- Marathi News
- पॉलिटिक्स
- स्वागतार्ह बदल : मनसैनिकांना मारहाण झाल्याने करोडी टोलनाक्याविरुद्ध मनसे पदाधिकारी पोलीस आयुक्तांन...
स्वागतार्ह बदल : मनसैनिकांना मारहाण झाल्याने करोडी टोलनाक्याविरुद्ध मनसे पदाधिकारी पोलीस आयुक्तांना भेटले
.jpg)
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : करोडी टोलनाक्यावर तक्रार करण्यासाठी रजिस्टर मागितल्यावर नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी जिल्ह्याच्या ३ प्रमुख मनसैनिकांना बेदम चोपले. त्यामुळे मनसे या टोलनाक्याविरुद्ध आक्रमक झाली आहे. पोलीस आयुक्तांची भेट घेऊन हल्लेखोर कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. आजवर मनसे इतकी मवाळ कधीच वागली नव्हती, जशास तसे उत्तर देणाऱ्या मनसेने एवढ्या मोठ्या घटनेनंतर निवडलेला मार्ग पाहता हा बदल निश्चितच स्वागतार्ह मानला जात आहे.
७ ऑगस्ट रोजी पहाटे संकेत शेटे, बिपीन नाईक व मनीष जोगदंडे हे वाहनातून प्रवास करत असताना फास्टटॅगद्वारे टोल भरला. यानंतर ते रस्त्याची दुरवस्था व तेथील विजेचे दिवे बंद असल्याची तक्रार नोंदविण्यासाठी रजिस्टर मागण्यास गेले असता प्रभू बागूल व त्याच्या सात ते आठ साथीदारांनी तिघांवर दांडक्यांनी हल्ला केला. शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. तिघा मनसैनिकांनी दौलताबाद पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी बागूल व त्याच्या साथीदार कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्तांना सांगितले...
छत्रपती संभाजीनगर येथील करोडी टोलनाका मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचे अड्डे बनले आहेत. या ठिकाणी दारू व गांजाचे खुलेआम सेवन, वाद निर्माण करणे, वाहनधारकांना विनाकारण मारहाण करणे व धमकावणे यांसारख्या गंभीर घटना वारंवार घडत आहेत. हे सर्व गुंड करोडी टोल वसुली करणाऱ्या एजन्सीच्या संरक्षणात काम करत असून, एजन्सीचे मालक व त्यांच्या साथीदारांचाही गुंडगिरीस थेट पाठिंबा आहे, हे स्पष्ट दिसते. त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई न होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. याआधीही अनेक नागरिकांनी तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रभू बागुल व त्याच्या गुंड साथीदारांना त्वरित अटक करण्यात यावी.
टोल वसुली एजन्सीचे मालक व त्यांचे गुंडगिरीस पाठबळ देणारे साथीदार यांच्यावरही कारवाई करून त्यांची पोलीस पडताळणी व प्रमाणपत्र तपासणी करण्यात यावी. टोल कार्यालयात सुरू असलेले दारू व गांजाचे अड्डे तात्काळ बंद करून, अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी टोलनाक्यावर पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसहित नागरिकांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी स्वतंत्र व सुरक्षित यंत्रणा उपलब्ध करून द्यावी. अनेक गुन्ह्यांत हात असणाऱ्या प्रभू बागूल व त्याचे सर्व संबंधित गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना तडीपार करण्यात यावे, अशा मागण्या निवेदनात केल्या आहेत. या वेळी प्रकाश महाजन, दिलीप चितलांगे, बिपीन नाईक, गजन पाटील, आशिष सुरडकर, संकेत शेटे, मनीष जोगदंडे, राहुल पाटील, प्रशांत आटोळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.