‘तुमच्या मुलीला सुखात ठेवीन...’ प्रॉमिसवर सारिकाच्या आईने ठेवला विश्वास, प्रेमविवाहाला भरला होकार, सोपवला मुलीचा हात!; पण पुढे जे घडलं, ते धक्कादायक... छत्रपती संभाजीनगरच्या सिडकोची हृदयद्रावक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : आधी घरच्यांकडून लग्नाची मागणी, नंतर नकार, मात्र दोघांची मने जुळल्याने ठाम भूमिका घेऊन आळंदीला जाऊन लग्न केले. लग्नाला ३ महिने होताच त्याचे प्रेम ओसरले. त्यानंतर जातीवरून टोचून बोलत पैशांची मागणी सुरू झाली. त्यासाठी मारहाण सुरू केली. या मारहाणीला कंटाळून २७ वर्षीय विवाहित तरुणीने आत्‍महत्‍या केली. ही धक्कादायक घटना सिडको एन ५ अरुणोदय कॉलनी येथे शनिवारी (१४ मार्च) पहाटे एकच्या सुमारास घडली. रविवारी (१५ मार्च) या प्रकरणात सिडको पोलिसांनी आत्‍महत्‍येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा पती, सासू-सासरे आणि दिराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सारीका अशोक कदम (वय २७, रा. सिडको एन ५ अरुणोदय कॉलनी, मूळ रा. दासखेड ता. पाटोदा जि. बीड) असे आत्‍महत्‍या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिची आई बारकूबाई सोपान पवार (वय ५२, रा. दासखेड ता. पाटोदा जि. बीड) यांनी सिडको पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, त्यांची धाकटी मुलगी सारीकाचे लग्न १ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांच्या गावाशेजारील सौदाना गावातील रहिवाशी अशोक अंकुश कदम (वय २८) याच्यासोबत झाले होते. पाच महिन्यांपासून सारीका ही एमजीएम हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स म्हणून तर जावई अशोक एमजीएम हॉस्पिटलमध्ये चालक म्हणून नोकरी करत होता. दोघे सिडको एन ५ अरुणोदय कॉलनी येथे घर भाड्याने घेऊन राहत होते.

लग्नाआधी काय घडलं होतं...
ऑगस्ट २०२५ मध्ये बारकूबाई यांच्या पतीला अशोकचे वडील अंकुश कदम याने अशोकला मुलगी भेटत नाही म्हणून सारीकासाठी मागणी घातली होती. बारकूबाई आणि त्यांच्या पतीने होकार दिल्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात अंकुश कदम व त्याची पत्नी रुख्मिनीबाई व इतर नातेवाइकांनी येऊन सारीकासोबत अशोकचे लग्न ठरवून गेले. त्यानंतर १५ दिवसांनी अंकुश कदम व रुख्मिनीबाई यांनी घेऊन सारिकाचे लग्न अशोकसोबत करायचे नाही, असे सांगितले आणि लग्न मोडले. मात्र मधल्या काळात सारीका व अशोक यांच्यात फोनवर बोलणे चालू होते व त्यांनी लग्न करायचे ठरवल्याने बारकूबाई व त्यांच्या पतीने लग्नाला होकार दिला. अशोकचे आई, वडील व नातेवाइक या लग्नाला विरोध करत होते. त्यावेळी अशोकने बारकूबाई आणि त्यांच्या पत्नीला घरी येऊन विश्वास दिला, की मी तुमच्या मुलीला चांगले वागवेन. सुखात ठेवीन. त्यामुळे सर्वांनी पुण्यातील आळंदी येथे जाऊन  सारीका व अशोकचे लग्न लावून दिले होते.

प्रेम ३ महिनेच टिकले...
सारीका आणि अशोक छत्रपती संभाजीनगर येथे राहत असताना सुरुवातीचे तीन महिने त्यांचा संसार सुरळीत चालू होता. मात्र तीन महिन्यांनंतर अंकुश कदम, रुख्मिनीबाई, अशोक यांनी सारिकाला फोर व्हीलरचे कर्ज फेडण्यासाठी पैसे घेऊन ये, असा तगादा लावला. सारिका ही बाब आई, मोठी बहीण व वडिलांना फोन करून सांगत असे. मुलीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून सारिकाच्या वडिलांनी ५० हजार रुपये दिले. त्यानंतर पुन्हा २५ हजार रुपये दिले. दोन महिन्यांपूर्वी सारिकाचा पगार झाल्यानंतर अशोक तिचे एटीएम स्वतःकडे ठेवून परस्पर पैसे काढून घेत होता. ते पैसे त्याने आई, वडिलांना पाठवले होते. याबाबत सारिकाने विचारणा केली असता अशोकला राग येऊन त्याने सारिकाला मारहाण केली होती. त्याच्या आई, वडिलांनीही फोनवर तू खालच्या जातीची आहे, तुझी आमच्या घरी राहायची लायकी नाही, आम्ही तुला सांगतो तसेच करावे लागेल, आम्ही तुला नांदवून तुझ्यावर उपकार करत आहे, असे म्हणून जातीवरून सारिकाला फोनवर व एकदा तिचे रूमवर छत्रपती संभाजीनगरला जाऊन शिवीगाळ केली होती. चुलत दीर संतोष शहादेव कदम हा सुध्दा अशोकला तुझ्या सासू, सासऱ्याकडून नवीन टुरिस्ट गाडी घेण्याकरिता पैसे मागून घे व स्वतःचा धंदा कर, असे सांगून भडकावून देत होता, असे तक्रारीत म्हटले आहे. यातून अशोक हा सारिकाला मारहाण करत असे. संतोष हा त्यांच्या घराच्या बाजूला राहत असल्यामुळे तो त्यांच्या घरात ढवळाढवळ करून अशोकचे कान भरत असे, असा आरोप तक्रारीत लावला आहे.

शनिवारी काय घडलं...
शनिवारी (१४ मार्च) पहाटे १ च्या सुमारास सारीकाने राहत्या घरी तिच्या पती व सासरच्या लोकांच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही माहिती मिळताच तिचे आई, वडील व नातेवाइक छत्रपती संभाजीनगरला आले. एमजीएम हॉस्पिटलमध्ये सारिका हिचा मृतदेह होता. तिथून घाटी रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाली. त्यानंतर गावाकडे मृतदेह नेऊन अंत्यविधी करण्यात आले. त्यानंतर बारकूबाई यांनी रविवारी (१५ मार्च) छत्रपती संभाजीनगरला सिडको पोलीस ठाण्यात येऊन सारिकाचा पती अशोक, सासरा अंकुश सर्जेराव कदम (वय ५२), रुख्मिनीबाई अंकुश कदम (वय ४८), संतोष सहादेव कदम (वय ३२, सर्व रा सौदाना ता. पाटोदा जि. बीड) यांच्याविरुद्ध आत्‍महत्‍येस प्रवृत्त केल्याची तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक योगेश गायकवाड करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला...

Latest News

एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला... एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एमजीएमजवळ अंधारात लपून बसलेल्या तिघांनी पोलिसांना पाहून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले...
वाळूज एमआयडीसीतील ऑर्किड इंग्रजी शाळेला गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिली समज, नियमबाह्य फी वसूल करू नका!
‘तुमच्या मुलीला सुखात ठेवीन...’ प्रॉमिसवर सारिकाच्या आईने ठेवला विश्वास, प्रेमविवाहाला भरला होकार, सोपवला मुलीचा हात!; पण पुढे जे घडलं, ते धक्कादायक... छत्रपती संभाजीनगरच्या सिडकोची हृदयद्रावक घटना
अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software