व्यावसायिक लूटमार, खंडणी प्रकरण : पुंडलिकनगर पोलिसांना कुख्यात गुन्हेगार टिप्या सापडेना, साथीदार शेख बादशाह, भूषण गवळी अटकेत

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : प्लॉट खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाला मारहाण करत तलवारीच्या धाकाने कुख्यात गुन्हेगार टिप्या उर्फ जावेद मकसूद शेख याने साथीदारांसह मिळून लुटले होते. अडीच लाख रुपये हिसकावून आणखी १ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. या प्रकरणात ७ गुंडांविरुद्ध पुंडलिकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर, त्‍यापैकी शेख बादशाह शेख बाबा (वय २३, रा. रेणुकानगर, जय अंबिकानगर, गारखेडा), भूषण गणेश गवळी (वय २९, रा. विश्वकर्मा चौक, गल्ली नं. १२, जयभवानीनगर) यांना गुरुवारी (१४ ऑगस्ट) अटक केली.

शहर गुन्हे शाखेने याआधी अभिषेक मोरे (वय २८) याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक अर्जुन राऊत, विनोद भालेराव, सुनील म्हस्के, अंमलदार प्रकाश डोंगरे यांच्या पथकाने बादशाह व भूषणच्या मुसक्या बुलडाणा जिल्ह्यातील किनगाव राजा येथे जाऊन आवळल्‍या. बादशाह रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. गुन्ह्यातील मुख्य संशयित टिप्या अद्याप फरारी असून, त्‍याचा शोध पोलीस घेत आहेत. त्‍याच्याविरुद्ध आजवर २५ गुन्हे दाखल आहेत. जुलैअखेर तो जामिनावर सुटला होता. त्यानंतर त्याने पुन्हा हा गुन्हा केला.

टिप्या परराज्यात पळून गेल्याचा संशय असून, तो सातत्याने मोबाइल क्रमांक बदलत फिरत आहे. टिप्या अल्पवयीन असल्यापासूनच गुन्हेगारी क्षेत्रात आहे. पूर्वी तो पोलिसांना गुन्ह्याविषयी माहिती देत असायचा. म्हणजेच खबऱ्या म्हणून काम करायचा. गुन्हे करता करता पोलिसांना इतर गुन्हेगारांची टिपही देत होता. टिप्याकडून पोलिसांना गुन्ह्यांची माहिती मिळत असे म्हणून त्याच्या गुन्ह्यांकडे पोलिसांनीही सुरुवातीच्या काळात दुर्लक्ष केले. बघता बघता टिप्या अट्टल गुन्हेगार झाला. आता टिप्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे.

व्यावसायिकासोबत नक्की काय घडलं होतं?
प्लॉट खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या शेख अजर शेख गणी (वय ४०, रा. गारखेडा गाव हनुमान मंदिराजवळ) हे मोपेडने २ ऑगस्टला रात्री पावणेनऊला मित्र अब्रार शेख हसन यांच्यासह स्पाईस ट्री हॉटेल बीड बायपास येथे गेले. त्यांच्या खिशात अडीच लाख रुपये होते. हॉटेलमध्ये जाण्यापूर्वीच अब्रार शेखच्या ओळखीचे टिप्या उर्फ जावेद शेख मकसूद शेख (रा. विजयनगर) व त्याच्यासोबत अर्जुन पाटील (रा. राजे चौक) हे त्‍यांच्यासमोरच्या टेबलवर दारू पित बसलेले होते. टिप्याने अर्जुनच्या कानात काहीतरी सांगून अर्जुनला हॉटेलमधून काढून दिले. काही वेळाने शेख अजर, अब्रार व टिप्या असे हॉटेलबाहेर आले. शेख अजर त्यांच्या ज्युपिटरवर बसले. टिप्या व अब्रार हे टिप्याच्या मोपेड ॲक्सेसवर बसल्यावर टिप्या अब्रारला म्हणाला, की साईनगरकडे गाडी घ्या. त्यानंतर तिघे साईनगर येथील डीपीजवळ रात्री १० ला आले. त्यावेळी तेथे आधीच टग्या व बादशहा व त्यांच्या सोबत दोन अनोळखी व्यक्‍ती उभे होते. टिप्याने शेख अजर यांच्या गालावर चापट मारली. तुझ्या खिशातील पैसे मला दे, असे म्हणत त्याने कोणालातरी कॉल केला व तलवार घेऊन यायला सांगितले. ५ मिनिटांनी अर्जुन पाटील व भूषण तिथे आले. भूषणने सोबत आणलेली तलवार टिप्याच्या हातात दिली.

टिप्याने तलवारीचे कव्हर बाजूला करून अजर यांच्या पोटाजवळ धरून खिशातील रोख अडीच लाख रुपये काढून घेतले. टिप्याने सकाळपर्यंत आणखी एक लाख रुपये मला आणून दे. मला एक लाख रुपये आणून दिले नाही तर तुला जीवे मारेल, अशी धमकी दिली. टग्याने अजर यांची मोपेडही जबरदस्तीने सोबत नेली. टिप्याने सोबतच्या अनोळखी व्यक्‍तीला ॲक्टिव्हावर अजर यांना घरी सोडायला सांगितले. त्‍या व्यक्‍तीने जवाहरनगर पोलीस ठाण्याजवळ सोडले. तिथे आल्यावर अजर यांनी भाऊ अजिम शेख गणी शेख यांना कॉल करून बोलावून घेत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात अजर हे अजीम व अब्रार यांच्यासोबत तक्रार देण्यासाठी आले होते. पोलिसांनी टिप्या उर्फ जावेद मकसूद शेख, भूषण, अर्जुन पाटील, टग्या, बादशहा व इतर दोन अनोळखी जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद भालेराव करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

प्लॅन सिटी निर्माण करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य; पालकमंत्री संजय शिरसाट यांची ग्वाही

Latest News

प्लॅन सिटी निर्माण करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य; पालकमंत्री संजय शिरसाट यांची ग्वाही प्लॅन सिटी निर्माण करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य; पालकमंत्री संजय शिरसाट यांची ग्वाही
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर महानगर क्षेत्रालगत वाढत जाणारे औद्योगिक क्षेत्र, लोकसंख्या विचारात घेत महानगराचा नियोजनबद्ध विकास करावा...
५ लाखांसाठी २२ वर्षीय विवाहितेचा छळ, देवगाव रंगारी पोलिसांनी केला पतीसह सासरच्या ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
मरण समीप आले, अंतिम घटका मोजत असताना मध्ये उभे ठाकले २ देवदूत!; माणुसकी जपत युवकाला दिले जीवनदान, वाळूज महानगरात काय घडलं... पोलिसांनीही बजावलं कर्तव्य!!
मोठी बातमी : चौका येथे ढगफुटी; छ. संभाजीनगर-फुलंब्री महामार्गावरून एकेरी वाहतूक सुरू
मंत्री दादाजी भुसे अचानक जिल्हाधिकारी कार्यालयात अन्‌ अधिकाऱ्यांची उडाली धांदल!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software