- News
- सिटी क्राईम
- महिला वाहकाने वृद्ध प्रवाशी महिलेला बसमध्ये केली मारहाण, संतप्त पुत्राने बसस्थानकावर घातला गोंधळ!
महिला वाहकाने वृद्ध प्रवाशी महिलेला बसमध्ये केली मारहाण, संतप्त पुत्राने बसस्थानकावर घातला गोंधळ!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सध्या दिवाळी एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये गर्दी होत आहे. त्यामुळे एसटी वाहक-चालकांवर कामाचा ताण आला आहे. मात्र हा ताण ते प्रवाशांवर काढत असल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आली आहे. शिर्डीवरून निघालेल्या बसमध्ये चढतानाच आधी वाहक महिलेने एका वृद्धेला अरेरावी करत मारहाण केली. ही बाब वृद्धेने त्यांच्या लेकाला कळवल्यानंतर त्यांनी मध्यवर्ती बसस्थानकात बस येताच अडवून या वाहक महिलेला चांगलेच धारेवर धरले. विशेष म्हणजे, चोरावर मोर होत या वाहक महिलेने सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा ६० वर्षीय वृद्धेसह त्यांच्या लेकाविरुद्ध दाखल केल्याने संताप व्यक्त होत आहे. ही घटना गुरुवारी (१६ ऑक्टोबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. सध्याच्या दिवाळीच्या सिझनमध्ये एसटी वाहक-चालकांची वागणूक सुधारण्याच्या सूचना वरिष्ठांनी कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
गुरुवारी (१६ ऑक्टोबर) सकाळी शिर्डीला जाणाऱ्या बसवर क्रांती धायडे या महिला वाहकाची ड्युटी होती. दुपारी २ वाजता बस शिर्डी येथे पोहोचली. एकीकडे प्रवाशी उतरत असताना, बसमध्ये बसण्यासाठी प्रवाशीही प्रयत्न करत होते. यात अलका कोलते ही वृद्ध महिलाही होती. महिला वाहकाने त्यांना अरेरावी करत प्रवाशांना आधी खाली उतरू दे, मग चढ, असे म्हटले. त्यावर दोघींत वाद झाला. एकमेकींना शिवीगाळ आणि किरकोळ मारहाणही झाली. वृद्धेने अंगातील शर्ट ओढल्याचे क्रांती यांचे म्हणणे आहे. अलका या बसमध्ये बसल्यानंतरही दोघींत वादावादी सुरूच होती.

