- News
- सिटी क्राईम
- बालपणीच्या मैत्रिणीशी चाळीशीत ‘मैत्री’ वाढवणे पडले महागात!, त्याची पत्नी आणि मैत्रीण भिडल्या, तुंबळ
बालपणीच्या मैत्रिणीशी चाळीशीत ‘मैत्री’ वाढवणे पडले महागात!, त्याची पत्नी आणि मैत्रीण भिडल्या, तुंबळ हाणामारी, तोडफोड, छत्रपती संभाजीनगरच्या धनमंडीत काय राडा झाला, वाचा...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बालपणीची मैत्रीण, त्यातल्या त्यात दोघेही एकाच शहरात राहायला..., त्यामुळे मैत्री पुन्हा फुलली... व्हिडीओ कॉल, चॅटिंग सुरू झाले... पण ही बाब त्याच्या पत्नीला रूचली नाही अन् मोठाच राडा झाला. छत्रपती संभाजीनगर शहरातील जुना बाजार धनमंडीतील त्याच्या मैत्रिणीच्या घरी त्याची पत्नी नातेवाइकांसह धडकली आणि तिला जाब विचारला. त्यानंतर दोन्ही गट भिडले. तुंबळ हाणामारी, तोडफोड झाली. दोन्ही गटांतील सारेच कमीजास्त प्रमाणात जखमी झाले. हाणामारीनंतर हा वाद सिटी चौक पोलीस ठाण्यात पोहोचला. दोन्ही गटांच्या परस्परविरोधी तक्रारीवरून पोलिसांनी एकूण २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (१३ डिसेंबर) दुपारी १ ला घडली.
मनिषाने तक्रारीत काय म्हटलंय...
धनमंडीत राहणाऱ्या ४० वर्षीय मनिषाने तक्रारीत म्हटले आहे, की तिचे माहेर वैजापूर असून, आईच्या घराच्या बाजूला कावेरीच्या पतीचे घर आहे. कावेरीचा पती आणि मनिषा बालपणीचे मित्र- मैत्रिण आहोत. कधीतरी त्यांच्यात फोनवर बोलणे होत असते. शनिवारी दुपारी १ ला मनिषा व त्यांचा मुलगा घरी असताना कावेरी, तिचा पुतण्या, जावा, भावजयी, भाऊ, वडील असे सर्व जण मनिषाच्या घरी आले. कावेरीने ‘माझ्या नवऱ्याशी फोनवर का बोलते’ असे म्हणून मनिषाचे केस पकडून हाताचापटाने मारहाण केली. तिच्या भावजयींनी मनिषाचे हातपाय पकडून हाताचापटाने मारहाण केली. हातावर कावेरीने बोचकारले.
मनिषा यांचा मुलगा भांडण सोडवण्यास मध्ये आला असता त्याला कावेरीच्या भाऊ व वडिलांनी शिवीगाळ करून हाताचापटाने मारहाण केली. बाथरूमच्या दरवाजाला लाथ मारून दरवाजा तोडून नुकसान केले. त्यावेळी मनिषा यांच्या मुलाचा मित्र घरी येऊन वाद सोडवत असताना त्यालादेखील लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मनिषा यांचे दोन्ही मोबाइल जमिनीवर आपटून नुकसान केले. घरातील नळाचे पाईप व तोट्या तोडून नुकसान केले व सर्वांनी मिळून जीवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून कावेरीसह एकूण ८ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही तक्रारींचा तपास पोलीस उपनिरीक्षक संजय राठोड करत आहेत.

