- Marathi News
- सिटी क्राईम
- तुम्ही बजाजनगरच्या ‘आश्विनी लक्ष्मण शिंदे’ला ओळखता का?,लगेच गेवराई पोलिसांना कळवा!, लग्नाच्या नावाख...
तुम्ही बजाजनगरच्या ‘आश्विनी लक्ष्मण शिंदे’ला ओळखता का?,लगेच गेवराई पोलिसांना कळवा!, लग्नाच्या नावाखाली साध्याभोळ्या कुटुंबाला घातलाय २ लाखांचा गंडा!!

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग गावातील अत्यंत साध्याभोळ्या कुटुंबाला छत्रपती संभाजीनगरातील बजाजनगरातील तरुणीने एजंट महिलेच्या मदतीने तब्बल २ लाखांना गंडा घातला आहे. लहानपणीच वडील वारलेले, काकाने सांभाळ करून लहानाचे मोठे केलेल्या तरुणाला लग्नासाठी मुलगी देतो, असे आमिष पुण्याच्या भामट्या एजंट महिलेने दाखवले. छत्रपती संभाजीनगरहून मुलगी, मुलीची आई, मुलीची बहीण लग्नासाठी आल्या. लग्नाची बोलणी ते लग्न अन् नवरीचे पलायन, असा सर्व घटनाक्रम अवघ्या तीनच दिवसांत घडला. गावातील एका महिलेची या भामट्यांना फूस होती. तरुणाच्या तक्रारीवरून गेवराई पोलिसांनी आता चौघींविरुद्ध बुधवारी (१३ ऑगस्ट) गुन्हा दाखल केला आहे.
१४ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ वाजता संगीता शिंदे पुन्हा शुभमच्या घरी आली. नवरी मुलगी, तिची आई व बहीण छत्रपती संभाजीनगर येथून गेवराईला येत आहेत. आपल्याला त्यांना आणायला जायचे आहे, असे म्हणाली. त्यामुळे संगीता शिंदे व शुभमचा चुलत भाऊ शंकर मोटारसायकलीने गेवराईला गेले. दुपारी साडेबाराला शंकरच्या मोटारसायकलीवर संगीता व नवरी मुलगी तर तिची आई व बहीण असे रिक्षाने सिरसमार्गला घरी आले. शुभमने मुलगी पाहिली. त्याला आवडली. मुलीने तिचे नाव अश्विनी लक्ष्मण शिंदे असे सांगितले. ती बजाजनगर वाळूज एमआयडीसीत राहत असल्याचे सांगितले. तिने आधारकार्डची झेरॉक्स दिली. त्यानंतर लगेचच घरीच शुभम व अश्विनीला हळद लागली.
मठात लग्न लागले, देव दर्शनही झाले...
दुपारी दीडला गावातीलच भाऊसाहेब महाराज मठात शुभम व अश्विनीचे लग्न झाले. गावातील गौतम पंडित सोनार यांच्याकडून आणलेले चांदीचे चैन, चांदीचे जोडवे, चार सोण्याचे मनी व दोन पळ्या असलेले मंगळसूत्र अश्विनीच्या अंगावर लग्नात घालण्यात आले. लग्नाला शुभमचे काका रामभाऊ, काकू सुंदरबाई, चुलत भाऊ शंकर व बाळासाहेब, भावजई शारदा पोकळे, आशाबाई बबन माने, एजंट संगीता गणेश शिंदे, मुलीची आई संगीता लक्ष्मण शिंदे व अश्विनीची बहीण नाव माहीत नाही. गावातील इतर २० ते २५ लोक हजर होते. लग्न लागल्यानंतर दुपारी चारला आशाबाई माने हिच्या घरी चुलत भाऊ शंकर व बाळासाहेब यांनी नातेवाइक सचिन जाधव (रा. पाटोदा) यांच्या समक्ष संगीता गणेश शिंदे हिला १ लाख ७० हजार रुपये रोख दिले. हे पैसे देताना चुलत पुतण्या स्वप्नील बाळासाहेब पोकळे याने मोबाइलमध्ये व्हिडीओ शूटींग केले. १५ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ वा. शुभम हा पत्नी अश्विनीला घेऊन रिक्षाने नारायणगड येथे दर्शनासाठी गेला. तिथून १२ वा. परत येऊन संतुआई देवीच्या दर्शनाला गेले. सायंकाळी पाचला घरी हळद फेडण्याचा कार्यक्रम झाला.
दुपारी १ ला शुभम शेतात गेला अन् आश्विनी कारमध्ये बसून भुर्रर्र...
१६ जुलै २०२५ रोजी सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान संगीता गणेश शिंदे हिचा शुभमला कॉल आला व राहिलेले पैसे पाठवा, असे ती म्हणाली. तेव्हा ऊसतोडणीचे मुकादम जालिंदर रसाळ (रा. सिरसमार्ग) यांना संगीता गणेश शिंदे हिच्या मोबाइल नंबर १० हजार रुपये पाठविण्याचे शुभमने सांगितले. त्यांनी ते पैसे पाठवले. त्यानंतर शुभम दुपारी १ ला शेतात जनावरांना चारा टाकण्यासाठी गेला.दुपारी २ ला तो घरी परतला तेव्हा घरी पत्नी अश्विनी नव्हती. शुभमने तिचा गावात शोध घेतला असता गावातील एका लहान मुलाने सांगितले, की तुमची बायको थोड्या वेळापूर्वी कोणाच्या तरी कारमध्ये बसून गेली आहे. जाताना अश्विनीने शुभमचा १० हजार रुपयांचा मोबाइलही नेला. त्यानंतर तिसऱ्या दिवशी ते कार्ड बंद केले. मोबाइलमध्ये फोन पे अकाऊंटला ३ हजार रुपये होते. त्यानंतर शुभम, त्याचे चुलत भाऊ शंकर यांनी एजंट संगीता गणेश शिंदे, सासू संगीता लक्ष्मण शिंदे, (रा. बजाजनगर) यांना अनेकदा कॉल केले. मात्र त्यांनी कॉल उचलले नाही. शुभम व त्याच्या कुटुंबीयांच्या लक्षात आले, की या लोकांनी संगनमत करून १ लाख ७० हजार रुपये रोख १० हजार रुपये फोन पेने आणि २५ हजार रुपयांचे दागिने, शुभमच्या मोबाइलमधील फोन पेवरील ३ हजार रुपये घेऊन गंडा घातला आहे. एकूण २ लाख १८ हजार रुपयांनी शुभमची फसवणूक केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निशिगंधा खुळे करत आहेत.