नशेचा बाजार उठविण्यासाठी शहर पोलिसांचे दमदार पाऊल!; १२ जणांना अटक, ४१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १२ लाखांचा मुद्देमाल जप्त, अविनाश अन्‌ रूपेश पाटील भाऊ तरुणाईला झोकत होते नशेच्या आगीत !!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगरातील नशेचा बाजार उठविण्यासाठी शहर पोलिसांनी दमदार पाऊल टाकले आहे. मॉर्फिनसदृश औषध असलेल्या ‘कोडीन फॉस्फेट’ची नशा तरुणाईला लावणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यश आले आहे. तब्‍बल १२ जणांना अटक केली असून, रॅकेटमध्ये एकूण ४१ जण आतापर्यंत निष्पन्न झाले आहेत. या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आहे. त्‍यांच्याकडून कार, मोबाइलसह १२ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तब्‍बल ३ महिने कसोशीने तपास करून पोलिसांनी या रॅकेटची पाळेमुळे खोदून काढली आहेत. फार्मसीचे शिक्षण घेतलेले भावंडे अविनाश रामकृष्ण पाटील (वय ३४) व रूपेश रामकृष्ण पाटील (वय २९, दोघे रा. शिरसगाव टाकळी, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) हे या रॅकेटच्या केंद्रस्थानी आहेत.

WhatsAppImage2025-09-14at8.14.14AM

‘कोडीन फॉस्फेट’ वेदना कमी करण्यासाठी, अतिप्रमाणातला खोकला नियंत्रणात आणण्यासाठी वापरली जाते. ही औषधी घेतल्याने झोप, नशा येते. तिची विक्री प्रिस्क्रिप्शनशिवाय बेकायदेशीर आहे. तिचे व्यसन लागते. पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्या नेतृत्वाखाली अँटी नार्कोटिक्स सेल आणि शहर गुन्हे शाखेने शुक्रवारी (१२ सप्‍टेंबर) रात्री उशिरा वाळूजच्या शिवराई भागातील व्हीआरएल लॉजिस्टिक कंपनीत छापा मारून शहरात आलेल्या नशेच्या २५०४ औषधी बाटल्यांचा साठा पकडला. याच ठिकाणी औषधी घेण्यासाठी आलेले अविनाशसह अर्शद इब्राहिम पठाण (वय २६, रा. बायजीपुरा), समीर युनूस शेख (२३, रा. मोतीकारंजा), अब्दुल अजीम कादिर शहा (३०, रा. मिसारवाडी) यांना ताब्‍यात घेतले.

त्‍यांच्या कसून चौकशीतून पहाटेपर्यंत मोसीन अमित तांबोळी (वय २५, रा. बायजीपुरा), सय्यद समीर सय्यद शौकत ऊर्फ स्टायलो (वय २७, रा. बायजीपुरा), सोहेल हनीफ शाह (२४, रा. नवाबपुरा), रिजवान खान रशीद खान (वय २५, रा. रेंगटीपुरा), सय्यद अल्ताफ जफर (२२, रा. बायजीपुरा) यांना ताब्‍यात घेतले. पोलिसांचे एक पथक नाशिकला गेले आणि रुपेश व अमोल दत्तात्रय येवले (रा. नाशिक) यांना पकडून आणले. अमोल हा रुपेशचा मित्र असून, अमोलच्या बंद पडलेल्या येवले मेडिकल ॲन्ड जनरल स्टोअरच्या नावाचा वापर ते कंपन्यांकडून औषधी मागविण्यासाठी करत होते. त्‍यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली होती. अमोलला २० टक्‍के कमिशन दिले जायचे. अटक केलेल्या १२ ही संशयितांना गंगापूर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्‍यांना १८ सप्‍टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

५० तस्करांचे सिंडिकेट
छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्टातही अविनाश आणि रुपेशनी नशेच्या औषधांचा बाजार पसरवला होता. ५० हून अधिक जणांचे हे सिंडिकेट असल्याचे समोर येत आहे. अनेक एमआर, मेडिकलचालक, कुख्यात गुन्हेगार हे या पाटील भावांच्या संपर्कात होते. औषधी कंपन्यांना वेदनानाशक, गुंगीकारक औषधांची ऑर्डर दिली जायची. नंतर महाविद्यालयीन विद्यार्थी, नशेखोरापर्यंत दहापट अधिक रकमेने ही औषधी पोहोचवली जायची. कानपूरहून या औषधांच्या बाटल्या छत्रपती संभाजीनगर शहरात येत होत्या.

