- News
- सिटी क्राईम
- छत्रपती संभाजीनगर हादरले!; सेवानिवृत्त प्राध्यापकाची गोळी झाडून हत्या, रीलस्टारसह तिघांना अटक, उसणे
छत्रपती संभाजीनगर हादरले!; सेवानिवृत्त प्राध्यापकाची गोळी झाडून हत्या, रीलस्टारसह तिघांना अटक, उसणे ५० लाख परत न करण्यासाठी घडवले हत्याकांड
छत्रपती संभाजनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : निवृत्त प्राध्यापकाची बंदुकीतून गोळी झाडून रीलस्टार मित्रानेच हत्या केली. नंतर ‘दृश्यम’ चित्रपटातील कथानकाप्रमाणे पोलिसांची दिशाभूल होईल, अशा रितीने पुरावे दडविण्याचाही प्रयत्न केला. मात्र पोलिसांची नजर त्यापलीकडे जाऊन पोहोचली आणि खुन्याचा पर्दाफाश झाला. खुनी रीलस्टार आणि त्याला मदत करणाऱ्या दोघांना अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी रविवारी (१५ मार्च) पत्रकार परिषदेत दिली. उसने घेतलेल्या ५० लाख रुपयांसाठी तगादा लावत असल्याने हे हत्याकांड घडल्याचे चौकशीतून समोर आले आहे.
विशालला ‘लव्ह अँड डेअर' हा रिॲलिटी शो तयार करायचा होता. त्यासाठी त्याने लोंढे यांच्याकडून ५० लाख रुपये उसने घेतले होते. मात्र हा ‘शो' विशालने तयार केलाच नाही. त्यामुळे लोंढे यांनी विशालकडे पैशांसाठी तगादा लावला. १० लाख रुपय विशालने परत केले. मात्र उरलेले पैसे परत करण्यास विशालने टाळाटाळ सुरू केली होती. त्यावरून ३ फेब्रुवारीला दोघांचे भांडणही झाले होते. विशालला पैसे परत करायचे नसल्याने त्याने हत्येचा कट रचला.
असा केला खून...
हत्येच्या तीन दिवस आधी विशालने शहराजवळील गेवराई तांडा शिवारात जेसीबीने दोन खड्डे खोदून ठेवले. ५ मार्चला रात्री दौलताबादच्या फार्म हाऊसवरील पार्टीत लोंढे यांना दारू पाजण्यात आली. ते शुद्धीत नसताना विशालने त्यांची बंदूक घेतली. नंतर त्यांना कारमधून साजापूर शिवारात नेले. रेल्वे पुलाजवळ कार थांबवून विशालने बंदुकीतून लोंढे यांच्या डोक्यात गोळी झाडली. नंतर त्यांचा मोबाइल काढून घेतला. विशाल व आकाशने मृतदेह कारमधील सीटवर ठेवला. सीसीटीव्हीत दिसावे म्हणून सिग्मा हॉस्पिटलजवळ त्यांना सोडल्याचा बनाव केला. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ६ ते ७ दरम्यान तिसरा साथीदार करण आडेच्या मदतीने गेवराई तांडा येथे खोदलेल्या खड्ड्यात मृतदेह पुरला.
दृश्यम स्टाइल बनाव...
विशालने पुण्याला जाऊन ८ मार्च रोजी लोंढे यांचा मोबाइल सुरू केला. मोबाइलवर आय अॅम इन पर्सनल वर्क, २०-२५ डोन्ट कॉल... असे स्टेटस ठेवले... मात्र इतक्या साध्या भाषेतील स्टेटस एका आयआयटीमधून उत्तीर्ण प्राध्यापकाचे असू शकत नाही, हे पोलिसांनी हेरले. विशालला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदारांची नावेही सांगितली. त्यानंतर आकाश व करणलाही पोलिसांनी अटक केली. संशयितांनी मृतदेह पुरलेली जागा दाखविली. तहसीलदारांच्या उपस्थितीत पंचनामा करून ४० दिवसांनी मृतदेह बाहेर काढण्यात आला. अटक केलेला तिसरा संशयित करण हा विशालचा नातलग आहे. तिघांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवस पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली. या गुन्ह्याचा उलगडा शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले, सहायक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, उस्मानपुऱ्याचे पोलीस निरीक्षक संग्राम ताठे, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी चौरे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण वाघ, अभिषेक चिखलीकर आणि अंमलदारांनी केला.
