- News
- सिटी क्राईम
- छत्रपती संभाजीनगरसाठी रविवार ठरला अपघातवार : ४ भीषण दुर्घटनांत ३ ठार, १७ जखमी!; वाळूजजवळ २, वैजापूर-...
छत्रपती संभाजीनगरसाठी रविवार ठरला अपघातवार : ४ भीषण दुर्घटनांत ३ ठार, १७ जखमी!; वाळूजजवळ २, वैजापूर-सिल्लोडमध्ये प्रत्येकी १ अपघात
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४ वेगवेगळ्या अपघातांत रविवारी (१४ डिसेंबर) तिघांचा मृत्यू झाला, तर १७ जण जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.वाळूजजवळ दोन आणि वैजापूर व सिल्लोड तालुक्यात प्रत्येकी एक अपघात झाला.
भरधाव कंटेनरला मागून दुचाकीकी धडकून दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (१४ डिसेंबर) रात्री ७.४५ च्या सुमारास वाळूज येथील हनुमाननगर परिसरात घडली. पंढरपूरकडून पुण्याच्या दिशेने वाळूजमार्गे कंटेनर (क्र. एमएच ४६ बीबी ३२७५) भरधाव जात होता. कंटेनरच्या पाठोपाठ दुचाकी (क्र. एमएच २० जीयू ०७०८) होती. दुचाकी कंटेनरला मागून धडकली. यात दुचाकीचा चुराडा झाला, दुचाकीस्वार विशाल रोहिदास वाघचौरे (वय अंदाजे २५, रा. खांडे पिंपळगाव, ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर) याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप वाघ, पोलीस अंमलदार सुधीर कांबळे, ज्ञानेश्वर राऊत, प्रसन्ना सातदिवे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठविला. कंटेनर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. मृतकाच्या खिशात मिळालेल्या व्हिजिटिंग कार्डवरून त्याची ओळख पटली. वाळूज पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून तपास सुरू आहे.
वाळूजजवळील शिवराई गावासमोरील गतिरोधकाजवळ रविवारी (१४ डिसेंबर) पहाटे खासगी ट्रॅव्हल्स बस आणि मालवाहू ट्रक यांच्यात भीषण अपघात होऊन बस रस्त्याखाली जाऊन उलटली. यात १३ प्रवासी जखमी झाले. १६ वर्षीय अनुष्का गव्हाणे ही गंभीर जखमी झाली. तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रक (क्र. एमएच ४० बीएल ०८५८) पुण्याकडून नागपूरकडे जात होता. गतिरोधकामुळे वेग कमी केला असताना मागून भरधाव आलेली इंटरसिटी स्मार्ट खासगी ट्रॅव्हल्स बस (क्र. एआर ०१ वाय ७८७८) ट्रकला जोरात धडकली. त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटून बस रस्त्याच्या खाली जाऊन उलटली. बसमध्ये ३४ प्रवासी होते. किरकोळ जखमींवर घटनास्थळीच प्रथमोपचार करण्यात आले. अनुष्काची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी दिली. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बसचालक हंसराज भाटिया (वय ४३, जि. बिलासपूर, हिमाचल प्रदेश) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दुचाकीस्वाराला मागून भरधाव आलेल्या आयशर ट्रकने जोरात धडक दिली. यात दुचाकीस्वार अक्षय मोठेबा वराडे (वय २७, रा. सारोळा, ता. सिल्लोड) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील सिल्लोड शहरापासून काही अंतरावर रविवारी (१४ डिसेंबर) दुपारी २:४५ च्या सुमारास घडली. अक्षय सिल्लोडहून सारोळा गावाकडे दुचाकीने (क्र. एमएच २० ईव्ही ६०४२) जात होता. सिल्लोड शहरापासून काही अंतरावर स्वस्तिक लॉनजवळ मागून भरधाव आयशर ट्रकने (क्र. एमएच २० इजी ५५८४) त्याला उडवले. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून ट्रकसह पसार झाला. सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अक्षयला सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा सारोळा येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी घेतली आहे.
वैजापूरच्या जांबरगाव शिवारात रुग्णवाहिकेचा अपघात, महिलेचा मृत्यू
रुग्णवाहिकेने ट्रकला मागून जोरात धडक दिली. भावाचा मृतदेह घेऊन मूळ गावी उत्तरप्रदेशमध्ये घेऊन जात असलेल्या बहिणीचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. त्यांचे पती गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी (१३ डिसेंबर) पहाटे एकच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील जांबरगाव शिवारात (ता. वैजापूर) घडला. सावित्रीदेवी भगवतीप्रसाद यादव (वय ४९, रा. मुंबई) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. उत्तर प्रदेशातील यादव कुटुंबीय मुंबईला राहतात. सावित्रीदेवींचे भाऊ लालजी यादव (वय ६५) यांचे हार्टॲटॅकने निधन झाल्याने मृतदेह मुंबई येथून मूळ गावी उत्तर प्रदेशमध्ये रुग्णवाहिकेतून नेण्यात येत होता. यादव कुटुंबातील ४ सदस्य व चालक असे ५ जण रुग्णवाहिकेत होते. जांबरगाव शिवारात रुग्णवाहिकेने (क्र. बीडी ०३ टी ९७२५) मागून ट्रकला जोरात धडक दिली. यात सावित्रीदेवी यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती भगवती प्रसाद यादव गंभीर जखमी झाले. इतर तिघांना किरकोळ दुखापत झाली. संदीपकुमार भगवती प्रसाद यांनी दिलेल्या तक्रारीवरून रुग्णवाहिका चालकाविरुद्ध वैजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

