पैसा, बाटली नंतर लोंढेंच्या खुनामागे ‘बाई’सुद्धा!, तिच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने विशालच्या डोक्यात सणक गेली, बंदुकीतून गोळी झाडली!!, छत्रपती संभाजीनगरातील हत्याकांडाला अनेक पदर...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सेवानिवृत्त प्राध्यापक राजाराम सुभराव लोंढे (वय ६०, रा. ज्योतीनगर) यांच्या हत्येच्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी शहर पोलिसांच्या समोर येत आहेत. बंदुकीतून गोळी झाडून रीलस्टार विशाल विकास राठोड (वय २४, रा. गेवराई तांडा) याने लोंढे यांची हत्या केल्यानंतर दृश्यम चित्रपटाप्रमाणे पुरावे नष्ट करून ३० दिवस पोलिसांना गुंगारा दिला. लोंढे यांच्या कुटुंबासोबतच राहून त्याने लोंढे यांना शोधण्याचे नाटकही केले. दरम्यान, लोंढे यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून लुटल्याचीही चर्चा असून, रीलस्टारच असलेली एक ब्युटीपार्लर चालक महिलाही संशयाच्या घेऱ्यात आली आहे. लोंढे यांचे वैयक्तीक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्याची धमकी देऊन या टोळीने त्यांच्याकडून पैसे उकळल्याची चर्चा होत आहे.

महिलेबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याचा राग
मूळचे सौंदरे (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथील राजाराम लोंढे छत्रपती संभाजीनगरातील ज्योतीनगरात एकटेच राहत होते. ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले होते. त्यांची पत्नी व दोन मुले पुण्याला राहतात. एका कार्यक्रमात त्यांची ओळख रीलस्टार विशाल राठोडसोबत झाली होती. त्यानंतर सारख्याच सवयींमुळे मैत्री वाढत गेली. सतत बाहेर फिरायला जायचे, पार्ट्या करायचे. विशालला ‘लव्ह अँड डेअर' हा रिॲलिटी शो तयार करायचा होता. त्यासाठी त्याने लोंढे यांच्याकडून ५० लाख रुपये उसने घेतले होते. मात्र हा ‘शो' विशालने तयार केलाच नाही. त्यामुळे लोंढे यांनी विशालकडे पैशांसाठी तगादा लावला. १० लाख रुपय विशालने परत केले. मात्र उरलेले पैसे परत करण्यास विशालने टाळाटाळ सुरू केली होती. त्यामुळे त्यांच्यात वाद सुरू झाला होता.

londhe case3

५ फेब्रुवारीच्या पार्टीपूर्वी २८ जानेवारीलाही पार्टीत त्यांच्यात वाद झाले होते. त्यावेळी लोंढे यांनी विशालच्या संपर्कातील एका तरुणीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्याचा विशालला राग आला होता. उसणे घेतलेले पैसे परत करावे लागू नये आणि तरुणीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे त्याने लोंढे यांच्या हत्येचा कट रचला. ५ फेब्रुवारीला लोंढे, विशाल आणि विशालचा मेव्हणा आकाश विनोद पवार (वय ३२, रा. गेवराई तांडा, छत्रपती संभाजीनगर) यांनी दोन महिलांसोबत दौलताबादच्या एका फार्महाऊसवर ५ फेब्रुवारीला पार्टी केली. पार्टीनंतर दोन्ही महिला गेल्यावर तिघे फार्महाऊसबाहेर पडले. नगरनाक्यावरून छावणी लोखंडी पूल ओलांडल्यानंतर विशालने २८ जानेवारीच्या वादाचा विषय काढला. सर तुम्ही तसे बोलायला नको होते, मी तुम्हाला पैसे देणारच होतो, असे विशाल म्हणाला. त्यावर लोंढे यांनी त्याला शिवीगाळ केली. विशालच्या संपर्कातील तरुणीबद्दल पुन्हा आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर विशालच्या डोक्यात सणक भरली अन्‌ त्याने थेट बंदूक लोंढेंच्या कानाला लावत गोळी झाडली. ही बंदूक लोंढेंचीच होती, जी पार्टीदरम्यान विशालने काढून घेतली होती.

