- News
- पॉलिटिक्स
- छ. संभाजीनगरात मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या पहिल्या अंकाचा विमोचन सोहळा थाटात; पत्रकारांवर हल्ला...
छ. संभाजीनगरात मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या पहिल्या अंकाचा विमोचन सोहळा थाटात; पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांविरुद्ध शासनाची कठोर भूमिका : आ. श्वेताताई महाले
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : आजघडीला सर्व जग मोबाइलवर आल्याने डिजिटल मीडियाचे महत्त्व वाढत आहे. मात्र याही परिस्थितीत वृत्तपत्रे वाचल्याशिवाय मनाचे समाधान होत नाही. त्यामुळे वृत्तपत्रांचे महत्त्व अबाधित आहे. मेट्रोपोलिस पोस्टची जी टीम आहे, ती आधी डिजिटल मीडियात असल्यापासून मी गेल्या ७-८ वर्षांपासून ओळखते. अत्यंत मेहनती आणि सातत्य टिकवून ठेवणारी ही टीम आहे. त्यामुळे ज्या प्रमाणे आजवर डिजिटल मीडियात यशस्वी होत आली आहे, तशीच प्रिंट मीडियातही यशस्वी होईल, अशा शुभेच्छा चिखलीच्या लोकप्रिय आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राला दिल्या.
पत्रकारांवरील हल्ल्यावर केले भाष्य
आ. श्वेताताई महाले यांनी पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत भाष्य करताना सांगितले, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पत्रकारांच्या हिताची भूमिका घेत असतात. पत्रकारांच्या संरक्षणासाठी केलेला कायदा, त्यानंतर पत्रकारांना विमा सुविधा लागू करण्याबाबत उचलेले पाऊल असो, ते कायम पत्रकारांच्या समस्या जाणून असतात. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बैठकीच्या निमित्ताने त्रंबकेश्वर येथे वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांना मारहाण झाली. ही बाब अत्यंत निषेधार्थ असून, सरकार आरोपींना कठोर शासन करण्याच्या भूमिकेत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकारांना कंटेट रायटिंग ही मोठी संधी...
या वेळी आ. श्वेताताई महाले म्हणाल्या, की सध्या युग सोशल मीडियाचे असल्याने कंटेट रायटिंगला अत्यंत महत्त्व आले आहे. आम्हा नेत्यांना अनेकदा दर्जेदार कंटेट रायटर मिळत नाहीत. पुणे, मुंबईच्या संस्था महिन्यासाठी २० ते २५ लाख रुपये यासाठी कमावतात. त्यामुळे सध्याच्या काळात पत्रकारांसाठी कंटेट रायटिंग ही मोठी संधी आहे, असे त्यांनी सांगितले.
संपादकपदी मनोज सांगळे
मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राचे संपादक म्हणून वरिष्ठ पत्रकार मनोज सांगळे यांनी सूत्रे हाती घेतली आहेत. ते मूळचे बुलडाणा जिल्ह्यातील मिसाळवाडी (ता. चिखली) येथील असून, गेल्या २० वर्षांपासून बुलडाणा, छ. संभाजीनगर येथे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. आजवर त्यांनी सकाळ, लोकमत, दिव्य मराठी, पुण्यनगरी, पुढारी या वृत्तपत्रांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक, मुख्य उपसंपादक अशा पदांवर काम केले आहे. दर्जेदार लिखाणाच्या हातोटीसह तंत्रस्नेही पत्रकार म्हणून त्यांना ओळखले जाते.
"सीएससीएन’ आता "मेट्रोपोलिस पोस्ट’ मालकीचे...
छत्रपती संभाजीनगर शहर-जिल्ह्यातील विक्रमी वाचकसंख्येची ‘छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज’ (www.chhatrapatisambhajinagarcitynews.com) ही न्यूज वेबसाईट मेट्रोपोलिस पोस्टने ताब्यात घेतली आहे. या न्यूज वेबसाईटचे शहर-जिल्ह्यात १० लाखांहून अधिक वाचक आहेत. या वेबसाईटचे संपादक धनसिंह सूर्यवंशी यांनी वेबसाईटचे मालकी तत्त्व या सोहळ्याच्या निमित्ताने मनोज सांगळे यांच्याकडे सुपूर्द केले.

