- News
- राजेंद्र जंजाळांना प्रवेश द्यावा की नाही?, भाजपमध्ये काथ्याकूट, एक गट विरोधात, दुसरा आग्रही!
राजेंद्र जंजाळांना प्रवेश द्यावा की नाही?, भाजपमध्ये काथ्याकूट, एक गट विरोधात, दुसरा आग्रही!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांना भाजपात प्रवेश द्यावा की नाही, यावरून सध्या भाजपमध्येच दोन गट पडले आहेत. एक जंजाळ यांच्या प्रवेशाच्या बाजूने आहे, तर दुसरा विरोध करत आहे. शनिवारी (६ डिसेंबर) पक्षाच्या स्थानिक कोअर कमिटीची बैठक झाली, यात निवडणुकीच्या तोंडावर कुणालाही प्रवेश दिला तर आपल्या कार्यकर्त्यांनी काय करायचे?, असा सवाल एका गटाने केला.
भाजपकडून महायुतीत रिपाइंला (आठवले गट) महापालिका निवडणुकीत १५ जागा हव्या आहेत. प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम यांच्या नेतृत्त्वातील पदाधिकाऱ्यांनी मंत्री अतुल सावे, खा. भागवत कराड, शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांची भेट घेऊन तशी मागणी केली. रिपाइंला ३,४,५,७,९,१६, १७,१९,२०,२१, २३,२४,२५,२७,२९ या प्रभागांत जागा हव्या आहेत.
शिरसाट यांची पुन्हा टीका...
पालकमंत्री संजय शिरसाट यांनी राजेंद्र जंजाळ यांच्यावर पुन्हा टीका केली. ते म्हणाले, की जंजाळ यांनी कुठला पर्याय आहे हे शोधावे. याबाबत मी योग्य वेळी सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे. त्यांना मीच जिल्हाप्रमुख केले हे त्यांनी विसरू नये. या प्रश्नावर निर्णय झाल्यानंतर मी सविस्तर बोलेल, असे ते म्हणाले. त्र्यंबक तुपे यांना जिल्हाप्रमुख करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र, जंजाळ यांना मी जिल्हाप्रमुख केले होते हे त्यांनी विसरू नये, असे शिरसाट म्हणाले. या वादावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तोडगा काढणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र अद्याप तरी तशा कोणत्या हालचाली दिसत नसल्याने हळूहळू भाजपमध्ये जंजाळांना प्रवेश देण्याबाबत सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत.