करणला धमकावले...
हत्येनंतर विशाल आणि आकाशने लोंढेंचा मृतदेह समोरच्या सीटवरून मागील सीटवर ठेवला. तिथून कार रेल्वेस्थानकाकडे नेत तिथे दोघे चहा पिले. नंतर सीसीटीव्हीत दिसावे म्हणून सिग्मा हॉस्पिटलजवळ लोंढे यांना सोडल्याचा बनाव केला. तिथून शहानूरमिया दर्गा चौकात येत एका मैत्रिणीला जेवण घेऊन बोलावले. तिच्याकडून डबा घेऊन थेट गेवराई तांडा गाठले. तिथे करण विकास आडे (वय २२, रा. गिरनेर तांडा, ता. छत्रपती संभाजीनगर) या नातेवाइक तरुणालाही बोलावून घेतले. तिघांनी सोबत दारू पिली. मैत्रिणीने दिलेला डबा खाल्ला. याचवेळी करणने कारमध्ये डोकावले असता त्याला चक्क लोंढे यांचा मृतदेह दिसल्याने तो घाबरून गेला. त्याला विशालने धमकावले. ६ फेब्रुवारीला सकाळी ६ ते ७ दरम्यान गेवराई तांडा येथे आधीच खोदलेल्या खड्ड्यात मृतदेह पुरला. नंतर घरी जाऊन विशालने सकाळी ११ वाजता कारही धुतली.

londhe case2

मैत्रिण अन्‌ महिलेच्या जबाबामुळे फुटले बिंग
लोंढे हे घरी न आल्याने त्यांचे भाऊ उत्तम यांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलीस तांत्रिक तपासासह लोंढे यांचा चालक, नातेवाइक, मित्र, विशाल, आकाशसह संपर्कातील प्रत्येकाची चौकशी करत होते. मात्र, विशाल दिशाभूल करण्यात यशस्वी होत होता. ज्या महिलांसोबत दौलताबादच्या फार्महाऊसवर पार्टी केली, त्यापैकी एकीमुळे विशालचे बिंग फुटले. एक महिला तीन हजार रुपये तिथेच विसरल्याने घरी आल्यावर तिने विशालला सातत्याने ८ ते १० कॉल केले. त्यानंतर विशाल जेवण मागवण्याच्या निमित्ताने एका मैत्रिणीलाही भेटला. ही बाब विशालने पोलिसांपासून लपवली होती. दोघींचे जबाब पोलिसांनी नोंदवले तेव्हा विशालच्या उत्तरातील तफावत शनिवारी (१४ मार्च) समोर आली. त्याचदरम्यान पोलिसांनी पार्टीनंतर विशाल ज्या मार्गांवरून कारने फिरला. त्या सर्व मार्गांवरील ३३ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे २५४ फूटेज जमा केले आणि विशालवर संशय गडद झाला. त्यानंतर विशाल व आकाशला पोलिसांनी ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली, त्यावेळी त्यांनी खुनाची कबुली दिली.

कुटुंबासोबत शोध घेण्याचे नाटक
हत्या केल्यानंतरही विशाल चक्क लोंढे यांच्या नातेवाइकांसोबतच उस्मानपुरा पोलीस ठाण्यात वावरत होता. शोध घेण्याचे नाटक करत होता. याचदरम्यान विशालने पुण्याला जाऊन ८ मार्च रोजी लोंढे यांचा मोबाइल सुरू केला. मोबाइलवर आय ॲम इन पर्सनल वर्क, २०-२५ डोन्ट कॉल... असे स्टेटस ठेवले... मात्र इतक्या साध्या भाषेतील स्टेटस एका आयआयटीमधून उत्तीर्ण प्राध्यापकाचे असू शकत नाही, हे पोलिसांनी हेरले होते. मृतदेह पुरण्यासाठी विशालने गेवराई तांडा शिवारात एका जेसीबी चालकाकडून फुकटात खड्डे खोदून घेतले होते. तेथे गुप्तधन असल्याचे जेसीबी चालकाला सांगून निम्मे धन देण्याचे आमिष दाखवले होते. जेसीबी चालकाने २ खड्डे खोदले. मृतदेह पुरल्यानंतर काही माती तशीच वर आली होती. संशय येऊ नये म्हणून त्याने पुन्हा त्याच जेसीबीचालकाला बोलावून घेतले आणि गुप्तधनासाठी खोदलेल्या खड्ड्याची माती वर दिसत आहे. लोकांना संशय येईल म्हणून ती माती जेसीबीने लेव्हल करून घेतली होती.

