छत्रपती संभाजीनगरात अवैध इंटरनॅशनल कॉल सेंटरवरील कारवाईची FULL  STORY : कसा करायचे संपर्क, कसे दाखवायचे भीती, लुटण्याची कशी होती पद्धत अन्‌ लुटीची विभागणी जाणून घेऊ सर्व...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

दिव्या पुजारी : विशेष प्रतिनिधी, मेट्रोपोलिस पोस्ट
छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा एमआयडीसीत कनेक्ट इंटरप्रायजेस टी- ७ एसटीपी १ या चार मजली इमारतीत अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर चालत होते. इथून तरुण-तरुणी कॉल करून अमेरिकेतील नागरिकांना कर चुकवेगिरीवर कारवाईसह विविध योजना, कर्ज, डिजिटल अरेस्टची भीती दाखवून ऑनलाइन गंडा घालायचे. मंगळवारी (२८ ऑक्‍टोबर) पहाटे १ वाजून २० मिनिटांनी सिडको एमआयडीसी पोलिसांनी या कॉल सेंटरवर जंबो पथकासह अक्षरशः हल्लाबोल केला. मंगळवारी रात्री ९ पर्यंत कारवाई सुरू होती. ११६ तरुण-तरुणींना ताब्यात घेतले. पैकी ११५ जणांना अटक केली, तर एक आरोपी अल्पवयीन आहे. त्यांच्याकडून ११९ लॅपटॉप व मोबाइलसह अन्य तांत्रिक, डिजिटल साधने असा कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस उपायुक्‍त प्रशांत स्वामी यांनी या कारवाईची माहिती पत्रकारांना दिली.

pskarvai2

भावेश प्रकाश चौधरी, भाविक शिवदेव पटेल, सतीश शंकर लाडे, वलय पराग व्यास, अब्दुल फारूक मुकदम शाह ऊर्फ फारुकी, अजय ललित ठाकूर, मनोवर्धन राठोड आणि जॉन (सर्व रा. अहमदाबाद, गुजरात) अशी  मुख्य संशयितांची नावे आहेत. सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांना या अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यांनी वरिष्ठांची परवानगी घेतली आणि छाप्याचे नियोजन केले. संशयित मोठ्या संख्येने असल्याने मोठे पोलीस बळ कारवाईसाठी जमवण्यात आले. गीता बागवडे, पोलीस उपनिरीक्षक राधा लाटे यांच्या पथकाने छापा मारला. सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक भरत पाचोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुख्य पाच संशयितांसह एकूण ११७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

photos

आधी कारवाईची भीती, मग तडजोडीसाठी मन वळवायचे...
कॉल सेंटरमधील तरुण-तरुणी अमेरिकेतील नागरिकांना कॉल, ई-मेल, एसएमएसद्वारे संपर्क करायचे. नागरिकाने संपर्क केल्यानंतर हे कॉल डायव्हर्ट करण्यात येऊन कारवाईची भीती दाखवली जायची किंवा विविध योजनांचे आमिष दाखवले जायचे. तरुण-तरुणी अस्खलित इंग्रजी बोलायचे. तडजोडीसाठी मन वळवायचे. तडजोड ठरल्यानंतर कूपन, व्हाऊचरच्या माध्यमातून रक्‍कम डॉलरमध्ये घ्यायचे. हे डॉलर सिंगापूर, थायलंड, कंबोडिया देशातून बिट कॉइनच्या माध्यमातून भारतीय रुपयांत रुपांतरित केले जायचे. नंतर ही रक्कम मुख्य संशयितांच्या गुजरातमधील बँक खात्यावर वळवली जायची किंवा हवालामार्गे भारतात येत होती. यातून रोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल केली जात होती. अमेरिकन नागरिकांची माहिती पीपल फाइंडर डॉट कॉम आणि व्हाइट पेजेस डॉट कॉम या वेबसाईटवर भामटे मिळवायचे. 

