भाडेकरू म्हणून राहायला यायचे अन्‌ घरमालकाचे घर साफ करून जायचे, इतक्या दिवसांनी सापडले बंटी-बबली, वाळूज पोलिसांच्या प्रयत्नांना मिळाले यश...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भाडेकरू म्हणून राहायला यायचे... घरमालकांशी चांगली ओळख करून घेत, थेट त्यांच्या घरात येणेजाणे सुरू व्हायचे. कुठे काय ठेवले आहे, बरोबर हेरायचे अन्‌ संधी साधून घरमालकाचे घर साफ करून गायब व्हायचे... मग दुसरा घरमालक शोधायचे... बंटी-बटलीने हा चमत्कार वाळूज येथील गणेश गंगाधर वडगावकर (वय ६४,रा. कासारगल्ली, मुंजाबा मंदिरासमोर) यांच्यासोबतही केला. वडगावकर यांच्या घरातून ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला... वडगावकर यांच्या तक्रारीनंतर वाळूज पोलीस या बंटी-बबलीला शोध असताना अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, दोघांना आज, १२ डिसेंबरला पकडून आणले आहे.

WhatsAppImage2025-12-12at6.40.17PM

नवनीत मधुकर नाईक (वय ४५) व स्मिता नवनीत नाईक (वय ४१, दोघे रा. भांडूप पश्चिम, मुंबई ) अशी या बंटी-बबलीची खरी नावे असून, ते वडगावकर यांच्या घरात मात्र रमेश धोंडिबा राजगुरू आणि स्मिता रमेश राजगुरू या नावाने राहत होते. त्यांना २० वर्षांचा मुलगा आदित्यही असून, त्याचे खरे नाव आणि सध्या कुठे आहे, त्याचा या दाम्‍पत्‍याच्या गुन्ह्यातील सहभाग काय आहे, हे अद्याप समोर आलेले नाही. वडगावकर यांच्यासोबत घडलेली घटना २७ नोव्हेंबर २०२४ ची आहे. नाईक दाम्‍पत्‍य त्यांच्या घरात सप्टेंबर २०२४ ला राहायला आले. वडगावकर यांचे पंढरपूरमध्ये बांगड्याचे दुकान आहे. नाईक दाम्‍पत्‍याने वडगावकर दाम्‍पत्‍याशी चांगली ओळख करून घेत जवळीक वाढवली. यानिमित्ताने घरात येजा करून सर्व माहिती करून घेतली आणि वडगावकर दाम्‍पत्‍य हे दुकानात गेल्याची संधी साधून त्यांचे घर साफ केले. वडगावकर यांच्या आधी बंटी-बबलीने गोविंद बोंबरे (रा. हनुमाननगर, गारखेडा) यांच्या घरात चोरी केली होती.

वडगावकर यांच्या घरातून ५० हजार रुपये रोख, १० हजारांचे सोन्याची लहान बाळी, २ हजारांच्या नवीन साड्या, ३ हजारांचे चांदीचे तोडे असा एकूण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. वडगावकर यांच्या तक्रारीवरून वाळूज पोलिसांनी गुन्हा दाखल करून बंटी-बबलीचा शोध सुरू केला. तपास पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे करत होते. दोघेही सराईत चोरटे असल्याचे तपासात समोर आले. त्यांच्याविरुद्ध राज्‍यभरातील विविध पोलीस ठाण्यात २० गुन्हे दाखल असल्याचेही समोर आले.

पोलीस त्यांना शोध घेत असताना नुकतेच या बंटी-बबलीला उरण पोलिसांनी अटक केल्याची माहिती वाळूज पोलिसांना मिळाली. त्यांनी लगेचच उरण गाठून दोघांना ताब्यात घेतले आणि छत्रपती संभाजीनगरच्या गुन्ह्यात अटक केली. त्यांच्याकडून ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, सहायक पोलीस आयुक्त डॉ.भागीरथी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे, रमेश राठोड, संदीप वाघ, पोलीस अंमलदार विजय पिंपळे, सुधाकर पाटील, नितीन धुळे, श्रीकांत सपकाळ, बजरंग धाडगे यांनी केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सिटी चौक परिसरातून २१ वर्षीय तरुणी बेपत्ता

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software