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
उत्तरीय तपासणीनंतर लोंढे यांचा मृतदेह कुटुंबीयांनी ताब्यात घेण्यास नकार दिला. उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम ताटे यांनी दीड महिना तक्रारीकडे दुर्लक्ष केले, असा आरोप लोंढे यांचे बंधू उत्तम लोंढे यांनी केला. ताटे यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका नातेवाइकांनी घेतली. अखेर पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी समजूत काढली. त्यानंतर मृतदेह बार्शी तालुक्यातील सौंदरे या मूळ गावी रवाना करण्यात आला. विशालने यापूर्वीही एक लैंगिक अत्याचाराची तक्रार आर्थिक तडजोड करून दाबल्याची चर्चा आहे. या प्रकरणाचा तपास शहर गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याची आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या संग्राम ताटे यांच्यावर कारवाईची मागणी कुटुंबाने केली आहे. याबाबत पोलीस आयुक्त प्रवीण पवार म्हणाले, की हत्येप्रकरणातील प्रत्येकाची चौकशी होईल. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे हत्येच्या मुळापर्यंत पोहोचू. दरम्यान, सध्या विशाल, आकाश आणि करण हे तिन्ही आरोपी पोलीस कोठडीत असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

कोण आहे विशाल...
रीलस्टार विशाल राठोडचे इन्स्टाग्रामवर १.७५ लाख फॉलोअर्स असून, २०१९ पासून तो व्हिडीओ बनवत होता. एसटी आरक्षणासाठीच्या आंदोलनातही त्याने भाग घेतला होता. महागड्या कार, महागडा स्मार्टफोन त्याच्याकडे होते. २२ मार्च २०२५ रोजी वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी त्याने जॅग्वार लक्झरी कार खरेदी केल्याने सारेच चकीत झाले होते. त्याचे अनेक मोठ्या राजकीय नेत्यांसोबत फोटोही आहेत. विविध व्यावसायिक त्याला आपल्या शोरूमच्या उद्‌घाटनासाठी आमंत्रित करायचे. महाविद्यालयांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात तो पाहुणा असायचा. अलीकडेच त्याने गावातच लाला नावाच्या मराठी चित्रपटाचे शूटिंग सुरू केल्याचीही माहिती समोर येत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पैसा, बाटली नंतर लोंढेंच्या खुनामागे ‘बाई’सुद्धा!, तिच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने विशालच्या डोक्यात सणक गेली, बंदुकीतून गोळी झाडली!!, छत्रपती संभाजीनगरातील हत्याकांडाला अनेक पदर...

Latest News

पैसा, बाटली नंतर लोंढेंच्या खुनामागे ‘बाई’सुद्धा!, तिच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने विशालच्या डोक्यात सणक गेली, बंदुकीतून गोळी झाडली!!, छत्रपती संभाजीनगरातील हत्याकांडाला अनेक पदर... पैसा, बाटली नंतर लोंढेंच्या खुनामागे ‘बाई’सुद्धा!, तिच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने विशालच्या डोक्यात सणक गेली, बंदुकीतून गोळी झाडली!!, छत्रपती संभाजीनगरातील हत्याकांडाला अनेक पदर...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सेवानिवृत्त प्राध्यापक राजाराम सुभराव लोंढे (वय ६०, रा. ज्योतीनगर) यांच्या हत्येच्या तपासात अनेक धक्कादायक...
एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला...
वाळूज एमआयडीसीतील ऑर्किड इंग्रजी शाळेला गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिली समज, नियमबाह्य फी वसूल करू नका!
‘तुमच्या मुलीला सुखात ठेवीन...’ प्रॉमिसवर सारिकाच्या आईने ठेवला विश्वास, प्रेमविवाहाला भरला होकार, सोपवला मुलीचा हात!; पण पुढे जे घडलं, ते धक्कादायक... छत्रपती संभाजीनगरच्या सिडकोची हृदयद्रावक घटना
अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software