लुटीची व्हायची विभागणी...
कामांची विभागीय अमेरिकेतील राज्यनिहाय केलेली होती. लुटीचा ४५ टक्के वाटा जॉन नावाच्या संशयिताला मिळायचा. उर्वरित ५५ टक्‍क्यांत भावेश, सतीश, वलय, अब्दुल यांचा वाटा असायचा. कॉल करणाऱ्या तरुण-तरुणींना २५ ते ३५ हजार रुपये पगार देण्यात येत होता. फसवणूक केल्यानंतर प्रत्येक डॉलरवर ३ रुपये एवढा इन्सेन्टिव्ह दिला जात होता. प्रत्येक नागरिकाची किमान २ ते ३ हजार डॉलर इतकी फसवणूक केली जायची. यातून प्रत्येक कर्मचाऱ्याला किमान ६ ते ९ हजार रुपये एवढी रक्कम मिळायची. त्यामुळे प्रत्येक कर्मचारीही आपल्या हातून फसवणूक करण्यासाठी धडपड करायचा. इन्सेन्टिव्हसाठी कर्मचारीही इतके झपाटले होते, की ओव्हरटाइमही करत.

officefroud

भामटे गुजरातचे, छत्रपती संभाजीनगरला आले कसे?
कॉल सेंटर चालवणारे भामटे गुजरातचे आहेत. त्यांनी सुरुवातीला गुजरातमधून हे रॅकेट चालवले. तिथे भंडाफोड झाल्यानंतर मध्यप्रदेशच्या इंदूरमध्ये सेटअप हलवला. तिथेही पोलिसांना कुणकुण लागताच छत्रपती संभाजीनगरची निवड त्यांनी केली. त्यातही चिकलठाणा एमआयडीसीतील आयटी सेक्टरची निवड केली. जणू आयटीचेच काहीतरी काम सुरू असल्याचा लोकांना भास व्हावा. त्यांनी इमारत मालकासोबतही आयटीचे काम करत असल्याचा करारनामा केला होता. कर्मचारी अस्खलित इंग्रजी कसे बोलायचे, असा प्रश्न पडू शकतो. पण त्यासाठी त्यांना आधी प्रशिक्षण दिले जायचे. प्रशिक्षित झाल्यानंतरच काम दिले जायचे. अमेरिकन नागरिकांच्या जीवनशैलीबद्दलही माहिती दिली जात होती. छत्रपती संभाजीनगरमध्ये चालणाऱ्या या कॉल सेंटरची पाळेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरची असल्याने पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस महासंचालक निखिल गुप्ता हे कारवाईवर नजर ठेवून होते. गुप्ता यांनी यापूर्वी छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्‍त म्हणून काम केलेले आहे. त्यामुळे ते कारवाईत सहभागी अधिकाऱ्यांकडूनही थेट माहिती घेत होते, असे सूत्रांकडून समजले.

२० तास चालली कारवाई
सलग २० तास ही कारवाई चालली. पोलीस उपायुक्‍त प्रशांत स्वामी, पंकज अतुलकर, शहर गुन्हे शाखेचे रत्नाकर नवले, सहायक पोलीस आयुक्‍त मनोज पगारे, सायबरचे पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, सिडकोचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल येरमे, पुंडलिकनगरचे अशोक भंडारे, हर्सूलच्या स्वाती केदार यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकांसह २०० हून अधिक पोलीस बळ या कारवाईसाठी एकवटले होते. घटनास्‍थळी प्रभारी पोलीस आयुक्‍त सुधीर हिरमेठ यांनी भेट दिली. पकडलेल्या तरुण-तरुणींना मराठी, हिंदी भाषा बोलता येत नव्हती. त्यामुळे चौकशी करताना अडचणी येत होत्या. प्रत्येकी २० संशयितांना एकेका गाडीतून घाटी आणि मिनी घाटीत नेऊन वैद्यकीय तपासणी करण्यात आली. कारवाईत गुन्ह्याच्या मुळापर्यंत जाण्यासाठी पोलीस प्रयत्न करणार आहेत. कारवाईत सहभागी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मी अभिनंदन करतो. सर्वांनी या कारवाईसाठी मेहनत घेतली, अशा शब्दांत प्रभारी पोलीस आयुक्‍त सुधीर हिरेमठ यांनी कारवाईत सहभागी पोलिसांची पाठ थोपटली. 

