- News
- एक्सक्लुझिव्ह
- Full Report : विजय औताडेंच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असताना अचानक राजूरकरांचे नाव पुढे कसे आले, ज...
Full Report : विजय औताडेंच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असताना अचानक राजूरकरांचे नाव पुढे कसे आले, जंजाळांचे नाव चर्चेत येताच शिंदे गटात काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मनोज सांगळे, मो. ८७९९८३१४१० : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी केवळ १ जागा हवी असलेल्या, ५७ नगरसेवकांच्या भाजपने शिंदे गटाला (१३ जागा) सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यामुळे महापालिकेत युती बळकट स्थितीत आली आहे. महापौरपदासाठी समीर राजूरकर आणि विजय औताडे ही २ नावे चर्चेत होती. पैकी सामान्यांना परिचित असे नाव विजय औताडेंचे होते. त्यांच्यासाठी जालन्याचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी जोरही लावला. मात्र मंत्री अतुल सावे आणि खा. डॉ भागवत कराड यांनी राजूरकर यांच्यासाठी आग्रह धरला आणि मुंबईतील नेतृत्त्वाकडून राजूरकरांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. रात्रीच तसा निरोप राजूरकरांना देण्यात आला. उपमहापौरपदासाठी शिंदे गटाकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने राजेंद्र जंजाळ यांचे नाव जाहीर करण्यात आले. तत्पूर्वी या पदी कुणाची नियुक्ती करायची यावरून शिंदे गटात दोन गट पडले. मंत्री संजय शिरसाट हे जंजाळांना उपमहापौर करू इच्छित नव्हते, असे बोलले जात आहे. पण थेट एकनाथ शिंदेंचाच आदेश निघाला. ज्यांच्यासाठी शिरसाट जोर लावत होते त्या त्र्यंबक तुपे यांना पक्षाचे गटनेते करण्यात आले.
उपमहापौरपदासाठी शिंदे गटात दोन गट पडले. एका बाजूने ९ नगरसेवक होते, तर दुसऱ्या बाजूने ४. राजेंद्र जंजाळ यांना उपमहापौर होऊ द्यायचे नाही म्हणून हर्षदा शिरसाट, अनिता घोडेले, त्र्यंबक तुपे यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज भरण्याचेही ठरवले. ९ नगरसेवक मंत्री शिरसाट यांच्या घरी बसलेले होते. या गटबाजीमुळे भाजपला ३ तास वाट पाहावी लागली. अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने राजेंद्र जंजाळ यांना उपमहापौर करण्याचा निर्णय झाला. तसा निरोप संपर्क नेते विलास पारकर यांनी शहराध्यक्ष किशोर शितोळे यांना दिला. जंजाळ यांना आ. प्रदीप जैस्वाल, ऋषिकेश जैस्वाल यांच्यासह भाजप कार्यालयात येण्यास दुपारी २ वाजले. एकनाथ शिंदे यांनी जंजाळ यांची निवड केल्याचे आणि पक्षादेश पाळण्याचे आदेश निघाल्याने उपमहापौरपदासाठी अर्ज भरायला निघालेल्या तिन्ही नगरसेवकांना मंत्री संजय शिरसाट यांनी महानुभाव आश्रमाजवळूनच परत बोलावले. त्यानंतर समीर राजूरकर आणि राजेंद्र जंजाळ यांना सोबत घेऊन मंत्री अतुल सावे, खा. डॉ. भागवत कराड, किशोर शितोळे, आ. ऋषिकेश जैस्वाल, शिंदे गटाचे संपर्क नेते विलास पारकर यांनी महापालिकेचा सचिव विभाग गाठला आणि महापौर, उपमहापौरपादसाठी दोघांचे अर्ज भरले. दरम्यान, महापालिकेतील इतर पदांच्या वाटाघाटीबाबत अद्याप काहीही चर्चा झालेली नाही. निवडणुकीनंतर शिंदे गटाला काय द्यायचे हे ठरवले जाईल. किशोर शितोळे म्हणाले, की भाजप मोठा भाऊ आहे. त्यामुळे उपमहापौरपद शिंदे गटाला दिले आहे. राजूरकर आणि जंजाळ यांची नावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतिम केली आहेत, हे विशेष.
