- News
- सिटी डायरी
- सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छत्रपती संभाजीनग...
सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये घोषणा, गिनीज बुकतर्फे विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : देशात महाराष्ट्र हे सौर ऊर्जेचा शेतीत सर्वाधिक वापर करणारे राज्य ठरले आहे. शेतकऱ्यांसाठी फिडर सौर ऊर्जेवर आणून स्वतंत्र १६ हजार मेगा वॅट वीज निर्मिती करू. त्यामुळे अन्य वापरातील विजेच्या दरात आपण दरवर्षी ३ टक्के कपात करून ग्राहकांना स्वस्त वीज देऊ शकतो, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, ५ डिसेंबरला केले.
सुरुवातीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यातील सौरकृषी पंपाचे डिजिटल लोकार्पण करून त्यांनी लाभार्थी शेतकऱ्यांशी दुरदृष्य प्रणालीने संवाद साधला. त्यानंतर गिनीज बुक विक्रम नोंदचे निरीक्षक पंच कार्ल सॅबेले यांनी विक्रमाची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी प्रमाणपत्र व मेडल मान्यवरांना प्रदान केले. सौर कृषी पंप योजनेसाठी अर्थसहाय्य करणाऱ्या AIIM बँकेसोबतच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. बँकेचे प्रत्युष मिश्रा व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
कार्ल सॅबेले म्हणाले की, विक्रमासाठी ३५ हजार पंप स्थापित करणे आवश्यक होते. मात्र प्रत्यक्षात ४५ हजार ९११ पंप स्थापित करण्यात आले, हा एक विश्वविक्रम आहे. या प्रत्येक पंपाच्या उभारणी ते कार्यान्वयन या सर्वटप्प्यांवर पडताळणी करूनच या विक्रमास मान्यता देण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. या ठिकाणी लावलेल्या सौर ऊर्जा उत्पादनांच्या प्रदर्शनालाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट दिली व पाहणी केली. प्रास्ताविक लोकेश चंद्रा यांनी केले. निता पानसरे यांनी आभार मानले. नीता पानसरे, आश्विनी दाशरथे, प्रेषित रुद्रावतार यांनी सूत्रसंचालन केले.