मुख्य संशयितांना ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी, बाकीचे हर्सूल जेलमध्ये...
के. एस. इंटरप्रायजेस नावाने वर्षभरापासून हे कॉल सेंटर सुरू होते. ४ मजली इमारतीतील तळमजल्यावर २ हॉल आणि दुसऱ्या मजल्यावरील एका हॉलमध्ये हा गोरखधंदा चालायचा. खिडक्यांना काळे पडदे लावलेले असायचे. शेवटच्या मजल्यावर घरमालक राहतात. ते अनेकवेळा दोन्ही मजल्यांवर जाऊन चौकशी करत होते. पण काय चाललंय हे कळण्याइतपत त्यांची समज नव्हती. संशयितांची संख्या जास्त असल्याने २०- २० जणांचा गट करून पोलिसांनी त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर मंगळवारी रात्री १० ला हजर केले. न्या. व्ही. एच. देशमुख यांनी प्रमुख सहा संशयित भावेश, भाविक, सतीश, वलय, अजय, मनोवर्धन यांना ६ नोव्‍हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. उर्वरित १०९ जणांची १९ नोव्‍हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत (हर्सूल जेल) रवानगी केली. टोळीने अमेरिकन नागरिकांचा डेटा कसा कसा गोळा केला, मुख्य सूत्रधार कोण आहे, फसवून मिळवलेले पैसे कोठे वळते केले याचा सखोल तपास करायचा असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. एवढ्या मोठ्या संख्येने संशयित असल्याने सर्वांचीच पोलीस कोठडी न मागत प्रमुख संशयितांची कोठडी मागून बाकीच्यांच्या पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवला. 

संशयितांकडून कसून चौकशी...
आतापर्यंत या कॉल सेंटरमधून किती लोकांना, किती डॉलर्सचा गंडा घातला, बंदी असलेल्या क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून पैसे कसे चलनात आणले यासह अन्य प्रश्नांची उत्तरे मुख्य संशयितांकडून मिळविण्यासाठी पोलीस कसून चौकशी करत आहेत. संशयित नागालँड, आसाम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, सिक्कीमसह उत्तरप्रदेश, तेलगंण, गुजरात आणि महाराष्ट्रातील आहेत. बहुतांश जण अभियांत्रिकी शिक्षण घेतलेले आहेत. या कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला काही दिवसांपूर्वी कामावरून काढून टाकण्यात आले होते. त्यानेच रागातून पोलिसांना टीप दिली आणि मोठे रॅकेट उघडकीस आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ!

Latest News

वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ! वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एमआयडीसी पथकाच्या विशेष पाहणीत आज, १७ मार्चला एका बंद कंपनीत घरगुती गॅस सिलिंडर्सचा मोठा...
सिल्लोडच्या सुसाट पिकअप वाहनाने स्कुटीस्वार डॉक्टरांना उडवले, जागीच मृत्यू, पालोदवर शोककळा!!
कांचनवाडीत तलवारीने दहशत माजवणाऱ्या युवकावर पोलिसांनी घातली झडप!, व्हॉट्‌स ॲप चॅटिंगमध्ये झाला धक्कादायक उलगडा...
छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा निर्णय : स्कूल व्हॅनमध्ये जीपीएस, सीसीटीव्ही कॅमेरे, पॅनिक बटन सुविधा बंधनकारक, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काढले आदेश
पैठण शहरातील १९ वर्षीय युवती, २५ वर्षीय विवाहिता बेपत्ता!; माहिती कळविण्याचे आवाहन
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software