सांडपाणी प्रक्रिया योजना ही पूर्णत्वाकडे
सांडपाणी प्रक्रियेसाठी ८३० कोटी रुपयांची योजना राबविण्यात येत असून ती ७५ टक्के पूर्णत्वास आली आहे. जूनपर्यंत ही योजना पूर्ण होईल, असे जी. श्रीकांत यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महापालिकेने स्वतः च्या उत्पन्नाचे स्रोत वाढवायला हवे. सांडपाणी प्रक्रियेत शुद्ध केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्याबाबत एमआयडीसीशी करार करावा. शहरातील रहदारी अडथळे विरहित व्हावी यासाठी रस्ते विकास प्रकल्प राबवा. विकास आराखड्यानुसार रस्ते विकास करा. अतिक्रमण हटाव मुळे बेघर झालेल्या कुटुंबंना घरे द्या, असे निर्देश श्री. शिंदे यांनी दिले. अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागात तात्काळ पंचनामे करा व शेतकऱ्यांना मदत करा. जालना- नांदेड रस्त्याच्या भू संपादन प्रक्रियेत मूल्यांकन फरकाची शेतकऱ्यांची मागणी आहे, त्याची तपासणी करा, असेही निर्देश त्यांनी दिले.