आकाशची धूळफेक कामी आली नाही...
पोलीस चौकशीत आकाशने मी दारूने तर्राट होतो, मला काही आठवत नाही, असे सांगितले. पण पार्टीतील महिलांनी दोघे पूर्ण शुद्धीत होते, असे सांगितले. कारमध्ये मागील सीटवर झोपलो होतो, ही त्याची थापही सीसीटीव्ही फूटेजमुळे कामी आली नाही. विशेष म्हणजे, ६० वर्षांचे लोंढे आणि २४ वर्षांचा विशाल यांची मैत्री एका महिलेमार्फत झाली होती, असे सूत्रांनी सांगितले. लोंढे यांच्याकडे स्वतःची बंदूक होती, पण कुटुंबीयांनी त्यांच्याकडे बंदूक नसल्याचे सांगितले. हत्या केल्यानंतर खुन्यांनी त्यांचा चेहरा क्रूरपणे का ठेचला, हेही अनाकलनीय आहे. खुनामागे केवळ पैसे हेच कारण होते, की आणखी काही, याबद्दलही संशय निर्माण झाला आहे. विशालवर गुन्हेगारी विषयक चित्रपट, वेबसिरीजचा प्रभाव आहे.
विशालची ऐशोआरामी लाइफस्टाइल...
खुनी रीलस्टार विशाल राठोड हा ऐशोआरामी आयुष्य जगत होता. त्याचे इन्स्टाग्रामवर १.७५ लाख फॉलोअर्स असून, २०१९ पासून तो व्हिडीओ बनवत होता. एसटी आरक्षणासाठीच्या आंदोलनातही त्याने भाग घेतला होता. महागड्या कार, महागडा स्मार्टफोन त्याच्याकडे होते. २२ मार्च २०२५ रोजी वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी त्याने जॅग्वार लक्झरी कार खरेदी केल्याने सारेच चकीत झाले होते. त्याचे अनेक मोठ्या राजकीय नेत्यांसोबत फोटोही आहेत. विविध व्यावसायिक त्याला आपल्या शोरूमच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करायचे. महाविद्यालयांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात तो पाहुणा असायचा.
फुकटात खोदून घेतले खड्डे
मृतदेह पुरण्यासाठी विशालने गेवराई तांडा शिवारात एका जेसीबी चालकाकडून फुकटात खड्डे खोदून घेतले. तेथे गुप्तधन असल्याचे जेसीबी चालकाला सांगून निम्मे धन देण्याचे आमिष दाखवले होते. जेसीबी चालकाने २ खड्डे खोदले. मृतदेह पुरल्यानंतर काही माती तशीच वर आली होती. संशय येऊ नये म्हणून त्याने पुन्हा त्याच जेसीबीचालकाला बोलावून घेतले आणि गुप्तधनासाठी खोदलेल्या खड्ड्याची माती वर दिसत आहे. लोकांना संशय येईल म्हणून ती माती जेसीबीने लेव्हल करून घेतली.
घटनाक्रम...
५ फेब्रुवारी : राजाराम लोंढे यांची हत्या.
६ फेब्रुवारी : मृतदेह गेवराई तांड्याजवळील खड्ड्यात पुरला.
८ : लोंढे यांचा मोबाइल घेऊन विशाल पुण्याला गेला आणि तिथे मोबाइल सुरू केला.
१० मार्च : पोलिसांत लोंढे हरवल्याची भावाची तक्रार.
१४ मार्च : खुनाचा उलगडा, तिघांच्या मुसक्या आवळल्या.

