मोठी बातमी : छ. संभाजीनगरमध्ये चांगल्या परताव्याच्या आमिषाने व्यावसायिकांना ६ कोटींचा गंडा!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : गुंतवणुकीवर चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून ३ व्यावसायिकांना ६ कोटींचा गंडा घालणाऱ्या युवकाविरुद्ध सिटी चौक पोलिसांनी सोमवारी (२९ सप्टेंबर) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

सलमान लियाकतखाँ पठाण (वय ३५, रा. जामा मशिदीजवळ, वाळूज) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यांची स्वतःची एसएलपी असोसिएट्स नावाने जुना बाजार येथे फर्म आहे. ते इन्कम टॅक्स रिटर्न्स, जीएसटी, एमसीए व इतर टॅक्स संबंधित कामे करतात. रिअल इस्टेटमध्ये सुध्दा कामकाज करतात. त्यांची पत्नी आयेशा यांचीसुध्दा लिनोवो इंटरप्राईजेस नावाने फर्म असून त्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी-विक्री, लेबर सप्लायची कामे करतात. सन २०१५ मध्ये शेख रियाज गुलाम रब्बानी (रा. नॅशनल कॉलनी, मौलाना आझाद कॉलेजसमोर, छत्रपती संभाजीनगर ह. मु. बडे नवाब बाडा, चेलीपुरा पोलीस चौकीमागे, छत्रपती संभाजीनगर) यांच्यासोबत त्यांची गुंतवणुकीसंबंधाने ओळख झाली होती. नंतर ओळख वाढून घरी येणे-जाणे सुध्दा होते. 

असे ओढले जाळ्यात...
मार्च २०२० मध्ये शेख रियाजने त्यांना कॉल करून घरी बोलावले. तो करत असलेल्या व्यवसायाबद्दल माहिती दिली. त्याने सांगितले, की तो इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो व त्या माध्यमातून त्याला खूप नफा मिळतो. त्याच्या व्यवसायात बऱ्याच लोकांनी गुंतवणूक केलेली आहे. त्यांना तो गुंतवणूक रकमेवर ९ ते १२ टक्के परतावा देतो, असे सांगितले. तूही गुंतवणूक कर, असे त्याने सांगितल्याने त्याच्यावर विश्वास ठेवून सलमान पठाण यांनी २५ लाख रुपये त्याला ऑनलाइन पाठवले.  ही रक्कम रक्कम शेख रियाजने परताव्यासह परत केली. त्यामुळे सलमान यांचा विश्वास बसला. त्यानंतर मार्च २०२२ ते मार्च २०२३ या काळात शेख रियाजने गळ घालून एकूण ५९ लाख ८० हजार रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यातील ५३ लाख २२ हजार रुपये शेख रियाने परत केले. त्यानंतर एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या काळात सलमान यांनी १ लाख २ कोटी ३४ हजार रुपये दिले. त्यातील ६३ लाख ७९ हजार ९०० रुपये त्याने परताव्यासह परत केले.

मग केला मोठा गेम...
माझे सासरे चीन, रशिया, नेपाळ, सौदी आरेबीया, कुवैत या देशांमध्ये आयफोन निर्यात करणार आहे. त्यासाठी आपल्याला जवळपास ५ कोटी रुपयांची जुळवाजुळव करावी लागणार आहेत. त्यासाठी तू किती रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतो, शेख रियाने विचारले. त्यावर सलमान यांनी त्याला २ कोटी रुपयांपर्यंत रक्कम गुंतवणूक करू शकतो. शेख रियाज हा प्रत्येक महिन्याला मुळ गुंतवणुकीपैकी काही रक्कम व काही परताव्याची रक्कम सलमानच्या बँक खात्यावर टाकत असे. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा त्याला मोठी रक्कम गुंतवणूक करण्यास भाग पाडत होता. एप्रिल २०२४ ते ऑक्टोर २०२४ या काळात शेख रियाजला २९ एप्रिल २०२४ ला २० लाख, ३ मे २०२४ रोजी ३३ लाख, १० मे २०२४ रोजी ६ लाख, २४ मे २०२४ रोजी १५ लाख, १६ जून २०२४ रोजी २४ लाख, १८ जून २०२४ रोजी अडीच लाख, २ जुलै २०२४  रोजी ३० लाख रुपये असे एकूण १ कोटी ३० लाख ५० हजार रुपये सलमान यांनी शेख रियाजला दिले. त्यानंतर रोख ५० लाख रुपयेसुद्धा दिले. १७ जुलै २०२४ रोजी ला शेख रियाज याने सांगितले की मुंबईमध्ये माझ्या सासऱ्यांचा जवळपास ३ कोटी रुपयांचा माल पोलिसांनी पकडला आहे. त्यासाठी तत्काळ ३५ लाख रुपयांची आवश्यकता आहे. त्यामुळे सलमान यांनी त्याच दिवशी १० लाख आणि दुसऱ्या दिवशी २५ लाख रुपये दिले. असे एप्रिल २०२४ ते जुलै २०२४ दरम्यान शेख रियाजला एकूण २ कोटी १५ लाख ५० हजार रुपये दिले.

