रात्री साडेनऊपर्यंत ६० % मतदान, आज दुपारी ३ पर्यंत कळणार मनपा कुणाच्या ताब्यात!; मतदानादरम्यान मुकुंदवाडी, सिटी चौक भागात बोगस मतदारांवरून तणाव, साताऱ्यात शिंदे गट-भाजप कार्यकर्ते भिडले !!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी (१५ जानेवारी) रात्री उशिरा हाती आलेल्या माहितीनुसार, ६० टक्‍के मतदान झाले आहे. सकाळी साडेसातला सुरू झालेले मतदान रात्री साडेनऊपर्यंत सुरू होते. शेवटच्या दोन तासांत २० टक्‍के मतदारांनी गर्दी करून मतदान केले. त्यामुळे दिवसभर संथ सुरू असलेल्या मतदानाची टक्‍केवारी वाढली. दरम्यान, गोंधळ, तणावामुळे अनेक ठिकाणी पोलिसांना हस्तक्षेप करण्याची वेळ आली. आज, १६ जानेवारीला सकाळी १० पासून शहरात ४ ठिकाणी मतमोजणी होणार आहे. दुपारी ३ पर्यंतच महापालिकेची सत्ता कुणाकडे असेल हे स्पष्ट होईल.

बनावट आधार कार्ड, पोलिंग चिटवरून गोंधळ
मुकुंदवाडीतील महापालिका शाळेतील मतदान केंद्रावर दुपारी मतदान प्रक्रियेदरम्यान काही मतदारांवर संशय आला. विनोद जगन्नाथ शिंदे नावाचा मतदार मतदानासाठी आला असता त्याचा फोटो जुळत नव्हता. अजित पवार गटाच्या निवडणूक प्रतिनिधींनी त्यावर आक्षेप घेतला आणि मतदान करण्यापासून रोखले.  काही संशयास्पद व्यक्तींची जवळीलच ए वन हॉटेलमधून येजा सुरू होती. त्यामुळे राजकीय पदाधिकाऱ्यांनी थेट हॉटेलच्या खोल्यांत प्रवेश केला. तेथे काही खोल्यांमध्ये मतदानाशी संबंधित साहित्य आढळले. पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी केली. त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली. महापालिका शाळा, ज्ञानेश विद्या मंदिर, ज्ञानज्योती शाळेतील मतदान केंद्रात बोगस मतदान झाल्याचा आरोप अजित पवार गट, ठाकरे गट, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी  केला.

गदारोळ वाढून तणाव निर्माण झाल्याने पोलीस आयुक्‍त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर, पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांनी येऊन चौकशी केली. तणाव वाढत असल्याचे पाहून क्यूआरटी जवानांना पाचारण करण्यात आले. मुख्य बाजारपेठही बंद झाली. ८ ते १० जण पकडले जाऊनही विनोद शिंदे याची बोगस मतदाराच्या संशयावरून नोंद करण्यात आली. पंचायत समिती कार्यालयातील मतदान केंद्रातही दुपारी ३ च्या सुमारास बोगस मतदानाच्या संशयावरून ७ महिला पकडण्यात आल्या. त्यांचे चेहरे व आधार कार्डवरील छायाचित्र जुळत नव्हते. त्या उडवाउडवीची उत्तरे देत होत्या. त्यामुळे सिटी चौक पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्या नारेगावच्या निघाल्या. त्यांच्याकडे प्रभाग ६ मधील महिला मतदारांच्या नावाचे बनावट आधार कार्ड आढळले. मतदानासाठी कुणी पाठवले हे मात्र रात्री उशिरापर्यंत कळू शकले नाही.

साताऱ्यात राडा...
प्रभाग क्र. २९ मध्ये गुरुवारी सायंकाळी साडेपाचला मतदानाची वेळ संपल्यानंतर इटखेड्यातील अग्रसेन विद्या मंदिर शाळेतील मतदान केंद्राचे दार बंद झाले. मात्र शिंदे गटाच्या उमेदवार श्वेता त्रिवेदी यांचे दीर मोहित त्रिवेदी हे केंद्रात गेले. भाजप कार्यकर्त्यांनी याला आक्षेप घेतला. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते केंद्रात शिरले. त्यांच्यात हाणामारी सुरू झाली. त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करून परिस्थिती आटोक्यात आणली. शिंदे गटाचे उमेदवार सिद्धांत शिरसाट हे घटनास्‍थळी आले. त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते होते. या राड्यात छायाचित्रकार हुसेन जमादार यांना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करत त्यांचा कॅमेरा हिसकावला आणि आदळून तुकडे केले. जमादार यांनी ३ जणांविरुद्ध सातारा पोलिसांत तक्रार दिली आहे. घटनास्‍थळी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी धाव घेतली. त्यांनी जमावाला पांगविण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते निघून गेले. यावेळी भाजप उमेदवार भगवान गायकवाड यांना पोलिसांनी संरक्षण पुरवले होते.

मतमोजणी केंद्रांना कडक बंदोबस्त...
मतदानादरम्यान झालेल्या राड्यांमुळे मतमोजणी केंद्रांभोवती पोलिसांचा कडा पहारा असणार आहे. आज सकाळी १० पासून मतमोजणी होऊन दुपारी ३ पर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल. गरवारे स्टेडियमवर प्रभाग १, ७, ८, ९, १०, ११, २३, २४, २५ ची मतमोजणी होणार आहे. शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रभाग १५, १६, १७, २६, २८, २९ ची तर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रभाग २१, २२, २७, १८, १९, २० ची मतमोजणी होईल. सेंट फ्रान्सीस हायस्कूलमध्ये प्रभाग ३, ४, ५, ६, १२, १३, १४ ची मतमोजणी होईल. सुरुवातीला टपाली मतदानाची मोजणी होईल. प्रभाग १८ मध्ये सर्वात कमी ६ फेऱ्या असल्याने तिथला निकाल सर्वांत लवकर लागेल.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ

Latest News

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून...
मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकल्यावर चढवला हल्ला, चिमुकला आक्रोश करत असताना आणखी लचके तोडले, बायजीपुऱ्यातील घटनेने महापालिकेप्रती संतापाची लाट, जी. श्रीकांत पाठ थोपटून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांना कामाला लावा, नागरिकांची अपेक्षा
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software