- News
- सिटी क्राईम
- Follow up Story : मास्टरमाइंड बलवीर पाजी अन् जॉन!; कटाला मूर्त रुप देण्याची जबाबदारी राजवीरकडे सोपव...
Follow up Story : मास्टरमाइंड बलवीर पाजी अन् जॉन!; कटाला मूर्त रुप देण्याची जबाबदारी राजवीरकडे सोपवून पाजीने गुंतवले २० ते २५ कोटी!!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगरमधील अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा सूत्रधार २२ वर्षीय राजवीर प्रदीप शर्मा याला घेऊन शहर पोलिसांचे पथक रविवारी (२ नोव्हेंबर) सकाळी त्याच्या अहमदाबादमधील वल्लभनगरातील घरी धडकले. त्याच्या घराची कसून झडती घेतली. अनेक महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली आहेत. राजवीर हा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर येत होते. पण चौकशीत त्याचा काका बलवीर वर्मा ऊर्फ पाजी हा मास्टरमाइंड असल्याचे समोर आले आहे. त्याने पुतण्याकडे रॅकेटची सूत्रे सोपवली होती. बलवीरचा शोध गुजरातमध्ये घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अमेरिकन नागरिकांना असे लुटायचे...
चिकलठाणा एमआयडीसीतील आयटी पार्कमध्ये आयआरएस इंटर्नल रेव्हेन्यू सर्व्हिस इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट नावाने सायबर गुन्हेगारांनी अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर उघडले होते. त्यावर सिडको एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी (२८ ऑक्टोबर) छापा मारून ११६ तरुण-तरुणींना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून ११९ लॅपटॉप व मोबाइलसह अन्य तांत्रिक, डिजिटल साधने असा कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. या कॉल सेंटरमधून अमेरिकेन नागरिकांना कॉल, मेसेज करून करचुकवल्याबद्दल भीती दाखवून किंवा वेगवेगळ्या योजनांची आमिषे दाखवून कोट्यवधी रुपयांनी गंडवले जात होते.

