- News
- एक्सक्लुझिव्ह
- जागावाटपावरून युतीत बिनसण्याची शक्यता! पूर्वीची शिवसेना असल्याच्या आविर्भात शिंदे गटाचा जागांसाठी हट...
जागावाटपावरून युतीत बिनसण्याची शक्यता! पूर्वीची शिवसेना असल्याच्या आविर्भात शिंदे गटाचा जागांसाठी हट्ट, भाजप आश्चर्यचकीत!; सावे-शितोळे म्हणाले, घाई नाही, स्वबळाचाही पर्याय...
मनोज सांगळे, संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महापालिकेची शेवटची निवडणूक २०१५ मध्ये झाली होती, त्यावेळी शिवसेनेचे (अविभाजित) २९ नगरसेवक निवडून आले होते, तर ९ नगरसेवकांनी नंतर शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे ३८ जागांवर शिंदे गटाने दावा केला आहे. मात्र दावा करताना शिंदे गटाने त्यावेळच्या परिस्थितीची आताच्या परिस्थितीशी तुलना केल्याने भाजप आश्चर्यचकीत झाली आहे. तरीही संयमाने घेत भाजपने घाई न करता चर्चा करून पुढील भूमिका घेण्याचे ठरवले आहे. आताच्या परिस्थितीत राज्यात आणि शहरात भाजप अधिक मजबूत आहे, तर शिवसेनेचे दोन गट झालेले आहेत. बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे शिंदे गट जास्त जागांवर अडून बसलाच तर स्थानिक पातळीवर युती तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या निवडणुकीत भाजपचे २३ नगरसेवक होते, तेवढ्या जागा भाजपला आणि उरलेल्या जागांचे समान वाटप, अशी भूमिका शिंदे गटाने घेतली आहे. त्यामुळे भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे डोके ठणकले आहे.
महापालिका निवडणुकीत सध्या भाजपने फुलंब्री फॉर्म्यूला अवलंबला आहे. एकेका प्रभागात २० ते ३० इच्छुक असल्याने बंडखोरीच्या शक्यतेने भाजपने काळजी घ्यायला सुरुवात केली आहे. त्यांना सोबतच मतदारांच्या भेटीगाठी घेण्यास सूचवले आहे. त्यामुळे एकत्रच सर्व इच्छुक जातात आणि मतदारांना भेटून आमच्यापैकी ज्याला उमेदवारी मिळेल त्याला मतदान करा, अशी गळ घालत आहे. फुलंब्री विधानसभा निवडणुकीत किशोर शितोळे यांच्यासह राधाकिसन पठाडे, सुहास शिरसाट असे निष्ठावंत आणि दिग्गज इच्छुक होते.
मात्र राष्ट्रवादी काँग्रेसतून भाजपात आलेल्या अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र तोपर्यंत सर्वच इच्छुक एक असल्याने बंडखोरी झाली नाही. हे इच्छुक एकत्रितपणेच सर्व कार्यक्रमांना हजेरी लावायचे, मतदारांच्या भेटी घ्यायचे. हाच फॉर्म्यूला शितोळे यांनी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर लागू केला आहे. त्यामुळे इच्छुकांकडून हसत खेळत प्रचार होत असल्याचा दावा शितोळे यांनी केला आहे. दरम्यान, आज, १५ डिसेंबर आणि उद्या, १६ डिसेंबला शिंदे गटाच्या पक्ष कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. ५ जणांची समन्वय समिती मुलाखती घेत आहे. ठाकरे गटाकडून इच्छुकांच्या मुलाखती १७ डिसेंबरला घेण्यात येणार आहेत.