नंतर पूर्ण मराठवाडा, नाशिक, मालेगावमध्येही तस्करी होत होती. रूपेश, अविनाश व अमोलवर पोलीस ३ महिन्यांपासून पाळत ठेवून होते. छत्रपती संभाजीनगर शहरातील तब्बल ३६ पेडलर्स, रेकॉर्डवरील गुन्हेगार पाटील भावांच्या संपर्कात होते. हे सर्व पेडलर्स, एजंट पोलिसांनी एकाच वेळी रेकॉर्डवर घेतले आहेत. यातील १९ पेडलर्सविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. अविनाश, रूपेश व अमोल हे एमआर होते. मात्र पगार पुरत नसल्याने मेडिकल सुरू केले. मात्र तेही बंद पडले. नंतर त्‍यांनी थेट नशेच्या औषधांचा बाजार सुरू केला आणि तरुणाईला नशेच्या आगीत झोकायला सुरुवात केली. अमोलच्या मेडिकलच्या पत्त्यावर पोलिसांना वॉटर प्लांट आढळला. संपूर्ण टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाईचा निर्णय पोलीस आयुक्‍तांनी घेतला आहे.

शहरातील या पेडलर्सविरुद्ध गुन्हा दाखल
पेडलर्स अर्शद इब्राहीम पठाण, समीर शेख युनूस शेख, अब्दुल अजीम कादीर शाहा, मोसिन अमीन तांबोळी, इस्माईल ऊर्फ पच्चीस, सय्यद शौकत ऊर्फ समीर स्टायलो, अझहर जावेद शेख, जावेद खान, अल्ताफ सय्यद, रामचंद्र हिराचंद राठोड, अरबाज खान, मुजाहिद शेख, सफिक खान, आयान जहागीरदार, मोसीन हिरो ऊर्फ मुजाहिद शेख, सोहेल करीम सय्यद ऊर्फ सोनू मनसे, वसीम पटेल, सुलेमान सय्यद, फिरोज बागवान, फिरोज खान, सोहेल शहा, सोहेल खान ऊर्फ गुड्डू खान, अब्दुल रफिक रिक्षावाला, शेख शकील शब्बीर,एजाज इब्राहिम बारी ऊर्फ एजाज लाला, अवद खालेद चाऊस, छोटा चाऊस, शेख फिरोज शेख अकबर, आदिल सय्यद, मिर्झा खलील बेग, इम्रान शेख लकडी, सोफियान शेख, फईम शहा कय्युम शहा, जे. के. जावेद ऊर्फ जावेद शेख, अफसर शेख, वसीम अयुब पटेल, अखिल हुसेनी ऊर्फ अखिल मालक, सोहेल इलाबी, रिझवान खान रशीद खान. बहुतांश जण शहर सोडून पसार झाले असून, शोध घेतला जात आहे. 

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!

Latest News

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले! विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विट्स हॉटेल चौकातून देवगिरी कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर लुटारू सापळा लावून थांबलेले असतात. एकटेदुकटे कुणी...
UPSC मध्ये नवीन भरती सुरू, २ लाख रुपयांपर्यंत पगार, नोकऱ्यांसाठी पात्रता जाणून घ्या...
CUET PG करिता रजिस्ट्रेशन सुरू, परीक्षा मार्चमध्ये होणार, या गोष्टी लक्षात ठेवा...
१७,००० रुपयांच्या नोकरीवर मारली लाथ, आता वर्षाकाठी १७ लाखांची करताहेत उलाढाल!
३ दिवसांपासून पोटात अन्न-पाण्याचा कण नाही, वडगाव कोल्हाटीत उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती बिघडली, डॉक्टर म्हणाले, उद्या आणखी बिकट होईल स्थिती...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software