- News
- सिटी क्राईम
- सराफा व्यापाऱ्यासह चौघांनी शेतकऱ्याला घातला २ कोटींचा गंडा!, छत्रपती संभाजीनगरातील धक्कादायक घटना, म...
सराफा व्यापाऱ्यासह चौघांनी शेतकऱ्याला घातला २ कोटींचा गंडा!, छत्रपती संभाजीनगरातील धक्कादायक घटना, म्हणे महसूलमंत्री आमच्या ओळखीचे...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीची नव्याने मोजणी करून देतो, मुलांना मंत्रालयात, रेल्वेत टीसीची नोकरी लावून देतो. महसूल मंत्री ओळखीचे आहेत, असे खोटेच सांगत चौघांनी मिळून छत्रपती संभाजीनगर शहराजवळील माळीवाड्याच्या शेतकऱ्याला तब्बल २ कोटी ५ लाख रुपयांनी गंडा घातला. दौलताबाद पोलिसांनी गुरुवारी (१ जानेवारी) ४ भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शेतकरी सूर्यभान रंगनाथ पल्हाळ (वय ६७) असे फसवले गेलेल्या शेतकऱ्याचे नाव असून, अनिल अमरचंद साकला (रा. मंजितनगर, जालना रोड), शेख मोहम्मद खालेद शेख मोहम्मद हनिफ (रा. बारुदगरनाला, सुल्तानपुरा), जिलानी मुसा निजाम धोंगडे (रा. शिवाजीनगर) व आदमखान अहमदखान सुकेडे (रा. अजिंठा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. जिलानी हा विद्युत निरीक्षक विभागात वरिष्ठ लिपिक आहे.
२००६ मध्ये शेतकरी पल्हाळ आणि साकला यांची भेट झाली. मैत्री वाढून कौटुंबिक संबंधही निर्माण झाले. २०१७ मध्ये पल्हाळ यांची जमीन समृद्धी महामार्गात गेली. त्यांना सरकारकडून २ कोटी २४ लाख ५५ हजार रुपयांचा मोबदला मिळाला. साकलाने आधी १० लाख रुपये हातउसणे घेतले. २०१९ मध्ये पल्हाळ यांची समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीची पुनर्मोजणी झाली. त्यावेळी १३ गुंठे अधिकची जमीन महामार्गात गेल्याचे समोर आले. साकलाने महसूल मंत्री आपल्या ओळखीचे असल्याचे सांगून त्या जमिनीचे पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी त्याने कासारी बाजार येथील त्याच्या महिमा ज्वेलर्स दुकानात २ लाख रुपये घेतले. मात्र नंतर टाळाटाळ करत राहिला.
२०२१ मध्ये एका मुलाला आरोग्य विभागात, दुसऱ्याला मंत्रालयात व तिसऱ्याला रेल्वे विभागात टी.सी.ची नोकरी लावण्याचे आमिष साकलाने दाखवले. शेतकरी पल्हाळ हे पुन्हा त्याच्या बोलण्यात आले. साकलाने त्यांच्याकडे १ कोटी रुपये मागितले. मोहम्मद खालेदच्या घरी पल्हाळ यांची भेट जिलानी मुसा निजाम धोंगडेशी घालून देण्यात आली. निजाम हा मंत्रालयातील अधिकारी असल्याचे सांगितले. वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगत, अधिकाऱ्यांना पैसे देण्यासाठी म्हणून चारही भामट्यांनी एकूण २ कोटी ५ लाख रुपये उकळले. फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर अखेर पल्हाळ यांनी पोलिसांत धाव घेतली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप वाघ करत आहेत.

