- News
- सिटी क्राईम
- जे. के. जाधव पिता-पुत्राकडून ‘एमसीए’च्या १३३ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; कोट्यवधींची फसवणूक, श्...
जे. के. जाधव पिता-पुत्राकडून ‘एमसीए’च्या १३३ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; कोट्यवधींची फसवणूक, श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटरमधील धक्कादायक प्रकार, पोलिसांनी केला गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची संलग्नता नसतानाही चिकलठाण्यातील श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटरने १३३ विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १ लाख १० हजार रुपये शुल्क घेऊन प्रवेश दिला. विद्यापीठाच्या परीक्षांना गुरुवारपासून (४ डिसेंबर) सुरुवात झाली, पण हॉलतिकीट न मिळालेले विद्यार्थी कावरेबावरे झाले. त्यांनी विद्यापीठात धाव घेतल्यानंतर संस्थाचालक जे. के. जाधव आणि विक्रांत जाधव या पिता-पुत्राचा चालूपणा समोर आला. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. एका विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून पोलिसांनी जाधव पिता-पुत्रासह दोन शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाने याच श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च सेंटरच्या एमबीए अभ्यासक्रमाच्या १६ विद्यार्थ्यांना हॉलतिकीट उपलब्ध करून दिल्याची माहिती प्र- कुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे यांनी दिली. या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज बुधवारी (३ डिसेंबर) सायंकाळी शुल्कासह भरून घेण्यात आले. त्यानंतर रात्री ९ च्या सुमारास परीक्षा विभागाने हॉलतिकीट दिले. श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्च सेंटरमध्ये एमबीएच्या अभ्यासक्रमासाठी १९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे. त्यांनी विद्यापीठाच्या परीक्षा शुल्काचे पैसे कॉलेजकडे जमा केले. मात्र कॉलेजने पैसे आणि त्यांचे अर्ज विद्यापीठात जमाच केले नाहीत. त्यामुळे विद्यापीठाने विद्यार्थ्यांना हॉलतिकीट दिले नव्हते. कॉलेजने फसवल्याचे लक्षात आपल्यावर त्यांनी लगेचच खंडपीठात धाव घेतली. त्यात खंडपीठाने १९ विद्यार्थ्यांना हॉलतिकीट देण्याचे आदेश विद्यापीठाला दिले. १९ पैकी १६ विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज आणि शुल्क भरून हॉलतिकीट प्राप्त केले.
ना शिक्षक, ना संगणक, ना पुस्तके...
श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये विद्यापीठाच्या समितीने तपासणी केली असता विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी प्राचार्य, शिक्षक, संगणक, ग्रंथालयात पुस्तके उपलब्ध नव्हती. त्यामुळे २४ नोव्हेंबरला विद्यापीठाने प्रथम वर्ष संलग्नता फेटाळली होती, असे समोर आले आहे.

