- News
- पॉलिटिक्स
- वसंतराव नाईक यांचे कार्य राज्याला दिशादर्शक : मुख्यमंत्री फडणवीस; सिडकोत नाईक यांच्या पुतळ्याचे अनाव...
वसंतराव नाईक यांचे कार्य राज्याला दिशादर्शक : मुख्यमंत्री फडणवीस; सिडकोत नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण
छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी राज्याच्या दुष्काळमुक्तीसाठी केलेली जलसंधारणाची कामे तसेच अन्नधान्यांमध्ये स्वयंपूर्णतेसाठी राबविलेल्या उपक्रमांचा आजही राज्याला मोठा लाभ होत आहे. राज्याला दिशा देणारे आणि परिवर्तनाची प्रेरणा देणारे त्यांचे कार्य खऱ्या अर्थाने दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, १६ नोव्हेंबरला येथे केले.
पोहरादेवी येथे सेवालाल महाराजांनी बंजारा समाजासाठी निर्माण केलेली ‘काशी’ अधिक भव्य, आधुनिक आणि जागतिक स्तरावर ओळख निर्माण करणारी व्हावी, यासाठी सरकारने ७०० कोटी रुपयांचा समग्र विकास आराखडा राबविला. त्यामुळे पोहरादेवीचा संपूर्ण कायापालट झाला असून आज ते राज्यातील महत्त्वाचे सांस्कृतिक व आध्यात्मिक केंद्र बनले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच बंजारा काशी पोहरादेवीला भेट देत म्युझियमचे उद्घाटन केले. याशिवाय म्युझियममध्ये प्रवेश करताना पहिला पुतळा स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा स्थापित करण्यात आला आहे, असे ते म्हणाले. पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले, की छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून आज स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होत आहे, हा दिवस खऱ्या अर्थाने बंजारा समाजासह आपल्या सर्वांसाठी दिवाळीप्रमाणेच आहे. कुंभमेळ्यासाठी येणारे भाविक छत्रपती संभाजीनगर येथे येतील, त्यादृष्टीने शहराच्या रस्ते तसेच सर्वांगिण विकासासाठी निधीची तरतूद गरजेची असल्याचे ते म्हणाले. स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा पुतळा आपल्या सर्वांना प्रेरणा देईल, असेही ते म्हणाले. महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी प्रास्ताविक केले. या वेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

