- News
- एक्सक्लुझिव्ह
- Political Exclusive : ‘महायुती’मुळे भाजपचा ‘महापौर’ होईल कसा?, मोठा भाऊ-छोटा भाऊ जागावाटपात कोण राह...
Political Exclusive : ‘महायुती’मुळे भाजपचा ‘महापौर’ होईल कसा?, मोठा भाऊ-छोटा भाऊ जागावाटपात कोण राहणार, बंडखोरी जास्त कोणत्या पक्षाला भेडसावणार?, छत्रपती संभाजीनगरच्या थंड हवेत राजकीय ‘गरमी’
मनोज सांगळे, संपादक, ‘मेट्रोपोलिस पोस्ट’
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या शीतलहर उसळली आहे. शहरवासी अक्षरशः गारठून गेले आहेत. या थंडीत मात्र राजकारणात गरमा गरम वातावरण आहे. महायुतीची शक्यता दाट वाटू लागल्याने इच्छुकांच्या पोटात गोळा आला आहे. भाजपने आतापर्यंत स्वतंत्र निवडणूक लढण्याच्या दृष्टीनेच नियोजन केले आहे. महापौर भाजपचाच होणार, असे दावेही झाले आहेत. असे असताना जर महायुतीत निवडणूक लढली तर जागा वाटपात मोठा भाऊ, छोटा भाऊ कोण असणार? सध्याच्या वातावरणात भाजप शिंदे गटाला बरोबरीचेही मानणार नाही, त्यामुळे समसमान जागा वाटपाचा विषयच येत नाही. त्यामुळे गेल्या निवडणुकीत भाजपपेक्षा सर्वाधिक जागा लढणारी शिवसेना आता भाजपपेक्षा कमी जागा घेणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
भाजपकडे उमेदवारीसाठी ११२० जणांनी गळ घातली असून, त्यांनी अर्ज भरून दिले आहेत. २०१५ मध्ये शेवटची निवडणूक झाली होती. त्यानंतर महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक पाण्यात देव ठेवून बसले आहेत. अखेर आता निवडणूक होत असताना इतकी वर्षे केलेली मेहनत वाया जाऊ नये म्हणून बंडखोर समोर येऊ शकतात. भाजपकडून अनेक इच्छुक असल्याने हा फटका सर्वाधिक भाजपच्या अधिकृत उमेदवारांनाच बसू शकतो. मात्र शहर-जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांना तसे वाटत नाही. ते म्हणतात, की भाजप शिस्तबद्ध पक्ष असल्याने उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी बंडखोर माघार घेतील. भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी सर्वाधिक अर्ज उच्चभ्रू वसाहत असलेल्या सिडको एन ३ आणि एन ४ मधून आले आहेत. प्रभाग १३ हा मुस्लिमबहुल असल्याने केवळ एकानेच उमेदवारी मागितली आहे. अंतिमतः कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडेल हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.
केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील जे गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत, त्यांची कन्या धर्मिष्ठा चव्हाण यांनाही महापालिकेची उमेदवारी हवी आहे. त्यांनी ३ महत्त्वाच्या प्रभागांतून उमेदवारीसाठी भाजपकडे अर्ज केला आहे. सी. आर. पाटील यांचे पक्षात मोठे वजन आहे. त्यामुळे अन्य इच्छुकांच्या पोटात गोळा आला आहे. धर्मिष्ठा या शहरातील इरा हॉटेलचे मालक अर्जुन चव्हाण यांच्या पत्नी आहेत. त्यांनी नक्षत्रवाडी, उस्मानपुरा आणि अजबनगर-खोकडपुरा या ३ प्रभागांतून उमेदवारीची मागणी केली आहे.
शिंदे गट आजपासून अर्ज स्वीकारणार
दरम्यान, शिंदे गटाने आजपासून (११ डिसेंबर) उमेदवारी अर्ज स्वीकारायला सुरुवात केली आहे. इच्छुकांना फॉर्म वाटप करून आलेल्या अर्जानुसार सोमवारी आणि मंगळवारी (१५ व १६ डिसेंबर) समर्थनगर येथील कार्यालयात मुलाखती पार पडतील. त्यानंतर भाजपसोबत जागांची वाटाघाटी होणार आहे. शिंदे गटातील सूत्रांच्या माहितीनुसार, ज्या जागा शिवसेनेच्या आहेत, त्या २९ जागा शिंदे गटाकडे असतील आणि ज्या २३ जागा भाजपच्या आहेत त्या भाजपकडे राहतील. उर्वरित जागा वाटपाचे नियोजन होईल. महापालिका निवडणुकीसाठी नेमलेल्या मुख्य समन्वय समितीत नाराज जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनाही स्थान देण्यात आले आहे, हे विशेष. जंजाळ यांच्याशिवाय या समितीत पालकमंत्री संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, खासदार संदिपान भुमरे, युवा सेनेचे ऋषिकेश जैस्वाल यांचा समावेश आहे. स्टार प्रचारकांत किशनचंद तनवाणी आहेत.