कोण आहेत राजूरकर अन् जंजाळ...
समीर सुभाष राजूरकर हे प्रभाग १७ ड मधून निवडून आले आहेत. त्यांना नगरसेवक होण्याचीही इच्छा नव्हती. त्यांच्याकडे निवडणूकप्रमुखपदाची जबाबदारी होती. त्यांचे शिक्षण बी.कॉम. झालेले आहेत. त्यांच्या पत्नीचे शुभांगी असून, मुले रणवीर आणि स्वामिनी आहेत. जी सध्या उच्चशिक्षण घेत आहेत. त्यांचा सामाजिक कार्याचा प्रवास राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून सुरू झालेला आहे. भाजयुमोत काम केल्यानंतर त्यांची भाजपमध्ये कारकिर्द झाली. संघटन कौशल्यासाठी ते ओळखले जातात.
राजेंद्र हिंमतराव जंजाळ हे प्रभाग २२ ड मधून निवडून आलेले आहेत. त्यांचे शिक्षण बी. ए. एल. एल. बी. झालेले आहे. त्यांच्या पत्नीचे नाव माधुरी असून, त्यांना यथार्थ आणि विराज ही दोन मुले आहेत. ते २०१०, २०१४ मध्ये नगरसेवक राहिले आहेत. स्थायी समिती सदस्य, दोन वर्षे सभागृहनेता, २०१९ मध्ये उपमहापौर राहिलेले आहेत. मूळ शिवसेनेत असताना युवा सेनेचे उपसचिव होते. एकनाथ शिंदेंसोबत आल्यानंतर जिल्हाप्रमुख झाले. ते कट्टर हिंदुत्वववादी असून, आक्रमक स्वभाव आणि संघटन कौशल्य आहे.
संपर्क क्रमांक : समीर राजूरकर मो. ९४२२७०६७९७, राजेंद्र जंजाळ : ९४२२२१४६१७, ९३७१०२९८७८
एमआयएमकडून महापौरपदासाठी अशोक हिवराळेंचे नाव
३३ नगरसेवक असलेल्या एमआयएमने महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक लढण्याचे ठरवले आहे. महापौरपदासाठी प्रभाग १ मधून निवडून आलेल्या अशोक हिवराळे आणि उपमहापौरपदासाठी मोहम्मद वसीम अहमद यांची उमेदवारी प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेऊन घोषित केली. दोघांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह जाऊन उमेदवारी अर्जही भरले. हिवराळे हे २८ वर्षे महापालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत होते. सेवेची काही वर्षे बाकी असताना त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आणि एमआयएमचे उमेदवार होऊन जिंकलेही.
दोन शिवसेना, दोन गटनेते
-महापालिकेत शिंदे गटाच्या गटनेतेपदी माजी महापौर त्र्यंबक तुपे यांची निवड पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी शुक्रवारी (६ फेब्रुवारी) झालेल्या बैठकीत करण्यात आली. लगेचच शिंदे गटाच्या नगरसेवकांनी विभागीय आयुक्तांकडे त्यांच्या गटाची नोंदणी केली. निवडणुकीनंतर ३० दिवसांत नगरसेवकांना त्यांच्या गटाची नोंदणी करावी लागते. मंत्री शिरसाट यांच्या निवासस्थानी १३ पैकी ९ नगरसेवकांची बैठक झाली. यात माजी महापौर त्र्यंबक तुपे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली.
-ठाकरे गटाच्या ६ नगरसेवकांनी शुक्रवारी त्यांच्या गटनेतेपदी नगरसेवक गणेश कौतिकराव लोखंडे यांची निवड केली. त्यांनी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांची भेट घेऊन याविषयीची कागदपत्रे सादर केली. ही निवड केल्याची कागदपत्रे विभागीय महसूल आयुक्तांकडे सादर करणे बंधनकारक आहे. आ. अंबादास दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे, दिग्विजय शेरखाने, ज्ञानेश्वर डांगे, रशीद मामू, सावित्री वाणी, सचिन खैरे, सुनीता सोनवणे, वैशाली कोरडे, हनुमान शिंदे व रामेश्वर कोरडे आदींच्या उपस्थितीत लोखंडे यांची निवड झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