मग फोन उचलणे बंद...
ऑक्टोबर २०२४ मध्ये शेख रियाजने सलमान यांना पैसे देणे बंद केले. त्यांनी त्याला वेळोवेळी विचारणा केली असता तो आज देतो, उद्या देतो म्हणून वेळ काढून नेत होता. सासऱ्याकडून पैसे येणे बाकी आहे. त्याने विक्री केलेल्या मालाची बिले जीएसटीमुळे अडकलेली आहेत, असे सांगून वेळ मारून नेत होता. त्यानंतर तीन ते चार महिने निघून गेले तरी शेख रियाज मूळ गुंतवणूक रक्कम व परतावा देत नव्हता, की फोनही उचलत नव्हता. सलमान यांनी शेख रियाजला सासऱ्याच्या घरी गाठले आणि पैशांबद्दल विचारले. तेव्हा तो म्हणाला, की मी आता तुझे पैसे परत करणार नाही... जेथे तक्रार करायची तेथे तक्रार कर, माझी व माझ्या सासऱ्यांची दिल्लीपर्यंत ओळख आहे, असे सांगितले. त्यानंतर सलमान यांची खात्री झाली, की शेख रियाजने व्यवसायाच्या नावाखाली गुंतवणुक स्वरुपामध्ये रक्कम घेऊन चांगला परतावा देण्याचे आमिष देऊन आर्थिक फसवणूक केली आहे. सलमान यांनी एकूण ३ कोटी ७७ लाख ६४ हजार रुपये शेख रियाजला दिले. त्यावर त्याने परतावा म्हणून २ कोटी ३० लाख १८ हजार ४०० रुपये परत केले. मात्र मूळ गुंतवणूक रक्कम २ कोटी ८१ लाख ४९ हजार ९०१ रुपये व त्यावरील परतावा, तसेच सलमान यांच्या क्रेडीट कार्डचा सुध्दा त्याच्या व्यवसायासाठी वापर करून क्रेडीट कार्डची मूळ रक्कम ३ लाख ९९ हजार ९९५ रुपये व त्यावरील परतावा ५ लाख ९९ हजार ९९२ रुपये असे दिले नाहीत. एकूण ५ कोटी ७७ लाख ५७ हजार १०३ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे सलमान यांनी तक्रारीत म्हटले आहे.

अन्य गुंतवणूकदारही फसवणुकीच्या रांगेत...
केवळ सलमान हेच नाही तर अन्य गुंतवणूकदारही फसवणुकीच्या रांगेत आहेत. आक्रमखाँ अकबरखाँ पठाण (वय ३३, रा. झेंडा मैदान, वाळूज, ता. गंगापूर) यांची २० लाखांनी, नाजीर इस्माईल शेख (वय ४३) यांची १२ लाख रुपयांनी फसवणूक केलेली आहे. त्यामुळे एकूण फसवणुकीचा आकडा सहा कोटी नऊ लाख सत्तावन हजार एकशे तीन रुपये झाला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

दुर्दैवी घटना : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदापात्रात बुडून वारकऱ्याचा मृत्यू

Latest News

दुर्दैवी घटना : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदापात्रात बुडून वारकऱ्याचा मृत्यू दुर्दैवी घटना : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदापात्रात बुडून वारकऱ्याचा मृत्यू
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदावरी पात्रात स्नानासाठी उतरलेल्या ६० वर्षीय वारकऱ्याचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू...
महिलेची हत्या करून पळून जाणाऱ्या मारेकऱ्याला छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकावर पकडले!
महंत रामगिरी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याविरुद्ध गंगापूरमध्ये गुन्हा दाखल
विश्लेषण : अंबादास दानवेंची ‘दादा’गिरी चुकीचीच!; उमेदवार निवडून आणता येत नाहीत, जे निवडून आले त्यांना सांभाळता येत नाहीत मग दुसऱ्यावर त्रागा करून उपयोग काय?
आरटीओ कार्यालयातच भीषण दुर्घटना : चालकाने ट्रक मागे घेताना निष्काळजीपणा केला अन्‌ एजंटचा चाकाखाली येऊन मृत्यू!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software